मुंबई: बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस उग्र होत आहे. अशातच मुंबई पोलिस दलात ८ हजार ७४७ पदे रिक्त असल्याची माहिती उघड झाली आहे. मुंबई पोलिसांचा वार्षिक अहवाल मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आला. त्यात मुंबई पोलिसांच्या वर्षभरातील कामगिरीबरोबरच रिक्त पदांचाही आढावा घेण्यात आला. मुंबई पोलीस दलात एकही पदे रिक्त असल्याने सध्याच्या मनुष्यबळावर ताण येतो आहे असे दिसून आले आहे. मुंबई पोलीस दलात ४६ हजार २१२ मंजूर पदे आहेत. पण प्रत्यक्षात ३७ हजार ४६५च पदे भरली गेली आहेत.
पोलीस दलातील रिक्त पदांपैकी १ हजार ३६१ अधिकारी वर्गाची तर ७ हजार ३८६ कर्मचारी वर्गातील पदे रिक्त आहेत. गेल्या वर्षी मुंबई मध्ये ६४ हजार ६५६ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यातील गुन्हे सोडवण्याचे प्रमाण ४३ टक्के झाले आहे. अपुऱ्या मनुष्यबळाच्या आधारावर मुंबई पोलिसांनी केली कामगिरी चांगली असली तरी रिक्त पदे तशीच ठेवून रोजगार निर्मितीस वाव का दिला जात नाहीये हा महत्वाचा प्रश्न आहे? पोलीस भरतीसाठी हजारो उमेदवार दर वर्षी तयारी करत असताना ही रिक्त पदे या युवकांच्या इच्छा-आकांक्षांवर पाणी फिरवीत आहेत.