'अटक ते कटक' हिंदवी साम्राज्य स्थापनेचे स्वप्न महादजी शिंदे यांनी साकारले - ज्योतिरादित्य सिंधिया

ज्योतिरादित्य सिंधिया यांचं प्रतिपादन : राजधानीत "दिल्ली विजयोत्सव" साजरा

    11-Feb-2022
Total Views | 197

Jyotiraditya
 
 
 
 
नवी दिल्ली (पार्थ कपोले) : 'अटक ते कटक' असे हिंदवी स्वराज्य स्थापनेचे बीज छत्रपती शिवाजी महाराजांनी रोवले होते. त्यापासून प्रेरणा घेऊन बलाढ्य असे मराठा साम्राज्य स्थापन करण्यात महादजी शिंदे यांनी सर्वस्व अर्पण केले, असे प्रतिपादन केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी शुक्रवारी केले.
 
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि दिल्ली मराठी प्रतिष्ठिततर्फे दिल्ली येथील नव्या महाराष्ट्र सदनात 'दिल्ली विजयोत्सव' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, राज्यसभा सदस्य डॉ. विनय सहस्रबुद्धे आणि दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे वैभव डांगे उपस्थित होते.
 
 
मराठा साम्राज्याचा इतिहास व भारताचा इतिहास परस्परांशी निगडित आहे. हिंदवी स्वराज्याची स्थापना शिवरायांनी केली, त्यापासून प्रेरणा घेऊन महादजी शिंदे यांनी दिल्ली काबिज केली आणि 'अटक ते कटक' असे बलाढ्य हिंदवी साम्राज्य स्थापन केले. महादजी शिंदे हे केवळ नाव नव्हे, तर तो एक इतिहास आहे. मराठ्यांचा देदीप्यमान इतिहास हा केवळ साम्राज्यस्थापनेचा नव्हता. शिवरायांच्या काळापासून हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची ती तेग होती. त्यासाठी मराठ्यांच्या अनेक पिढ्यांनि पराक्रम गाजविला. भारताची एकता आणि अखंडता राखून हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यात महादजी यांचा सिंहाचा वाटा होता, असे केंद्रीय मंत्री सिंधिया म्हणाले.
 
 
पानिपत संग्रामात मराठ्यांचा पराभव झाला, मात्र त्यानंतर अवघ्या दहा वर्षातच महादजींनी दिल्ली काबीज केल्याचे केंद्रीय मंत्री सिंधिया यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, पानिपत युद्धानंतर 'अटक ते कटक' असे मराठा साम्राज्य महादजींनी उभे केले. त्यांनी केवळ दिल्ली जिंकली नाही, तर दिल्लीचा विकास केला. लाल किल्ल्याची डागडुजी केली, पिण्याच्या पाण्याची योजना केली. सुरक्षा आणि विकास याचे प्रतीक म्हणजे महादजी. त्यांनी केवळ युद्धाचे नव्हे तर राजकारणाचेही धडे गिरवले होते. देशभरातील विद्वानांकडून ज्ञान घेतले, पारसी भाषा शिकली. त्या काळातील सर्वाधिक साक्षर व्यक्ती ते होते. शिंदेशाहीचे प्रमुख म्हणून त्यांनी ३० वर्षे कारभार केला. तो काळ देशाच्या इतिहासातील सुवर्णकाळ होता. त्यांनी काबुल ते कंदाहार आपला वचक आणि दरारा निर्माण केला होता, असेही केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी नमूद केले.
 
 
डॉ. विनय सहस्त्रबुद्धे म्हणाले १७६१ मध्ये पानिपतचे तिसरे युद्ध झाले, त्यात पराभव झाला असला तरीही ध्येयाकडे मराठ्यांनी वेगाने आगेकूच केली. या संग्रामामुळे समाज देश आणि धर्मासाठी एकवटला. पुढे १७७१ साली महादजी शिंदे यांनी रोहिल्यांचा पराभव करून दिल्ली जिंकली आणि शाह आलमला दिल्लीच्या तख्तावर बसविले. त्यांच्या प्रभावामुळेच शाह आलमने गोहत्या बंदीचा आदेश काढला होता.
 
 
दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे वैभव डांगे म्हणाले, मराठा इतिहासाचे दिल्लीशी महत्वाचे नाते आहे. 'दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा' हे मराठी जन अभिमानाने म्हणतात. महादजी शिंदे यांनी दिल्ली सर केल्याचा २५१ वा विजय दिवस दिल्लीत प्रथमच साजरा होत आहे. दिल्लीच्या चावडी बाजारातून महादजी कारभार चालवत असत, आज ते दिल्लीतील महत्वाचे स्थान. मराठ्यांनी दिल्लीतील अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला होता. चांदणी चौकातील लक्ष्मीनारायण मंदिर, कालकाजी मंदिराचाही जीर्णोद्धार मराठ्यांनी केला होता. त्यामुळे दिल्ली आणि मराठे यांचे नाते अतिशय विशेष आहे.
 
 
संरक्षण क्षेत्रात 'आत्मनिर्भर'तेचे उद्गाते म्हणजे महादजी
 
 
सैनिकी आधुनिकीकरण करण्यास त्यांनी प्राधान्य दिले, आधुनिकीकरणाचे महत्व त्यांनी ओळखले होते. रायफल आणि तोफा मराठा सैन्यात आणल्या, त्यांचे उत्पादनही भारतात सुरू केले. आज आपण सैन्य आधुनिकीकरण विचार करतो, संरक्षण - शस्त्र उत्पादन आत्मनिर्भर होण्याचा विचार करतो. तोच विचार महादजी यांनी १७व्या शतकात केला होता.
 
  
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121