चित्रपटाचं नावं ‘कंदाहार’, कथानक घडतंय अफगाणिस्तानात; मग चित्रीकरण सौदी अरेबियात का बरं? याची मुख्य कारण दोन - एक म्हणजे अफगाणिस्तानात जाऊन चित्रीकरण काय करणार कपाळ! आणि दुसरं त्याहून महत्त्वाचं कारण म्हणजे, सौदी सरकारचा आपल्या देशातला चित्रपट उद्योग विकसित करण्याचा दृढ निश्चय!
'अरेबियन नाईट्स’चं मूळ अरबी भाषेतलं नाव ‘अलिफ-लैला-व-लैला.’ इ. स. १७०४ साली आंत्वान गालाँ नामक फ्रेंच विद्वानाने मूळ अरबीवरुन त्या ग्रंथाचा फ्रेंच अनुवाद करायला सुरुवात केली. तत्कालीन युरोपमध्ये फे्ंरच ही अभिजनांची प्रतिष्ठित अशी भाषा मानली जात असे. त्यामुळे युरोपभरच्या अनेक देशांमधल्या उच्चभू्र लोकांनी तो अनुवाद वाचला. सन १७०४ ते १७१७ या कालखंडात गालाँने तब्बल १२ खंडांमध्ये हा अनुवाद प्रसिद्ध केला, तो युरोपभर लोकप्रिय झाला.
स्वातंत्र्य ही किती महत्त्वपूर्ण अवस्था आहे पाहा. एक फे्ंरच विद्वान मोठ्या परिश्रमाने एका लोकप्रिय अरबी ग्रंथाचा अनुवाद छापून प्रसिद्ध करतोय. युरोपीय लोक तो वाचतायत.त्यांनाही त्या गोष्टी आवडतायत. म्हणजेच कथा वाचायला त्यांना वेळ आहे, स्वास्थ्य आहे, शांतता आहे. कारण, ते देश स्वतंत्र आहेत आणि आमच्याकडे काय चाललंय त्या कालखंडात? सन १६८१ साली संपूर्ण दख्खन जिंकण्याच्या ईर्षेने महाराष्ट्रात आलेला औरंगजेब सगळ्या मुलखाची बर्बादी करीत इथेच तळ ठोकून बसलाय. अखेर सन १७०५ साली औरंगजेब मेलाय. पण आता छत्रपती शाहू महाराज आणि त्यांचे पेशवे बाळाजी विश्वनाथ, सतत २५ वर्षांच्या मुघली स्वार्यांमुळे उद्ध्वस्त झालेलं हिंदवी स्वराज्य सावरुन धरण्यासाठी जिवापाड धावपळ करतायत. कुठली शांतता, कुठलं स्वास्थ्य आणि कुठला वेळ? जीवित आणि वित्त याची कसलीही शाश्वती नाही, तर कुठल्या कथा नि कुठले अनुवाद? आज आम्हीही मराठी साहित्यापासून जागतिक साहित्यापर्यंत अनेक दर्जेदार गोष्टींचा आस्वाद घेऊ शकतो, कारण आम्ही स्वतंत्र आहोत.
असो. तर फ्रेंच भाषेतल्या अनुवादांमुळे युरोपभर लोकप्रिय ठरलेल्या या ‘एक हजार एक रात्रीं’चा इंग्रजी अनुवाद व्हायला आणखी १०० वर्षं उलटावी लागली. सन १८३५ साली एडवर्ड विल्यम लेन या एका इंग्रज विद्वानाने तो अनुवाद प्रसिद्ध केला., ‘अरेबियन नाईट्स एंटरटेनमेंट’ हे नाव प्रथम त्यानेच वापरलं. परंतु, नंतर १८८५ ते १८९० या कालखंडात प्रख्यात इंग्रज संशोधक रिचर्ड बर्टन याने १६ खंडात प्रसिद्ध केलेला अनुवाद लोकांनीं अक्षरश: डोक्यावर घेतला. ‘अलिबाबा आणि चाळीस चोर’, ‘दर्यावर्दी सिंदबाद आणि त्याच्या सात सफरी’, ‘अल्लाउद्दिन आणि जादूचा दिवा’ इत्यादी अद्भुत गोष्टींनी लोकांना वेड लावलं. मराठीत पण कृष्णशास्त्री चिपळूणकर (निबंधमालाकार विष्णुशास्त्री चिपळूणकरांचे वडील) यांनी ‘अरेबियन नाईट्स’चा अनुवाद प्रसिद्ध केला. ‘अरबी भाषेतील सुरस आणि चमत्कारिक गोष्टी’ हे नाव त्यांनीच प्रथम वापरले. ही १८९० सालची गोष्ट झाली.
