औरंगाबादच्या ‘यशवंत कला महाविद्यालया’त साकारले वज्राकार!

    19-Feb-2022
Total Views |
 

wajrakar 
 
 
फेब्रुवारीच्या पहिल्या सप्ताहात, ‘यशवंत कला महाविद्यालया’च्या विस्तीर्ण परिसरात शिल्पकारांची मांदियाळी भरली होती. तब्बल दहा दिवस अनेक ‘यशवंत’ शिल्पकार या महाविद्यालयात नांदले. विविध प्रकारच्या दगडांबरोबर त्यांनी सौंदर्याभिरुचीपूर्ण संवाद साधला. दगड घडत गेले. शिल्पकारांचे हात दगडाला घडवत होते. छिन्नी-हातोड्यांची जणू जुगलबंदीच! 
 
 
खडक किंवा दगड हा लाव्हारसापासून बनलेल्या निसर्गजन्य वस्तूचे आपल्याला माहीत असलेले स्वरूप. हा लाव्हा घट्ट झाला की, डोंगर किंवा पर्वत बनतात. दगड वा पाषाण हा डोंगराचा तुकडा असतो. या खडकांत मॅग्नेशियम, सिलिका, अ‍ॅल्युमिनियम आणि लोह किंवा लोखंड यांचं प्रमाण अधिक असतं. अनेक मूलद्रव्यांपासून खनिजादी मिश्रणे खडकात असतात. भूगर्भातील अतिशय तप्त अशा लाव्हारसाचं थंड झाल्यावरचं स्वरूप हे अतिशय कठीण असतं. या कठीण स्वरूपालाच ‘अग्निजन्य खडक’ किंवा ‘बेसाल्ट’ असं म्हणतात.
महाराष्ट्रात ‘बेसाल्ट’ जातीच्या खडकांचे डोंगर अधिक प्रमाणात आढळतात. या खडकांमध्येच लेणी-स्थापत्त्य निर्माण झालेले आढळते. अग्निजन्य खडकात जीवाश्म आढळत नाही. काही तज्ज्ञ आणि कातकरी किंवा पाथरवट लोकं सांगतात की, जीवाश्म नसल्याने अशा खडकांवर ‘कार्विंग’ अर्थात कोरीव काम करणं, मूर्ती घडवणं वा अशा खडकांच्या तुकड्याला आकार देणं अधिक सुलभ जातं.
आपल्या भारतीय कला संस्कृतीत खडक वा दगड या निसर्गजन्य वस्तूला अनन्यसाधारण महत्त्व आहे. लेण्यांमधील उठावशिल्पे, दगडी मूर्ती आणि दगडांचे नैसर्गिक आकार यांद्वारे आपल्या अतिप्राचीन समाजजीवनाचा अंदाज निष्कर्षांपर्यंत बांधता येतो.
जगप्रसिद्ध अजिंठा-वेरुळ लेण्यांच्या, महाराष्ट्रातील मराठवाड्याची राजधानी म्हणून ओळख असलेल्या औरंगाबाद येथे शासकीय अभिकल्प महाविद्यालय आहे. याच औरंगाबादमध्ये ‘यशवंत कला महाविद्यालय’ आहे. महाराष्ट्र शासनाचे अनुदानित कला महाविद्यालय असल्याने या कला महाविद्यालयाचे प्राचार्य रवींद्र तोरोणे हे सतत आणि सातत्याने विविध कलाविषक उपक्रम राबवितात. खरंतर ‘राबवितात’ हा शब्द त्यांचा अपमान करणारा ठरेल. ते त्यांच्या कला महाविद्यालयात विविध कला उपक्रम साजरे करतात. मुळात प्राचार्य रवींद्र तोरोणे हे शासकीय अभिकल्प महाविद्यालयाचे विद्यार्थी. (पूर्वीचे शासकीय कला महाविद्यालय.) त्यामुळे आपल्या महाविद्यालयाचे म्हणजे मातृसंस्थेचे नाव उंचावण्याचा प्रयत्न करणार्‍या माजी विद्यार्थ्यांपैकी एक तोरोणे सर...
