मुंबई : गोल देऊळ, मुंबादेवी येथे सकल हिंदू समाजातर्फे रविवार, दि. ४ डिसेंबर रोजी हिंदूंच्या सामूहिक एकतेने ‘जिहादी’ मानसिकतेविरोधात जनआक्रोश सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ता म्हणून उमेश गायकवाड उपस्थित होते. तसेच भाजपचे माजी नगरसेवक अतुल शहा आणि भाजपचे स्थानिक कार्यकर्तेही मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
‘लव्ह ‘जिहाद’ या समस्येवर गेली अनेक वर्षे काम करणार्या उमेश गायकवाड यांनी आजपर्यंत ‘लव्ह जिहाद’च्या प्रेमाच्या सापळ्यात अडकलेल्या ३०० मुलींची ‘घरवापसी’ केली आहे. सभेत मार्गदर्शन करताना याविषयी बोलताना ते म्हणाले की, “पापाचा अंधार हवा असणारे आणि पुण्याचा सूर्योदय हवा असणार्यांमध्ये पुरातन काळापासून संघर्ष सुरुच आहे. पूर्वीही असूरकुलीन घरच्या महिलांना त्रास द्यायचे. आजही अशी असुरी प्रवृत्ती कायम आहे. या प्रवृत्तीवर मात करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र यायला हवे. सध्याचे केंद्र सरकार सक्षम आहे. त्यामुळे आज ना उद्या ‘लव्ह जिहाद’ विरोधात कायदा होईलच.
‘समान नागरी कायदा’ही होईल. मात्र, त्याच्या अंमलबजावणीसाठी आपण जराही कसूर करता कामा नये.” उमेश गायकवाड पुढे बोलताना म्हणाले की, “अनेक वर्षे संघर्ष केल्यानंतर मुंबईत गोवंशहत्या बंदी कायदा झाला. तसाच संघर्ष आपण सगळ्यांनी मिळून ‘लव्ह जिहाद’, ‘लॅण्ड जिहाद’विरोधातही केला पाहिजे. ‘लव्ह जिहादमुक्त मुंबई’ झालीच पाहिजे,” असा निर्धारही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
यावेळी दै. ‘मुंबई तरूण भारत’च्या उपसंपादिका आणि सामाजिक कार्यकर्त्या योगिता साळवी यांनी सभेत मनोगत मांडताना काही सत्य घटनांमधून ‘ लव्ह जिहाद’चे भयंकर सत्य उपस्थितांसमोर मांडले. तसेच “जोपर्यंत हिंदू समाज जातीपातीच्या तुकड्यात जगेल, दुसर्याला समस्या आहे, मग मला काय करायचे, ही मनोवृत्ती असेल, तोपर्यंत मुलींचे तुकडे करणार्यांविरोधात हिंदू समाज सक्षमपणे लढू शकणार नाही, ”असे विचार त्यांनी मांडले.
यावेळी सामाजिक कार्यकर्त्या रिटा गुप्ता, अॅड. नेहा यांनीही मार्गदर्शन केले. ‘लव्ह जिहाद’ प्रकरणात मुली फसतात, त्याला कारणीभूत कोण? आपल्या मुली ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात अडकून बळी जाऊ नये, याविषयी काय केले पाहिजे, यावर या दोघींनी मार्गदर्शन केले.
यावेळी हिंदू जागरण मंचाचे महेश भिंगार्डे, धर्म जागरण मंचाचे शशिकांत दळवी, स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानचे योगेश प्रभू, रायगड संवर्धन समितीचे निलेश पवार, हिंदू जनजागृती समितीच्या धनश्री केळशीकर, अॅड. मंदार टेमकर, सकल हिंदू मराठा समाजाचे पराग मोहिते, सकल मराठा समाजचे अनिल सुर्वे आणि मुंबादेवीमधील विविध समाजांतील प्रमुख प्रतिनिधी, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते आणि शेकडो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत दळवी यांनी केले.
‘लव्ह जिहाद’ला मुळापासून संपवण्याची गरज
‘लव्ह जिहाद’ विरोधात गल्लोगल्ली जनजागृती होणे गरजेचे आहे. ‘लव्ह जिहाद’मुळे केवळ हिंदू मुलींचेच नाही, तर त्या कुटुंबाचे आणि समाजाचेही नुकसान होते. ते विस्कळीत होतात. ‘लव्ह जिहाद’ समस्येला मुळापासून संपवण्याची गरज आहे. केवळ लोकप्रतिनिधी म्हणून नाही, तर एक हिंदू म्हणून आज मी इथे संकल्प केला आहे की ‘लव्ह जिहादमुक्त मुंबादेवी’ करण्यासाठी तन-मन-धन अर्पून काम करणार आहे.
-अतुल शहा, माजी नगरसेवक, भाजप