पण, मी तुम्हाला आता २०२२ची ताजीताजी अरबी चमत्कारिक कथा सांगणार आहे. सौदी अरेबियातलं इस्लाम धर्मीयाचं सर्वोच्च पवित्र स्थान म्हणजे मक्का. मक्का शहराच्या जवळच असलेल्या समुद्रावरचं बंदर म्हणजे जेड्डाह किंवा जेद्दाह किंवा योग्य अरबी उच्चार जिद्दा. सौदी अरेबियाची राजकीय राजधानी रियाध ही खूप अंतर्भागात आहे. त्यामुळेच आर्थिक-व्यापारी राजधानी आहे तांबड्या समुद्राच्या काठावरचं उत्कृष्ट बंदर शहर जिद्दा. जिद्दाच्या उत्तरेला साधारण ४०० किमीवर मदीना शहर. मदीनाच्या उत्तरेला सुमारे ३०० किमीवरचं अल् उला हे ठिकाण. रेताड वाळवंटात कुरुंदी दगडांचे (सँडस्टोन) पहाड उभे आहेत आणि त्या दगडांमध्ये सुंदर कोरीवकाम केलेल्या टोलेजंग गुंफा आहेत. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी ‘नेबेशियन’ या नावाने ओळखल्या जाणार्या स्थानिक जमातीने त्या गुंफा कोरलेल्या आहेत. अरे, पण हे काय? दोन हजार वर्षांपूर्वींच्या त्या गुंफासमोरच्या वाळवंटात आकाशातून हे काय पडतंय? ‘नेबेशियन’लोकांचं अवकाशयान खाली उतरतंय की काय? सोसाट्याच्या वार्याने केवढी वाळू उडत्येय!
अन् तेवढ्यात, पाटलोणीचा एक पाय पावलापर्यंत आणि दुसरा पाय गुडघ्यापर्यंतच, अशी ग्रहणात देऊन टाकायच्या लायकीची पाटलोण घातलेला एका दाढीवाला बुवा ओरडतोय ‘कट्.’ उंचावर के्रनवर चढवलेला कॅमेरा थांबला. हॉलिवूडचा प्रसिद्ध नट गेरार्ड बटलर आणि बॉलिवूडचा नट अली फजल यांनी अॅक्शन थांबवली. बरोबर! तुम्ही बरोबर ओळखलंत ते ‘नेबेशियशन’ लोकांचं दोन हजार वर्षांपूर्वीचं अवकाशयान नसून २१व्या शतकातलं अमेरिकन वायुदलाचं चॉपर होतं. चॉपर म्हणजेच हॅलिकॉप्टर बरं का! आपण ज्याला ‘बिस्किट’ म्हणतो, त्याला अमेरिकन लोक ‘कुकीज’ म्हणतात. आपण ज्याला ‘पेट्रोल’ म्हणतो, त्याला अमेरिकन लोक ‘गॅस’ म्हणतात. (पोटातल्या गॅसला पेट्रोल म्हणतात का?) तर त्या चॉपरच्या पंख्यामुळे मनस्वी वाळू उसळत होती. ग्रहणात देण्याच्या लायकीचे कपडे घातलेला तो बुवा सध्याच्या हॉलिवूडमधला प्रख्यात दिग्दर्शक आहे. त्याचं नाव आहे रिक रोमन वॉ आणि तो असे कपडे घालतो. कारण, सध्या तशीच फॅशन आहे. पैसा अति झाला की, दळिंदर दिसण्याची फॅशन येत असावी. गेरार्ड बटलर हा सध्याचा हॉलिवूडमधला एक नामवंत अभिनेता आहे. त्याच्यासोबत ‘थ्री ईडियट्स’ मधून प्रसिद्धीला आलेला अली फजल हा बॉलिवूडमधला नट आहे. चित्रपटाची कथा-पटकथा मिचेल-ल-फॉर्च्युन याने लिहिलेली आहे. हा माणूस स्वतःच लष्करी गुप्तहेर होता. आता अर्थात तो निवृत्त आहे. एक अमेरिकन हेर अफगणाणिस्तानात जातो आणि त्याचा अमेरिकेतल्या मुख्यालयाशी नि खुद्द अफगाण भूमीतल्या अमेरिकन सेनेशी संपर्क तुटतो. मग हा हेर आणि त्याचा स्थानिक पठाण मित्र त्यांच्यावर ते काही प्रसंग गुदरतात, त्याची कहाणी म्हणजेच हा चित्रपट ‘कंदाहार.’ २०२१च्या उत्तरार्धात चित्रीकरण सुरू झालेला हा थरारक युद्धपट किंवा ‘हेर’ चित्रपट २०२२च्या मध्यापर्यंत प्रेक्षकांच्या समोर यावा, असं अपेक्षित आहे.
