कलेचा वारसा जोपासणारा स्वप्निल

    20-Feb-2022   
Total Views | 97

Swapnil Nachankar
 
 
 
स्वप्निल नाचणकरला आपल्या आईकडून कलेचा वारसा मिळाला. आज स्वप्निलने विविध कलाप्रकारांत नाव कमावले आहे. जाणून घेऊया स्वप्निल आणि स्वप्निलच्या कलाकारीबद्दल...
 
 
 
डोंबिवलीतील स्वप्निल रजनीकांत नाचणकर याने आपल्या आईकडून आलेला कलेचा वारसा जोपासत चित्रकला, रांगोळी, मखर सजावट, केक आणि पाककला या प्रकारात वेगळेपण सिद्ध केले आहे. नोकरी आणि कुटुंबाची जबाबदारी पार पाडताना आपल्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्वप्निल सतत काही ना काही करत असतो. त्याच्या कलात्मक प्रवासाचा आढावा. स्वप्निल नाचणकरचा जन्म डोंबिवलीचा. त्याचे शालेय शिक्षण दत्तनगरच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर येथे झाले. बदलापूरच्या आदर्श महाविद्यालयातून त्याने वाणिज्य शाखेची पदवी घेतली. दत्तनगरमधील ‘संतोष भुवन’ या इमारतीत त्याचे बालपण गेले. सध्या तो ठाकुर्लीच्या ‘९० फुटी’ परिसरात राहतो. स्वप्निलची आई सुहासिनी नाचणकर पाककला, रांगोळी या कलाप्रकारात तरबेज आहेत. त्या आज वयाच्या ७८व्या वर्षीदेखील उत्कृष्ट रांगोळ्या काढतात. त्यांचा कलेचा वारसा आपल्यात आल्याचे स्वप्निल सांगतो. त्याचे वडील ‘फायझर’ कंपनीत कामाला होते. त्याला एक मोठी बहीण आणि भाऊ आहे.
 
 
 
“बालपणी आई दिवाळीचा फराळ बनवत असे. रांगोळी काढत असे. तेव्हापासून आपण या कलेकडे ओढले गेलो. शाळेत असताना चांगली चित्र काढत होतोच, पण आठव्या इयत्तेपासून रांगोळी काढण्यास सुरुवात केली. अंगी उपजत कलागुण असल्याने महाविद्यालयामध्ये असताना गायन, सांस्कृतिक दिवस, फॅन्सी ड्रेस, स्नेहसंमेलनामध्ये अनेक बक्षिसे पटकावली. दिवाळी, गुढीपाडवा, संक्रात, गणपती अशा सणांना रांगोळ्या काढण्यास सुरुवात केली. प्रत्येक सणाच्या औचित्याने त्या विषयानुरूप रांगोळ्या साकारल्या. नातेवाईक आणि मित्र परिवाराकडून कौतुक होऊ लागले. त्यामुळे हुरूप वाढत गेला. स्त्रीभ्रूणहत्या आणि ‘जाणता राजा’ या त्याच्या रांगोळ्या विशेष उल्लेखनीय आहेत,” असे तो सांगतो. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर स्वप्निलने खासगी कंपनीत लेखा विभागात नोकरी पत्करली. सध्या तो मुंबईत एका कंपनीत ‘सिनियर एक्झिक्युटिव्ह’ म्हणून कार्यरत आहे. चित्रकला आणि रांगोळ्या काढताना त्याने गणेश चतुर्थी, गणेशोत्सवात देखावे आणि सजावटीचे काम सुरू केले. विविध मंदिरे, राजवाडे यांचे थर्माकोलमध्ये हुबेहूब देखावे त्याने साकारले. आता थर्माकोलवर बंदी आल्यापासून त्याने ‘इकोफ्रेंडली देखावे’ निर्माण केले आहेत. गेली २२ वर्षे असे आकर्षक देखावे तो तयार करीत आहे. प्लास्टिक आणि थर्माकोलचा वापर न करता टोपली, पुठ्ठा, लेसचा वापर करून मागील वर्षी गणपतीमध्ये त्याने विठ्ठलाचा मुकूट साकारला होता.
 
