संकटग्रस्त महिलांसाठी आधाराची काशी

    04-Dec-2022   
Total Views |
 

kashibai
 
 
 
 
आज वयाच्या 73व्या वर्षी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात गरजूंना, महिलांना मदतीचा हात देणार्‍या काशिबाई जाधव यांच्या जीवनकार्याचा परिचय करुन देणारा हा लेख...
 
 
समाजसेवेचे व्रत अंगीकारलेल्या काशिबाई गेल्या दोन दशकांहून अधिक काळ महिलांचे अनेक प्रश्न सोडविण्यासाठी अग्रेसर आहेत. विशेष म्हणजे, वयाच्या 73व्या वर्षीदेखील त्यांच्यातील उमेद तसूभरही कमी झालेली नाही. त्यांचा उत्साह एखाद्या तरुणाला लाजवेल इतका असल्याचे नेहमीच दिसून येते. वयाच्या 73व्या वर्षीही समाज कार्यात स्वत: ला झोकून देणार्‍या काशिबाई जाधव यांचा जीवनप्रवास जाणून घेऊया.
 
 
काशिबाई यांचा जन्म दि. 30 नोव्हेंबर, 1950 मध्ये झाला. त्यांचे बालपण कळव्यातील खारेगावमध्ये गेले. माहेरच्या पाटील असलेल्या काशिबाईंचे वडील रेल्वेत, तर आई मासेविक्रीचा व्यवसाय करीत असे. काशिबाई यांना सात भावंडं. त्यात त्या घरात थोरल्या. आईवडील हे कामानिमित्त घराबाहेर पडत. त्यामुळे इतर सात भावंडांना सांभाळण्याची जबाबदारी काशिबाई यांच्यावर आपसूकच पडत असे. त्यांची घरची परिस्थिती तशी बेताची होती. त्यामुळे आईवडील कामानिमित्त घराबाहेर पडल्यावर भावंडांना सांभाळण्याची जबाबदारी वयाच्या दहाव्या वर्षीच काशिबाईंवर आली. या सगळ्या जबाबदार्‍यांमुळे त्यांना केवळ पाचवीपर्यंतच शिक्षण घेता आले. मात्र, सामाजिक कार्याची त्यांच्यामध्ये आवड होती. कोणी अडचणीत असेल, तर त्यांच्या मदतीला धावून जाणे, भांडण सोडविणे असे त्यांचे काही ना काम काम सुरूच असायचे. 1971 साली त्यांचा विवाह झाला आणि काशिबाई डोंबिवलीकर झाल्या. विवाहानंतरही त्यांच्या कार्यात कोणताही फरक पडला नाही. समाजातील विशेषत: महिलांचे अनेक प्रश्न सोडवताना पुरूषही कधी जिथे मागे राहतात, तिथे काशिबाईंनी पुढाकार घेतला. या समाजकार्यात त्यांना पती एकनाथ जाधव यांचीदेखील साथ लाभली. त्यांच्या पतीनेदेखील त्यांच्यासोबत विविध प्रसंगांमध्ये काम करुन आपले योगदान दिले.
 
 
काशिबाई यांनी बहुतांश प्रश्न हे सामंजस्यातून सोडविले. आगरी समाजात जन्मलेल्या काशिबाईंनी समाजकार्यात स्वत:ला अक्षरश: झोकून देत स्वत:चे कर्तृत्व सिद्ध केले आहे. समाजसेवेचे घेतलेले व्रत आज या वयातही त्या अगदी लीलया पेलत आहे. केवळ महिलांचेच प्रश्नच नव्हे, तर एखाद्या प्रभागात पाणी येत नसेल, तर ते सोडविण्यासाठी त्या नेहमीच पुढाकार घेतात. समाजातील विविध स्तरांतील महिलांचे सामाजिक व व्यक्तिगत प्रश्न असो त्या यशस्वीपणे सोडवितात. महिलांचे प्रश्न कोणत्याही भांडणतंट्याशिवाय सोडावण्याकडे त्यांचा विशेष भर असतो.
 