कलेचा प्रचार-प्रसार, कलेचे अध्यापन आणि कलाविषय सांस्कृतिक बांधिलकीचा एक भाग म्हणून महाराष्ट्रातील आणि भारतातील विविध विषयांतील आणि कलाप्रकारांतील कलातज्ज्ञांना बोलावणे, परिसंवाद चर्चा, प्रात्यक्षिके, कार्यशाळा आणि सेमिनार्स आयोजित करणे, अशा विविध वैविध्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करणे हे औरंगाबादला त्यांच्या ‘यशवंत कला महाविद्यालया’त नियमितपणे सुरू असते. म्हणजे शासकीय अभिकल्प महाविद्यालयाची कसरदेखील ‘यशवंत कला महाविद्यालया’च्या उपक्रमांद्वारे काढली जाते, असेच स्थानिक कलाविश्वात बोलले जाते. ही बाब ‘यशवंत कला महाविद्यालया’च्या प्रतिष्ठेत भर टाकणारीच म्हणावी लागेल.
फेब्रुवारीच्या पहिल्या सप्ताहात, ‘यशवंत कला महाविद्यालया’च्या विस्तीर्ण परिसरात शिल्पकारांची मांदियाळी भरली होती. तब्बल दहा दिवस अनेक ‘यशवंत’ शिल्पकार या महाविद्यालयात नांदले. विविध प्रकारच्या दगडांबरोबर त्यांनी सौंदर्याभिरुचीपूर्ण संवाद साधला. दगड घडत गेले. शिल्पकारांचे हात दगडाला घडवत होते. छिन्नी-हातोड्यांची जणु जुगलबंदीच! भान विसरायला लावणार्‍या अशा वातावरणात दगड आकार घेत होते. आकार आशय व्यक्त करीत होते. आशय रुपाधारांनी सजत होते. ही आवर्तने दिवसांमागून दिवस सुरू असतात. 4 फेब्रुवारी रोजी ‘यशवंत कला महाविद्यालया’चा परिसर ‘बोलक्या वज्राकारां’नी भारलेला होता. विविध कलाप्रज्ञावंतांच्या कल्पक कलासृजनाच्या कलासंगमाचं केंद्र यशवंत कला महाविद्यालय बनलं होतं.
प्राचार्य रवींद्र तोरोणे यांनी त्यांच्या नावाप्रमाणेच शिल्पप्रकाशाने सारा परिसर प्रकाशमय केला होता. रवि-अर्थात सूर्यनारायण. सूर्याची किरणे शक्य असेल तिथपर्यंत पोहोचतातच. रवींद्र तोरोणे यांनीही महाराष्ट्राच्या कोपर्‍यातील कलाकारांपर्यंत निमंत्रणे पोहोचविली. शिल्पकार नवनाथ फेंगसे, योगेश लोखंडे, अरविंद मंगल, अभिषेक साळवे, शुभम साळवे, साईनाथ आडे, आकाश जामदार, विजय पावसकर, किशोर तायडे, रोहित वारेकर, कैलास आडे, शुभमकुमार जाधव, दर्शन खरटमल, मंगेश फुलारी, संकेत उबाळे आणि ओंकार वाकडे, अशा तब्बल 16 शिल्पकारांना शिल्पसंवाद करण्यासाठी आमंत्रित केले होते. या सर्वांचे शिल्पनेतृत्व ज्येष्ठ शिल्पकार प्रा. मधुकर कोठीरामजी वंजारी यांनी समर्थपणे पेललं होतं. प्रा.मधुकर वंजारी हे सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई येथील शिल्पकला विभागाचे प्रमुख राहिलेले आहेत. कलाकार हा निवृत्त होत नसतो, हेच त्यांनी या कार्यशाळेत दाखवून दिले.
ही कार्यशाळा अत्यंत यशस्वी झाली. अगदी शासकीय अभिकल्प महाविद्यालयाचे विद्यार्थीदेखील या कार्यशाळेला भेट देऊन, शिल्पकारांच्या शिल्पकार निर्मिती प्रक्रिया पाहत होते. न्याहाळत होते. विद्यार्थ्यांना विशेषत: कलाविद्यार्थ्यांना जर अशा कलाविषयक उपक्रमांची मेजवानी मिळाली, तर त्यांच्या कलाप्रतिभेला धुमारे फुटतात. याची नस प्राचार्य रवींद्र तोरोणे सरांना गवसली होती. संस्थाप्रमुख म्हणून त्यांनी जे नि:स्वार्थी-पारदर्शी आणि तळमळीने जे पालकत्व स्वीकारलेले आहे ते इतरांसाठी अनुकरणीयच म्हणावे लागेल.
सेवेत म्हणजे साहाय्यक कलाध्यापकांशी आपलेपणाने, आत्मियतेने संबंध जोपासणारे प्रा. रवींद्र तोरोणे यांनी सेवानिवृत कलाध्यापकांनाही सन्मानाने वागणूक देऊन त्यांच्याप्रति आदरभाव व्यक्त करण्याचा आदर्श घालून दिला आहे. हे इतर शासकीय कला महाविद्यालयांच्या प्राचार्य वा अधिष्ठातांकडूनही अभिप्रेत असावे, असे स्थानिक कलावर्तुळात बोलले जाते.
