इंग्रजी माध्यमात शिकूनही शिवकालीन मोडी लिपी आणि मराठी भाषेत सुलेखन करून विविध पुरस्कारांचे धनी बनलेल्या ठाण्यातील नितीनराज चव्हाण यांच्याविषयी...
ठाण्यातील शिवाईनगर येथे राहणारे नितीनराज प्रल्हादराव चव्हाण यांचा जन्म 1979 साली बारामतीतील पणदरे या गावी झाला. वडील मुंबईत नोकरीला असल्याने त्यांचे बालपण तसे आनंदात गेले. इंग्रजी माध्यमात शिकल्यानंतर बारामती येथून इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करुन नितीनराज खासगी कंपनीत रुजू झाले. त्यानंतर 2008 साली विवाहबद्ध होऊन त्यांना कन्यारत्न झाले. सर्व काही सुरळीत सुरु असताना 2016 साली एका किरकोळ अपघातामुळे पायाला दुखापत होऊन तो जायबंदी झाला. त्यामुळे त्यांना तब्बल आठ महिने घरातच सक्तीचा आराम करण्यास डॉक्टरांनी सांगितले. पण, इतका मोठा काळ घरात बसून कसा घालवायचा? हा विचार नितीनराज यांना सतावू लागला.
घरातही चीडचीड वाढली. एके दिवशी त्यांच्या पत्नी आणि चिमुकल्या कन्येने त्यांना धीर देत, आजवर वेळ मिळत नव्हता, म्हणून छत्रपती शिवरायांच्या चरित्रावरील अभ्यास करता येत नव्हता. तेव्हा आता अपघातामुळे वेळच वेळ मिळालाय, असे सांगत या वेळेचा सदुपयोग करण्याची सूचना केली. मग नितीनराज यांनी निर्धार केला की, छत्रपतींवरील अपरिचित इतिहास जाणून घ्यायचा. परंतु, ‘कॉन्व्हेंट’मध्ये शिक्षण झाल्याने हा अभ्यास कसा करायचा? कारण, अभ्यास करायचा तर शिवकालीन मोडी लिपी येणे आवश्यक होते. मोडी लिपी समजली, तरच इतिहासातील दस्तावेज जाणून घेता येणार होते. यासाठी मग त्यांनी फोनाफोनी तसेच इंटरनेटवरून काही माहिती मिळवली, काही जणांना संपर्कही केला. एकाने तर मोडी लिपी फार अवघड आहे. तू इंग्रजी माध्यमात शिकलेला आहेस. तुला जमणार आहे का? असा उपदेश केला. पण नितीनराजने जिद्द सोडली नाही. पुस्तके ऑनलाईन खरेदी करून मोडी लिपीचा अभ्यास सुरूच ठेवला.
मोडी लिपीचा अभ्यास सुरू असतानाच थोडेफार चालता येऊ लागले होते. त्याच दरम्यान ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालयात सात दिवसांची शासनाची मोडी लिपी कार्यशाळा असल्याचे समजताच नितीनराज यांनी तिथे प्रवेश घेऊन मोडी लिपीची परीक्षा दिली. इंग्रजी माध्यमातील असल्याने त्यांना 100 पैकी 80 गुणांचीच प्रश्नपत्रिका सोडवता आली. आश्चर्य म्हणजे, या परीक्षेत नितीनराज यांनी 67 गुण मिळवत प्रथम श्रेणी प्राप्त केली. या घवघवीत यशाने त्याचे मनोबल वाढले. याच आत्मविश्वासाने मग दादर येथील ‘स्वातंत्रवीर सावरकर स्मारक मंडळ’ येथे महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित केलेल्या मोडी लिपी सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत मुंबई विभागातून तिसरा क्रमांक पटकावला. त्याच्या पुढच्या वर्षी मराठी राजभाषा दिनानिमित्त आयोजित स्वाक्षरी स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळविला. अशा लहान-मोठ्या स्पर्धेत भाग घेत असतानाच 2018 साली उत्तर कोकण लिपी मंडळाच्या स्पर्धेतही नितीनराज उपविजेता ठरला.
तेव्हा सुंदर हस्ताक्षर पाहून अनेकानी नितीनराज यांना सुलेखनाविषयी सुचविले. पण, संसाराच्या रहाटगाडग्यात सवडच मिळत नव्हती.त्याचदरम्यान आलेल्या ’कोविड’मुळे लागलेल्या ‘लॉकडाऊन’ने नितीनराज यांना संधी उपलब्ध झाली. मराठीची आवड व मातृभाषेसाठी काहीतरी करायची धडपड याने प्रेरित होऊन, मग घरबसल्या त्यांनी मराठी भाषेत सुलेखन करायचे ठरविले. त्यानुसार, मराठी बाराखडीमधील अ,आ, इ, ई... या 12 स्वरांचा अभ्यास केला आणि हे 12 स्वर त्यांनी विविध 101 पद्धतीने सुलेखित केले. त्याची नोंद ‘ओएमजी’ या संस्थेने घेऊन त्याची रेकॉर्ड म्हणून नोंद केली. त्याचबरोबर ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’नेही दखल घेतली. पुढे राष्ट्रीय कौशल्य विकास परिषद आणि त्याच्याशी संलग्न असलेल्या ‘पेन क्राफ्ट’ संस्थेतर्फे देशपातळीवर कौशल्यावर आधारित आयोजित केलेल्या सुलेखन स्पर्धेत याच 12 स्वरांना विविध पद्धतीने सादर केल्यामुळे पहिला क्रमांक मिळवला. या स्पर्धेत देशाच्या विविध राज्यांतून अनेक स्पर्धक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते, असे नितीनराज सांगतात.
‘कोविड’ काळातही नितीनराज यांनी जमेल, तशी सामाजिक सेवा केली. जेव्हा प्रत्येकजण दुसर्याच्या सावलीलाही घाबरत असे, तेव्हा रुग्णांना बेड मिळवून देण्यापासून ते मृतांना स्मशानात पोहोचवण्यात धीराने पुढाकार घेतल्याचे सांगतात. सध्याची पिढी आपलेपणा आणि मराठी भाषेपासून दुरावत चालली आहे. हिंदी भाषेला विरोध नाही, पण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांनीदेखील त्यांच्या काळात आपल्या मातृभाषेला प्राधान्य दिले होते. छत्रपतींनी मुघल, इंग्रज, डच, पोर्तुगीज आणि इतर राजवटींशी झालेल्या पत्रव्यवहारात त्या पत्रांची उत्तरे मराठी मोडी लिपीतूनच दिली होती. एवढेच नाही, तर राज्यव्यवहारकोश तयार करून त्यात फारसी, उर्दू व अरेबिक शब्दांऐवजी मराठी शब्दांचा वापर केला. छत्रपती थोरले शाहू महाराज यांनीही त्यांच्या कार्यकाळातील राज्य व्यवहारातील मराठी शब्दांच्या वापराचे प्रमाण जवळजवळ 80 टक्क्यांपर्यंत वाढवल्याचा इतिहासही नितीनराज मांडतो. अशा मराठी भाषा आणि मोडीलिपीचा वारसा जपण्यासाठी झटणार्या नितीनराज यांना पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!