शेक्सपिअर जरी म्हणून गेला असला की, 'नावात काय आहे' तरी नावातही बरंच काही असतं. आता अशाच एका देशाने त्यांचे नव्याने नामकरण करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. हा देश म्हणजे तुर्की. तुर्कीने आपल्याच देशाचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला असून, त्याचा संयुक्त राष्ट्रांकडे पाठपुरावाही सुरू केलेला दिसतो. आता जगाच्या इतिहासात एखाद्या देशाने नव्याने स्वत:चे बारसे करणे, हे काही पहिल्यांदाच घडते आहे, असे अजिबात नाही. यापूर्वीही इराण, नेदरलँड्स, मॅसिडोनिया, म्यानमार यांसारख्या काही देशांनी तसेच जगातील कित्येक शहरांनीही आपली जुनी नावं बदलून नवा साज चढवला. आपल्या मुंबईचेच उदाहरण घ्या की. १९९० साली इंग्रजी वसाहतवादाचे प्रतीक असलेल्या 'बॉम्बे'ची अधिकृतपणे 'मुंबई' झाली. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशातही मुघलांच्या पाऊलखुणा दर्शविणारी नावे बदलून तेथील भाजप सरकारने मूळ संस्कृती आणि परंपरांचे गतवैभव जागृत करणारी नावं या शहरांना दिली. म्हणजेच या शहरांची एकप्रकारची पुसलेली, आक्रमकांनी मुद्दाम खोडलेलीच ओळख या नगरांना पुन:प्राप्त झाली. असाच काहीसा प्रकार घडला तो तुर्कीच्या बाबतीत!
पश्चिम आशिया आणि दक्षिणपूर्व युरोपमध्ये मोडणारा तुर्की हा देश. १९२३ साली पाश्चात्त्यांपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्थानिक भाषेत या देशाचे नाव पूर्वी 'तुर्किये' असेच होते. परंतु, कालांतराने लॅटिन आणि इंग्रजीला सोयीस्कर असा अपभ्रंश होत गेला आणि 'तुर्किये'चे झाले 'तुर्की'! स्थानिक तुर्की भाषेत मात्र अजूनही 'तुर्किये' असाच देशाचा उल्लेख तेव्हाही प्रचलित होता आणि आजही दिसून येतो. पण, मुळात एर्दोगान यांना देशाचे नाव बदलण्याचा हा साक्षात्कार एकाएकी कसा बरं झाला, हाच प्रश्न उपस्थित होतो. त्यासाठी जरा तुर्कीच्या इतिहासात डोकावून बघू. तुर्कीचे राष्ट्रपिता केमाल पाशा यांच्या नेतृत्वाखाली आकारास आलेल्या या मुस्लीम बहुल देशाने मात्र इस्लामिक कट्टरतावादाला फाटा देत, सेक्युलर, पुरोगामी आणि उद्योगप्रवणतेचा प्रारंभी पुरस्कार केला. म्हणूनच केमाल पाशा जे 'अतातुर्क' म्हणूनही सुविख्यात होते, त्यांच्या या धोरणांना 'केमालिझम' म्हणूनही ओळखले जात. पण, आधी पंतप्रधान आणि आता राष्ट्राध्यक्ष म्हणून रसीप एर्दोगान यांनी तुर्कीच्या सेक्युलर प्रतिमेला छेद देत इस्लामिक कट्टरतावादालाच खतपाणी घातल्याचे दिसते. तुर्कीच्या ओटोमन साम्राज्यासारखे इस्लामिक जगतावर आपले एकहाती प्रभुत्व प्रस्थापित व्हावे, या ईर्षेने एर्दोगानही पेटून उठले. आपणच २१व्या शतकातील जणू मुस्लीम जगताचे 'खलिफा' आहोत, म्हणून या देशाचे सर्व नियम-कायदे, ध्येय-धोरणे यांची त्यांनी दिशाच बदलली. पाकिस्तानला जवळ केले, काश्मीरशी काडीमात्रही संबंध नसताना संयुक्त राष्ट्रात त्यावरुन नाहक टीका केली. पण, हे करता करता मात्र तुर्कीची अर्थव्यवस्था घसरणीला लागल्याचे भानही एर्दोगान यांना राहिले नाही. एवढेच नाही, तर तुर्कीचे चलन 'लिरा' गेल्या काही काळात डॉलरच्या तुलनेत चांगलेच आपटले. त्याचबरोबर भूमध्य समुद्रावरुन ग्रीससोबत वाद, तर सीरियामध्येही तुर्कीने दादागिरीचीच भूमिका घेतली. त्यामुळे देशांतर्गत असेल अथवा आंतरराष्ट्रीय पातळीवर, तुर्कीची गेल्या काही काळातील पिछेहाट ही एर्दोगान यांच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी ठरली. या सगळ्या पार्श्वभूमीवरच तर एर्दोगान यांनी तुर्कीचे नाव बदलण्याचा घाट घातला नाही ना, अशी चर्चा सध्या आंतरराष्ट्रीय वर्तुळात रंगलेली दिसते. पण, जग काहीही म्हणत असले तरी, तुर्कीची संस्कृती आणि परंपरा जतन करण्यासाठीच हे नामकरण केल्याचा निर्वाळा एर्दोगान यांनी दिला. परंतु, देशाच्या नावात बदल हा आताच, एवढ्या वर्षांनी का, हा प्रश्न मात्र तरी अनुत्तरीतच राहतो. असो. याच विषयी आणखीन एक रंजक बाब म्हणजे, तुर्की (इंग्रजीत टर्की) या देशाच्या नावावरुन तुर्कांची केली जाणारी भलावण. कारण, टर्की हा कोंबडीसारखाच मोठा पक्षी असून, अमेरिकेत नाताळ दरम्यान 'थँक्सगिव्हिंग'च्या वेळी त्यापासून विविध पदार्थ तयार केले जातात. तसेच इंग्रजी डिक्शनरीनुसारही 'टर्की' म्हणजे एखादी फसलेली गोष्ट, मूर्ख व्यक्ती असा अर्थ समोर येतो. तेव्हा, 'तुर्की'चे 'तुर्किये' करण्यासाठी एर्दोगान यांच्याकडे अशी १०० कारणं जरी असली, तरी देशाच्या नामंतरातून तुर्कीचा खरंच भाग्योदय होतो की, ओटोमन साम्राज्याप्रमाणेच महत्त्वाकांक्षी एर्दोगानही लयाला जातात, तेच पाहायचे!