आता आपल्या मनात लगेचच प्रश्न येतात- चित्रपटाचं नावं ‘कंदाहार’, कथानक घडतंय अफगाणिस्तानात; मग चित्रीकरण सौदी अरेबियात का बरं? याची मुख्य कारण दोन - एक म्हणजे अफगाणिस्तानात जाऊन चित्रीकरण काय करणार कपाळ! आणि दुसरं त्याहून महत्त्वाचं कारण म्हणजे, सौदी सरकारचा आपल्या देशातला चित्रपट उद्योग विकसित करण्याचा दृढ निश्चय!
काही वर्षांपूर्वी जगाला असं वाटत असे की, या अरबांकडे पेट्रोलखेरीज काहीही निर्माण होत नाही. आज नाही, पण आणखी २५ वर्षांनी यांच्या भूमीतलं सगळं तेल अमेरिकेने खाऊन फस्त केल्यावर काय करतील हे? पुन्हा उंटांवरुन वाटमारी करीत फिरतील? की भुके मरतील?
पण, गेल्या दशकभरात अरबांच्या नव्या पिढीला पण याची जाणीव झालेली दिसतेय. यांपैकी अनेक तरुण ‘ऑक्सफर्ड’, ‘केंब्रिज’, ‘हार्वर्ड’, ‘बर्लिन’ अशा प्रख्यात बिझनेस स्कूलस्मधून उच्च शिक्षण घेऊन बाहेर पडलेले आहेत. त्यांना आपल्या देशात तेल उत्पादन आणि त्याच्याशी संबंधित उद्योगांखेरीज इतरही उद्योग-व्यवसाय आणून, फक्त पेट्रो-डॉलर्सवर चालणारा देश, ही सौदीची ओळख बदलायची आहे. यामागे राजकीय विचारही आहेच. सौदीमध्ये तेलाचा प्रचंड पैसा राजघराण्यातल्या लोकांकडेच एकवटलेला आहे. सामान्य जनता मध्यमवर्गीय किंवा निम्न आर्थिक गटातच मोडते. २०११च्या ‘अरब स्प्रिंग’मध्ये म्हणजे अरबी क्रांतीत इजिप्त नि लिबियातल्या राजवटी सामान्य जनतेच्या असंतोषाने कोसळल्या. सौदीमध्ये तसं घडलं नाही म्हणजे सर्व काही आलबेल आहे, असं नव्हे. मग सामान्य जनतेला खूश करण्यासाठी, काहीतरी करतोय, असं दाखवायला पाहिजे. याकरिता दोन उत्तम मार्ग कोणते? तर चित्रपट आणि खेळ. येतयं का लक्षात? प्रथम गोर्या इंग्रजांनी आणि मग काळ्या इंग्रजांनी आम्हा भारतीयांना कसं चित्रपट आणि क्रिकेट यांच्या नशेत गुंग करून ठेवलं होतं ते?
