प्रार्थनेची दिशा आणि चर्चची दशा

    07-Dec-2022   
Total Views |
protest church


आपल्याकडील तथाकथित पुरोगाम्यांनी हिंदू संस्कृतीविरोधात बरेच गैरसमज दृढ केले. हिंदू धर्म म्हणजे बुरसटलेला, कर्मकांड मानणारा, महिलांना दुय्यम वागणूक देणारा, अंधश्रद्धांना कुरवाळणारा असा अपप्रचार शतकानुशतके सुरू होता. भारतातही त्याचे पेव फुटले. त्यातच ख्रिश्चन मिशनरींनी धर्मांतराच्या नावाखाली हिंदू धर्माविषयी, देवीदेवतांविषयी, धर्मप्रथांविषयी भारतात इतकी विषपेरणी की, खुद्द काही हिंदू बांधवही आपल्याच धर्मापासून दुरावले. आपल्याच धर्माविषयी, प्रथापरंपरांविषयी त्यांच्या मनात चिड निर्माण झाली. पण, जसजसा काळ पुढे सरकला, माध्यमजगत विस्तारत गेले, देशोदेशीचे अनुभव ऐकता-पाहता-वाचता येऊ लागले, तसतशा ख्रिश्चन धर्मातील अंधश्रद्धा, अजबगजब प्रथा, पादरींचे अत्याचार वगैरे घटना जगासमोर आल्या. आता असाच एक प्रकार केरळमध्ये उघडकीस आल्याने वादंग उभा राहिला असून, परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून चक्क येथील 35 चर्चना तात्पुरते टाळे ठोकायची वेळ स्थानिक प्रशासनावर आली आहे.
त्याचे झाले असे की, केरळमधील सर्वात जुन्या असलेल्या सिरो-मलबार चर्चने रविवारी चर्चमधील प्रार्थना ही पूर्वेकडे तोंड करूनच करावी, असा फतवा जारी केला. आता इतकी वर्षं रविवारची सामूहिक प्रार्थना अर्थात ‘मास’साठी असा कोणताही विशिष्ट नियम नव्हता. त्यातच प्रार्थनेदरम्यान पूर्वेकडे तोंड केल्यावर फादरचा चेहराही दिसत नाही आणि एकूणच आसनव्यवस्थाही बदलावी लागते, असा ख्रिस्ती बांधवांनी आक्षेप घेतला. एवढेच नाही, तर पोपलाही यासंदर्भात पत्र पाठवून वेळीच हस्तक्षेप करण्याची मागणीही केली. परंतु, पोपनेही सर्वांसाठी समान नियमांचाच कित्ता गिरवत, रोमन कॅथलिक चर्चच्या अख्यात्यारित येणार्‍या सिरो-मलबार चर्चच्या आदेशांनाच योग्य ठरवले. त्यामुळे रविवारच्या ‘मास’साठी चर्चमध्ये मोठ्या संख्येने जमणारे ख्रिस्ती नागरिक संतप्त झाले व त्यांनी चर्चविरोधातच घोषणाबाजी करून ‘पूर्वेकडे बघा’चा नियम पाळणार नसल्याचा निर्धार बोलूनही दाखवला. पण, चर्चचे नियम ते नियम, त्यात पोपकडूनही त्याच नियमांचे पालन करा, असे आदेश आल्याने सिरो-मलबार चर्चचीही कोंडी झाली. एकीकडे ख्रिस्ती बांधवांचा रोष आणि दुसरीकडे चर्चची नियमावली! त्यामुळे तणावाची स्थिती लक्षात घेता, येथील 35 चर्चचे दरवाजेच प्रशासनाने काही दिवसांसाठी बंद ठेवले आहेत.


आम्ही सांगू तीच पूर्व दिशा!


ख्रिश्चन धर्माच्या जाणकारांच्या मते, नियमाप्रमाणे चर्चमधील प्रार्थनेदरम्यान अर्धावेळ फादरने प्रार्थनाकर्त्यांकडे बघावे आणि उर्वरित वेळेसाठी पूर्व दिशेकडे तोंड करावे, असाही एक नियम असल्याचे सांगितले जाते. पण, आजही आधुनिक ख्रिश्चन समाज या नियमाचे पालन करताना मात्र दिसत नाही. त्यांच्या मते, प्रार्थनेची जी पद्धत गेल्या 50 वर्षांपासून रुढ आहे, त्यात बदल आम्हाला मंजूर नाही. कारण, पूर्वेकडे बघण्याच्या नियमामुळे प्रार्थनाकर्त्यांना फादरकडे बघता येत नाही. त्यातच फादरलाही देवस्वरुपात बघितले जात असल्याने, त्याच्याकडे न बघता प्रार्थना करणे हे ख्रिस्ती बांधवांना पटणारे नाही. तेव्हा, फादरनेही आमच्याकडे प्रार्थनेच्या वेळी बघू नये, हे न पटणारे असल्याचा दावा प्रार्थनाकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे दिशांचे महत्त्व वगैरे केवळ हिंदू धर्मात असून, इतर धर्म मात्र त्याला अपवाद वगैरे आहेत, हा समज यानिमित्ताने पुनश्च खोडला गेल्याचेच अधोरेखित होते.केरळमध्ये ख्रिश्चन धर्म हा लोकसंख्येच्या बाबतीत तिसर्‍या स्थानावर आहे. जनगणनेच्या आकडेवारीनुसार, केरळमध्ये तब्बल 18 टक्के ख्रिस्ती नागरिक वास्तव्यास आहेत. तसेच, भारतातील ख्रिश्चन धर्माचे जुने चर्च हेदेखील केरळमध्येच असल्याचे सांगितले जाते. एकूणच केरळमध्ये तेथील ख्रिस्ती बांधवांवर स्थानिक चर्चचा आजही प्रचंड प्रगडा दिसून येतो. त्यामुळे केवळ धार्मिकच नाही, तर सामाजिक, राजकीय जीवनातही केरळमधील चर्चचा हस्तक्षेप अजिबात लपून राहिलेला नाही. या चर्चमधील भ्रष्टाचारापासून ते ननवरील बलात्काराप्रकरणी चर्चेत राहिलेल्या बिशप फॅ्रंको मुलक्कलचे प्रकरणही चांगलेच गाजले होते. तसेच काही दिवसांपूर्वीच केरळमधील ‘विझिंगम बंदर’ प्रकल्पाच्या विरुद्ध लॅटिन कॅथलिक चर्चच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन पुकारण्यात आले होते, त्या आंदोलनानेही हिंसक वळण घेतले होते. तेव्हा, केरळमधील चर्चचा दबदबा आणि त्यांचा ख्रिस्ती नागरिकांवरील दबाव वेळोवेळी समोर आला आहेच. परंतु, आता प्रार्थनेची नेमकी दिशा कोणती, यावरून मात्र चर्च आणि ख्रिस्ती नागरिक एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. तेव्हा, आगामी काळात चर्च हे एकूणच प्रकरण सामोपचाराने हाताळते की, ‘आम्ही सांगू तीच पूर्व दिशा’ म्हणत ख्रिस्ती नागरिकांच्या विरोधाला हरताळ फासते, ते आगामी काळात पाहणे महत्त्वाचे ठरेल.





आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची