मुंबई: "मुंबईतील उपनगरीय रेल्वे मार्गांलगतच्या झोपड्यांचे पुनर्वसन करण्याचे का हे राज्य सरकारचे आहे" असे वक्तव्य केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी गुरुवारी केले. "या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश पळून तसेच तसेच राज्यसरकारशी चर्चा केल्यानंतरच तोडगा काढला जाईल" असेही दानवे यांनी स्पष्ट केले. रेल्वे रुळांलगतच्या अनधिकृत झोपड्या हटवण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. या आदेशानंतर या झोपड्या हटवण्याचे काम सुरु आहे.
उपनगरीय रेल्वे रुळांलगतच्या अनधिकृत झोपड्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे. या झोपड्यांमध्ये स्वयंपाकासाठी वापरले जाणारे गॅस, चुली यांमुळे दुर्घटना होण्याची शक्यता आहे. येथे झालेली छोटीशी दुर्घटनासुद्धा लाखो प्रवाशांच्या जिवावर बेतू शकते अशी भीती रेल्वे अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात होती. या झोपड्या हटवण्यासाठी सुरु असलेल्या रेल्वेच्या कारवाईला स्थानिक राजकारण्यांकडून विरोध होतो आहे. याच प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आमदार- खासदार यांची दानवे यांच्या सोबत बैठक झाली. या बैठकीला दानवे यांच्यासह मुंबई आणि उपनगरांतील सगळे खासदार- आमदार उपस्थित होते. या परिषदेनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दानवे बोलत होते.