हैदराबाद : शमशाबाद येथे बांधण्यात आलेल्या संत व समाजसुधारक रामानुजाचार्य यांच्या मुर्तीचा अनावरण सोहळा ५ फेब्रुवारी रोजी पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या मुर्तीचे अनावरण करण्यात आले होते. रामानुजाचार्यांच्या १००० व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या 'रामानुज सहस्राब्दी समारंभ' या कार्यक्रमात रविवार, दि. १२ फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे उपस्थित होते. 'रामानुजाचार्य म्हणजे भक्ती आणि समतेचे महान ध्वजवाहक.', असे म्हणत त्यांनी संबोधन करण्यास सुरुवात केली.
"श्री रामानुजाचार्यांनी भक्ती परंपरा मजबूत केली असून त्यास कायम जातीभेदाच्या वर मानले. बाबासाहेबांच्या कुटुंबाने कबीर पंथ स्वीकारला होता. त्यांनी श्री रामानुजाचार्यांच्या समतावादी तत्त्वांचे कौतुक केले होते. विशेष म्हणजे श्री रामानुजाचार्यांचा प्रभाव गांधीजींवरही दिसून आला होता. श्री रामानुजाचार्यांसारखे संत हे युगपरिवर्तक आणि युगद्रष्टे आहेत. त्यांचा हा भव्य पुतळा म्हणजे भारताच्या संत परंपरेचे मूर्त स्वरूप आहे.", असेही ते पुढे म्हणाले.