नवी दिल्ली: २०२६-२७ या आर्थिक वर्षापर्यंत भारत हा ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनेल असा विश्वास भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार वी. अनंत नागेश्वरन यांनी मंगळवारी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला.
" आपला विकास दार हा ८ टक्केच राहिला आणि पुढच्या वर्षांसाठीही आपण हा दर टिकवून ठेवू शकलो तर आर्थिक वर्ष २०२६-२७ पर्यंत भारताचा निव्वळ जीडीपी हा ५ ट्रिलियन डॉलर पर्यंत पोचला असेल " असे नागेश्वरन म्हणाले. या आधी अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामन यांनीही भारताने कोरोना साथीमधून सावरून ज्या पद्धतीने विकासाकडे वाटचाल करत आहे ते भारताच्या बुलंद इच्छाशक्तीचे प्रतीक आहे असे अधोरेखित केले होते. अर्थसंकल्पात भारताचा विकास दर हा ९.२ टक्के इतका राहील अंदाज व्यक्त केला आहे. या आधी सोमवारी सादर झालेल्या आर्थिक पाहणी अहवालात हाच दर ८-८.५ टक्के इतका राहील असा अंदाज व्यक्त केला होता.
आर्थिक पाहणी अहवालात भारताच्या या विकास दरासाठी देशात झालेले लसीकरण, पुरवठा सुरळीत राहावा म्हणून केलेल्या सुधारणा, व्यापाऱ्यासाठीच्या नियमांमध्ये केलेल्या सुधारणा, निर्यातीत झालेली वाढ भांडवली गुंतवणुकीसाठी भांडवलाची उपलब्धता ही कारणे दिली आहेत. वातावरणीय बदलांबाबतच्या अनिश्चिततेबद्दल या आर्थिक पाहणी अहवालात चिंता व्यक्त करण्यात आली आहे.