मुंबई : “अमेरिका, ब्रिटनसह अन्य देशात मंदीचे सावट अधिक गडद होत असले, तरी योग्य नियोजन केल्यास भारत अन्य देशांच्या तुलनेत अधिक मजबूत होईल,” असा आशावाद प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी व्यक्त केला आहे.
“जगातील अनेक देशांच्या मध्यवर्ती बँका आक्रमकपणे त्यांचे व्याजदर वाढवत आहेत. त्यामुळे जागतिक मंदीची भीती दिवसेंदिवस अधिक वाढत आहे. ब्रिटन आधीच आर्थिक मंदीच्या गर्तेत सापडला आहे, तर अमेरिकेच्या ‘युएस फेडरल रिझर्व्ह’देखील व्याजदरांबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे अमेरिकेवर मंदीचे ढग वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीने घेतलेल्या मुलाखतीत अदानी यांनी देशाच्या आर्थिक अवस्थेबाबत परखडपणे मत मांडले.
२०२३ मध्ये भारत मंदीच्या गर्तेत सापडेल का? यावर उत्तर देताना गौतम अदानी म्हणाले की, “मी खूप आशावादी आहे आणि कधीही आशा सोडत नाही. यापूर्वी २००८च्या जागतिक मंदीच्या काळात भारतातील आर्थिक संकटाबाबत असे अनेक लोक बोलले होते. परंतु, भारताने ते चुकीचे सिद्ध केले. देशाच्या पुढील अर्थसंकल्पात या सर्व गोष्टींची दखल घेतली जाईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गौतम अदानींची घौडदौड...
२०२२ मध्ये जगभरातील अब्जाधीशांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली होती आणि त्यापैकी बहुतेकांच्या संपत्तीत घट झाली होती, अशा काळात भारतीय उद्योगपती गौतम अदानी हे एकमेव उद्योगपती होते ज्यांच्या संपत्तीत घट झाली नाही. मंदीच्या काळातही त्यांनी चांगली कमाई केली. सध्या गौतम अदानी हे जगातील तिसर्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत.
अदानी यांच्या मते,“ भारताची अर्थव्यवस्था झपाट्याने वाढत आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांपैकी एक ट्रिलियन डॉलर ‘जीडीपी’साठी ५८ वर्षे लागली, १२ वर्षांत दोन ट्रिलियन आणि आणखी पाच वर्षांत तीन ट्रिलियन. पण आता आपण ज्या वेगाने वाढत आहोत, ते पाहता, असे वाटते पुढच्या दशकात, दर १२ ते १८ महिन्यांनी, आपण ‘जीडीपी’मध्ये एक ट्रिलियन डॉलर्सची भर घालू. भारताच्या प्रगती आणि समृद्धीबद्दल मी खूप आशावादी आहे,” असे अदानी यांनी म्हटले आहे. २०५० पर्यंत जगातील सर्वात जास्त मध्यमवर्गीय लोकसंख्या आपल्याकडे असेल. या सगळ्यामुळे देशाला प्रगतीच्या दिशेने नेत असताना भारत ३० ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास अदानी यांनी व्यक्त केला आहे.
भांडवली खर्च, रोजगार आणि सामाजिक सुरक्षेकडे लक्ष दिल्यास मंदीचा सामना करून भारत आर्थिकदृष्ट्या पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल, असा मला ठाम विश्वास आहे. मी नेहमीच आशावादी असतो.
-गौतम अदानी, उद्योजक
भारताच्या अर्थव्यवस्थेची वाटचाल
- १ ट्रिलियन डॉलर जीडीपीसाठी ५८ वर्षे
- २ ट्रिलियनसाठी १२ वर्षे
- ३ ट्रिलियनसाठी ५ वर्षे
- १ ट्रिलियनची भर पुढील दशकात दरवर्षी
- ३० ट्रिलियन २०५० पर्यंत