कलावातावरण सुद़ृढ-निरोगी राहावे, असे वाटत असेल, तर संस्थाप्रमुख फार पारदर्शी असावा लागतो. या कार्यशाळेत पहिल्या दिवशी खदानीवरून दगड निवडून आणण्यापासून दगडी शिल्प घडविण्याचा प्रवास खूपच मेहनतीचा राहिला. ते पाहून भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या वैज्ञानिक संवर्धनाचे, औरंगाबाद मंडळाचे उपअधीक्षक श्रीकांत मिश्राही भारावले. आज आपल्या देशातील लेणी स्थापत्त्य संवर्धनासाठी तज्ज्ञ म्हणून शिल्पकार मिळणे कठीण झालेले असताना, तीन बाय साडेतीन फुटांच्या दगडी शिल्पांसाठी लागणार्‍या मेहनतीवरून, शेकडो वर्षांपूर्वी कोरलेल्या भव्य लेण्यांसाठी त्या कलाकारांनी किती मेहनत घेतली असेल, याची प्रचिती येते. उपअधीक्षक श्रीकांत मिश्रा भारावून बोलले. यावरून तेथील वातावरणाचा अंदाज येतो.
महाराष्ट्रात ‘सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’सह कोल्हापूर, सावर्डे, नाशिक असे ठरावीकच ठिकाणी शिल्पकला विभाग आहेत. कला महाविद्यालयांच्या तुलनेने ‘शिल्पकला’ विभाग अगदीच नगण्य आहे. शिल्पकलेला पोषक असलेला, ‘बेसाल्ट’सह कोरीव कामाला योग्य असलेले दगड महाराष्ट्रात आहेत. त्या दगडांना बोलते करणार्‍या कलाकारांची वानवा आहे. अर्थात, ‘शिल्पकले’ला प्रोत्साहन मिळणं हीदेखील काळाची गरज आहे.
शिल्पकलेमुळे संस्कृतीचे जतन होते. पुरातत्त्वशास्त्र सांगते, दगडाला ९० लाख वर्षे आयुष्य असते. म्हणजे एक शिल्पकृती सुमारे 90 लाख वर्षे टिकणार. असे जरी थोडावेळ विचारांत आणले, तरी प्राचार्य रवींद्र तोरोणे यांनी साजरा केलेल्या कला उपक्रमात आमंत्रित केलेल्या प्रतिथयश शिल्पकारांनी साकारलेल्या कलाकृती म्हणजे, सद्य:स्थितीतील सामाजिक निरीक्षणांचे प्रतीकात्मक त्रिमित स्वरूपच म्हणावे लागेल. म्हणजे आजच्या सद्य:स्थितीचे दृश्यस्वरूप पुढील शेकडो-लाखो वर्षे, सांस्कृतिक पुरावा म्हणून एक अमूल्य ठेवा ठरले आहे. अशा स्वरूपाचे कला उपक्रम यशस्वी करणे, ही तारेवरची कसरत असते. कलाकारांना आमंत्रित करणे, त्यांचा निवास, भोजनव्यवस्था, मानधन, कार्यक्रमाचा समारंभ आणि समारोप या सर्व टप्प्यांतून आनंदी वातावरणात कलामंथन करणे ही बाब कौतुकाची आहे. प्राचार्य रवींद्र तोरोणे आणि त्यांचे ‘यशवंत कला महाविद्यालया’चे सहकारी या कौतुकाचे हकदार आहेत.
शंकरराव बोडस यांच्या जयंतीनिमित्त आयोजिलेल्या या राज्यस्तरीय दगडी म्हणजेच शिल्पकला कार्यशाळेचे हे दुसरे वर्ष आहे. नावातच ‘यश’ हा शब्द असल्याने ‘यशवंत कला महाविद्यालय’ हे औरंगाबाद शहरातीलच नव्हे, तर मराठवाड्यातील कलाविषयक दर्जा उंचावणारे प्रथम क्रमांकाचे महाविद्यालय ठरले आहे, असे स्थानिक परंतु प्रादेशिक दैनिकांनी आवर्जून उल्लेखिलेले कला महाविद्यालय आता अधोरेखित झाले आहे. अशा उपक्रम राबविणार्‍या प्रा. तोरोणे आणि यशवंत कला महाविद्यालयास शुभेच्छा...!
- प्रा. डॉ. गजानन शेपाळ