
अहमदाबाद : भारतभर सध्या पुष्पा सिनेमाची हवा पहायला मिळते आहे. सर्वत्र सध्या पुष्पा सिनेमातील गाण्यांचा ट्रेंड सुरू आहे. या ट्रेंडमधून भारताचा माजी कर्णधार विराट कोहली देखील अलिप्त राहू शकला नाही. विराट कोहली अनेकदा मैदानावर क्षेत्ररक्षण करत असताना डान्स करताना दिसून आला आहे. मजेशीर स्वभवासाठी प्रसिध्द असलेल्या विराटने वेस्ट इंडिज विरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात देखील पुष्पा चित्रपटातील श्रीवल्ली गाण्यावर डान्स केला. त्याचा हा मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
दरम्यान, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विंडीजने संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाकडून प्रथम फलंदाजी करताना सूर्यकुमार यादवने तुफानी फटकेबाजी करत ६४ धावांची खेळी केली. तर केएल राहुलने ४९ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाला ५० षटक अखेर ९ बाद २३७ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघाकडून शरमार्ह ब्रूक्सने सर्वाधिक ४४ धावांची खेळी केली. तर अकील हुसेनने ३४ धावांचे योगदान दिले. हा सामना भारतीय संघाने ४४ धावांनी आपल्या नावावर केला. आणि रोहित शर्माच्या कर्णधार पदाखाली पहिली मालिका जिंकली.