ठाणे: ऐतिहासिक ठाणे स्थानकावरील भार हलका करण्यासाठी मनोरुग्णालयानजीक नविन विस्तारीत ठाणे रेल्वे स्थानक रेल्वेच्या सहकार्याने उभारण्याचे ठाणे महापालिकेच्यावतीने ठरवण्यात आले.परंतु,अद्याप हे काम रखडल्याने केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा करण्यात आली.तसेच या प्रकल्पासाठी रेल्वेकडून संपूर्ण सहकार्य केले जाईल. मात्र, भूसंपादना संदर्भात रखडलेले काम राज्य सरकार व महापालिकेने युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या सुचना वैष्णव यांनी दिल्या.
केंद्र सरकारच्या ५० टक्के निधीतून राबविण्यात येणाऱ्या स्मार्ट सिटी योजनेतील ठाणे शहरातील कामांमध्ये गैरव्यवहार व बहुसंख्य कामे मंदगतीने सुरू असल्याबाबत ठाणे शहर भाजपाने केंद्रीय नगर विकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर केंद्र सरकारतर्फे स्मार्ट सिटी मिशनचे संचालक कुणालकुमार यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना प्रत्यक्ष कृती अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्याचबरोबर स्मार्ट सिटी प्रकल्पातील कामे वेगाने होण्यासाठी भाजपाकडून केंद्र सरकार व महापालिकेकडे पाठपुरावा केला जात आहे. त्यानुसार ठाणे शहर भाजपाकडून रेल्वेमंतत्री अश्विनी वैष्णव यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, खासदार विनय सहस्रबुद्धे, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, भाजपाचे उपाध्यक्ष सुजय पतकी यांच्यासह महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदिप माळवी, प्रवीण फापळकर, कार्यकारी अभियंता सुधीर गायकवाड व रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.
स्मार्ट सिटी प्रकल्पात नवे ठाणे येथील रेल्वे स्थानकाचाही समावेश आहे. या कामासाठी २६२ कोटी ७६ लाख रुपये खर्च येणार आहे. या पुलाच्या कामासाठी ७ मार्च २०१९ रोजी कंत्राटदाराला कार्यादेश देण्यात येऊन, पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी ३६ महिन्यांची मुदत देण्यात आली. मात्र, काम रखडल्याने लाखो प्रवाशांची गैरसोय होत आहे. नव्या ठाणे रेल्वे स्थानकाच्या रखडलेल्या कामासंदर्भात आढावा घेतला. या स्थानकासाठी रेल्वेकडून संपूर्ण सहकार्य केले जात आहे. मात्र, भूसंपादन रखडल्यामुळे स्थानकाचे काम वेगाने सुरू झालेले नाही. राज्य सरकार व महापालिकेने तातडीने भूसंपादनाचे काम पूर्ण करावे, अशी सुचना त्यांनी केली. नव्या ठाणे रेल्वे स्थानकाच्या नियोजित इमारतीसंदर्भातही काही सुचना रेल्वेमंत्र्यांनी केली.ठाणे पूर्वेकडील सॅटीस प्रकल्पाच्या कामातही लक्ष देण्याची सुचना रेल्वेमंत्र्यांनी केली.