२०१७ सालपर्यंत सौदी अरेबियाचे ग्रँड मुफ्ती म्हणजे सर्वोच्च धर्मगुरु अब्दुल अजीज बिन अब्दुल्ला अल् शेख म्हणत होते की, “चित्रपटसृष्टी म्हणजे अनैतिकता आणि बेशरमपणा.” पण, २०१८ साली सौदी सरकारचं चित्रपटांना प्रोत्साहन देण्याचं धोरण ठरलं आणि काय आश्चर्य, २०१९ साली सौदीमध्ये चक्क आंतरराष्ट्रीय चित्रपट उत्सव साजरा झाला. ‘रेड सी फिल्म फेस्टिव्हल’ २०२० साली ‘कोविड’मुळे होऊ शकला नाही. पण, कालच्या २०२१ डिसेंबरमध्ये तो व्यवस्थित साजरा झाला. आपल्याकडे सध्या चर्चेत असलेला, दिग्दर्शक कबीर खान याचा क्रिकेटवरचा ‘८३’ हा चित्रपटसुद्धा तिथे दाखवला गेला.
त्या आधीच म्हणजे २०१८ मध्ये राजधानी रियाधमध्ये एक नवीन अद्ययावत थिएटर उघडण्यात आलं आणि तिथे ‘ब्लॅक पँथर’ हा जगभर तुफान गर्दी खेचणारा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. सुपरमॅन, स्पायडरमॅन, बॅटमन वगैरे कॉमिक्समधल्या लोकप्रिय अतिमानवी शक्ती असणार्या नायकांपैकीच ‘ब्लॅक पँथर’ हा एक नायक आहे. तो अमेरिकन आहे, हे वेगळं सांगायला नकोच. हे जे चकाचक थिएटर म्हटलं ना, ते ‘ए.एम.सी.’ उर्फ ‘अमेरिकन मल्टी सिनेमा’या कंपनीने उभारलं आहे. ‘ए.एम.सी.’ ही १९२० साली म्हणजे १०० वर्षांपूर्वी स्थापन झालेली कंपनी असून आज २०२२ साली तिच्या मालकीची अमेरिकेत आणि युरोपात ९७८ थिएटर्स आहेत आणि १०,८३३ स्क्रीन्स आहेत. आता मल्टिप्लेक्समुळे एका थेटरात एकच पडदा नसतो. त्यामुळे पडद्यांची संख्या एवढी आहे. असो, तर ‘ए.एम.सी.’ २०३० पर्यंत सौदीमध्ये किमान ५०० स्क्रीन्स उभे करणार आहे. आता या (आपल्याला अवाढव्य वाटणार्या) सगळ्या व्यवसायासाठी सौदी सरकारला किती रक्कम गुंतवावी लागणार आहे? तर फक्त ६४० कोटी डॉलर्स! होय, सौदीच्या दृष्टीने फक्त ६४० कोटी!
चित्रपटांपाठोपाठ सौदीने २०२१ मध्ये मोटार शर्यतींचं आयोजन केलं. ‘सौदी अरेबियन ग्रँड प्रिक्स-२०२१’ या नावाचा हा मोटार शर्यत जलसा मोठ्या जल्लोषात पार पडला. या शर्यतींना ‘फॉर्म्यूला-वन’ असही म्हटलं जातं. यात गाडी हाकणारा खेळाडू आणि गाडी, दोघांचीही परीक्षा केली जाते. सध्या जगभरात लुई हॅमिल्टन हा ब्रिटिश खेळाडू नि त्याची मर्सिडीस-बेंझ गाडी आणि मॅक्स वेरस्टॅपन हा बेल्जियन-डच खेळाडू नि त्याची होंडा गाडी हेच कायम पहिल्या-दुसर्या क्रमांकावर असतात. ही शर्यत आणि तिच्यातला जल्लोष, थरार हा विलक्षण असतो. नोव्हेंबर २०२१ मध्ये जिद्दा शहरात झालेली ही स्पर्धा लुई हॅमिल्टन आणि त्याची मर्सिडीस गाडी यांनी जिंकली. आता ही स्पर्धा घेण्यासाठी सौदीला किती खर्च आला? अंदाजित आकडा आहे ६ कोटी, ५० लाख डॉलर्स. फक्त बरं का फक्त! आता एवढ्या किरकोळ खर्चात पब्लिक खूश राहून त्यांचं राजकीय अन्यायाकडे दुर्लक्ष होणार असेल तर....
...तर सौदी सरकारने हे धोरण पुढे का चालवू नये?