 
 
कोरोनामुळे ‘लॉकडाऊन’ सुरू झाल्यानंतर त्याच्यावर काही महिने घरून काम करण्याची वेळ आली. त्यावेळी त्याला घरी केक बनविण्याची कल्पना सुचली. एक दिवसाचे बेसिक प्रशिक्षण घेऊन त्याने केक बनवायला सुरुवात केली. लोकांचा प्रतिसाद वाढतोय, हे लक्षात घेऊन त्याने पत्नी साक्षी हिच्या सहकार्याने ‘स्वप्नसाक्षी होम बेकर्स’ या नावाने केक बनविण्याचा व्यवसाय सुरू केला. केक बनविणे हीदेखील एक कला असल्याचे स्वप्निल मानतो. आपल्या अंगी असलेल्या चित्रकला आणि हस्तकला या दोन्ही गुणांचा कल्पक वापर त्याने केक बनविण्यासाठी केला. ‘स्वप्नसाक्षी’ ब्रॅण्डखाली त्याने आतापर्यंत ३०० केक बनवून विक्री केली. त्यातील १०० हून अधिक केक ‘डिझायनर केक’ असल्याची माहिती स्वप्निलने दिली. विविध उपकरणे, वाद्ये, सीनरी आणि नावाचे केक त्याने बनविले. एवढ्या वर्षाच्या प्रवासात सर्वाधिक सामाजिक ओळख केकनी मिळवून दिली, असे तो आवर्जून सांगतो. पत्नी साक्षी हीदेखील चित्रकलेमध्ये पारंगत असल्याचा खूप फायदा केक बनवताना होतो. केकसोबत दिवाळी, नवीन वर्षाला कुकीज, कप केक, पेस्ट्रीज आणि यंदा तर दिवाळीत त्याने सुमारे ५५ किलो फराळ घरी बनवून त्याची विक्री केली. नोकरी सांभाळून हा जोड व्यवसाय पुढे सुरू ठेवण्याचा त्याचा मानस आहे. स्वप्निल करत असलेल्या चारही कलाप्रकारांत नवनवीन प्रयोग करण्याची त्याची नेहमी धडपड सुरू असते. त्यातूनच नावीन्यपूर्ण गोष्टी घडतात, असा त्याला विश्वास आहे.
 
 
 
शालेय किंवा महाविद्यालयात असताना कला क्षेत्रात घरच्या मर्यादा असल्याने विशेष प्रशिक्षण तो घेऊ शकला नाही. स्वप्निलच्या आईकडून त्याला कलेचा वारसा मिळाला. त्याच्या अंगी असलेल्या कलागुणांचा वारसा त्याच्या दहावीत शिकत असलेल्या एकुलत्या एक मुलीच्या म्हणजे सौम्याच्या अंगीदेखील आला आहे, हे त्याच्या लक्षात आले आहे. त्यामुळे तिला व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी मुंबईच्या ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’ येथे दाखल करण्याचा त्याने निर्धार केला आहे. “शालेय शिक्षण महत्त्वाचे आहेच, पण आपल्या पाल्याच्या अंगी असलेल्या कलागुणांना वेळीच ओळखा आणि त्यांना भरपूर वाव देण्याची संधी द्या,” असा सल्ला स्वप्निल पालकांना देतो. कुटूंब, नोकरी सांभाळत आपल्या अंगी असलेल्या कलेला स्वप्निलने योग्य न्याय देऊन त्यातून अर्थार्जनाचा मार्गदेखील शोधला आहे. त्याच्या पुढील वाटचालीस दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘संस्कार भारती’ कोकण प्रांताच्या पुढाकारातून सुरु झालेल्या ’THE ROOTS OPEN MIC ’ या उपक्रमाने आपल्या दोन यशस्वी वर्षांची पूर्तता साजरी केली. ‘सा कला या विमुक्तये’ या मूलमंत्रासोबत विविध कलांच्या अभिव्यक्तीसाठी कार्यरत असलेला हा अनोखा उपक्रम. या उपक्रमांतर्गत दर महिन्याच्या तिसर्‍या शनिवारी होणार्‍या कार्यक्रमाच्या यंदाच्या सत्रात मातृदिवस आणि समरसतेसारख्या भावनिक विषयांना वाहिलेली सादरीकरणे करण्यात आली. तसेच दि. 20 मे रोजी येणार्‍या थोर कवी सुमित्रानंदन पंत यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121