 
अशा या काशिबाईंना मात्र कौटुंबिक परिस्थिती बेताची असल्याने स्वत:चे शिक्षण अर्धवट सोडावे लागले होते. त्यामुळे शाळेत प्रवेश न मिळणार्‍यांसाठीही त्या धावून जातात. त्यातूनच त्यांची शिक्षणाविषयी असलेली तळमळ दिसून येते. तसेच आपण शिक्षण पूर्ण करु शकलो नाही तरी इतरांचे शिक्षण मात्र थांबता कामा नये, या उद्देशाने काशिबाई आजही तितक्याच जोमाने प्रयत्नशील दिसतात.
 
 
काशिबाई या महिला दक्षता समितीवरही कार्यरत होत्या. या काळातसुद्धा त्या महिलांवर होणार्‍या अत्याचार व अन्यायाविरुद्ध लढा देऊन, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असत. हुंडाबळीच्या प्रकरणात महिलांना सर्वतोपरी मदत करणे, अपहरण झालेल्या मुलामुलींची सुटका करणे, सासरच्या मंडळींकडून महिलांची होणारी पिळवणूक व छळ थांबविणे, आत्महत्येपासून परावृत्त करणे, नवरा-बायकोमधील तंटे सामोपचाराने सोडविणे, शरीरविक्रीच्या व्यवसायातून मुलींची सुटका करणे, आत्महत्या की खून या प्रकरणांचा तपास करताना पोलिसांना सहकार्य करणे, जाळून घेतलेल्या किंवा जाळण्यात आलेल्या महिलांचे जबाब नोंदवणे, मृत महिलांचे पंचनामे करण्यास मदत करणे व बारवरील धाडींदरम्यान मुद्देमाल जप्त करणे यात त्या नेहमीच पुढाकार घेत असतात.
 
 
काशिबाईंमध्ये धाडसी वृत्ती असल्याने त्यांनी एका खून प्रकरणालादेखील वाचा फोडली होती. पनवेल ग्रामीण भागात एका महिलेच्या हत्येप्रकरणी त्यांनी लक्ष घातले होते. या प्रकरणात आरोपींकडून पुरावेही नष्ट करण्यात आले होते. मात्र, काशिबाईंनी केलेल्या पाठपुराव्यामुळे खूनप्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. अशा काही प्रकरणांमध्ये त्यांना दमदाटी आणि जीवे मारण्याच्या धमक्याही वेळप्रसंगी आल्या. परंतु, अशा धमक्यांना खमक्या असलेल्या काशिबाई कधीही डगमगल्या नाहीत. त्यांनी आपले काम कोणालाही न घाबरता जनतेसाठी, महिलावर्गासाठी अवितरपणे सुरुच ठेवले.
 
 
आज त्यांचे कार्य आता केवळ ठाणे जिल्ह्यापर्यंतच मर्यादित राहिलेले नसून मुंबईसह, नवी मुंबई, पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर येथील सामाजिक संघटनांनी त्यांच्या कार्याची विशेषत्वाने दखल घेतली आहे. काशिबाई यांना मिळालेले अडीचशेहून अधिक पुरस्कार हीच त्यांच्या कामाची खरी पोचपावती ठरली आहे. आपल्या या समाजकार्याविषयी सांगताना काशीबाई सांगतात की, “मी करत असलेले काम म्हणजे समाजऋण उतरण्याचा प्रयत्न आहे.” काशिबाई यांच्या समाजकार्याची विविध जिल्ह्यांतून, विविध संघटनांकडून वेळोवेळी दखल घेण्यात आली आहे. मात्र, डोंबिवलीत काही प्रतिष्ठित संस्थांकडून दिल्या जाणार्‍या पुरस्कारांसाठी अद्याप त्यांच्या कार्याची दखल घेतली गेलेली नाही, याबाबत शहरातही आश्चर्य व्यक्त होताना दिसते.
 
 
तेव्हा, अशा या काशिबाईंसारख्या सामाजिक व्रत स्वीकारलेल्या हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वाला त्यांच्या पुढील कार्यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.