ठाणे: राज्य सरकारमध्ये तीन पक्षांची महाविकास आघाडी असली तरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून फोडाफोडीचे राजकारण सुरुच आहे.राष्ट्रवादीने तर काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला आहे.भिवंडी महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते हालिम अन्सारी व त्यांच्या पत्नी नगरसेविका रेश्मा बानो यांनी कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. मंगळवारी दुपारी मुंबईमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश कार्यक्रम झाला. महापालिकेत काँग्रेसच्या ४७ नगरसेवकांपैकी १८ नगरसेवकांनी तीन महिन्यांपूर्वी कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.आता काँग्रेसचे आणखी १० नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे.
राज्यभरात राष्ट्रवादीने आघाडीतील सहकारी पक्षांमध्ये फुटीची बीजे रोवली आहेत.महापालिका निवडणुकीच्या पाश्वभूमीवर नगरसेवक आणि पदाधिकारी फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले आहे.तेव्हा भिवंडी महापालिका ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादी सक्रिय झाली असून यापूर्वी काँग्रेसचे १८ नगरसेवक राष्ट्रवादीने गळाला लावले.आता तर भिवंडी पालिकेतील काँग्रेस गटनेत्यालाच राष्ट्रवादीत प्रवेश देऊन काँग्रेसला राष्ट्रवादीने चांगलाच हात दाखवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, गटनेते हालिम अन्सारी यांनी पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून पक्ष सोडल्याचा दावा केला आहे