नवी दिल्ली : तंजावर धर्मांतर आणि आत्महत्या प्रकरणाची ‘सीबीआय’ चौकशी होणारच, असे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सुनावणीदरम्यान स्पष्ट केले. तसेच हा मुद्दा प्रतिष्ठेचा बनवू नये, असेही तामिळनाडू सरकारला फटकारले. तामिळनाडूमधील तंजावर येथील एका १७ वर्षीय विद्यार्थिनीवर ख्रिश्चन धर्म स्वीकारावा, यासाठी दबाव टाकण्यात येत होता. त्या दबावास कंटाळून या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास ‘सीबीआय’तर्फे करण्यात येत आहे. याप्रकरणी ‘सीबीआय’ चौकशी स्थगित करण्यात यावी, अशी विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.
या याचिकेवर न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्या. बेला त्रिवेदी यांच्या खंडपीठाने सुनावणी केली. यावेळी न्यायालयाने ‘सीबीआय’ चौकशी स्थगित करण्याची विनंती फेटाळून लावली. न्यायालयाने म्हटले, ‘सीबीआय’ चौकशी सुरू राहू द्या. ‘सीबीआय’ चौकशीमध्ये हस्तक्षेप करणे न्यायालयास योग्य वाटत नाही. त्यामुळे सर्व पुरावे ‘सीबीआय’कडे सोपविण्यात यावे, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. त्याचप्रमाणे तामिळनाडू सरकारने या मुद्द्यास प्रतिष्ठेचा बनवू नये, असेही तामिळनाडू सरकारला सांगितले आहे.