नवी दिल्ली : “वाहन उद्योगावर लादण्यात आलेले अवाजवी कर आणि कार असणे म्हणजे चैन नव्हे, या बाबींमध्ये बदल केला तरच भारत चीनशी बरोबरी करु शकेल. वाहन उद्योगावर लावण्यात आलेली सध्याची प्रचलित पद्धती कायम ठेवल्यास भारतला चीनशी बरोबरी करण्यास तब्बल १४० वर्षे लागतील,” असे विधान मारुती उद्योग समूहाचे अध्यक्ष आर. सी. भार्गव यांनी केले आहे.
विविध कारणांमुळे वाहन उद्योग संकटात सापडला असून जुन्याच समाजवादी पद्धतीने कार खरेदी करणार्यांसाठी कर आकारण्यात येतात. त्यामुळे या उद्योगाची अपेक्षित भरभराट होत नसल्याचेही भार्गव यांनी म्हटले आहे. ८८ वर्षे वयाचे भार्गव हे वाहन उद्योगातील देशातील सर्वात जुने जाणते व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. गेल्या दशकभरात वाहन उद्योगाचा ज्या गतीने विकास व्हायला हवा तसा तो झालेला नाही. २००० मध्ये सर्वाधिक १२ टक्के वाढ या क्षेत्रात झाली होती. त्यानंतरच्या दशकात ती अवघी तीन टक्के राहिली आहे.
भारतात दर हजारी ३० जणांकडे कार आहे. हेच प्रमाण चीनमध्ये १७० आहे. सध्याच्या गतीने चीनशी बरोबरी करण्यासाठी भारताला तब्बल १४० वर्षे लागतील असेही भार्गव यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. प्रदूषण आणि सुरक्षा या बाबींबाबत असलेली नियमावली या क्षेत्रात नव्याने पदार्पण करणार्या उद्योजकांसाठी हानीकारक ठरत असल्याचेही भार्गव यांनी म्हटले आहे.
भारतात कार उद्योगासाठी २८ टक्के ‘जीएसटी’ लागू करण्यात आला आहे. हाच कर एसयूव्ही या प्रकारातील कारसाठी ५० टक्क्यांपर्यंत भरावा लागतो. युरोपीय देशात १९ टक्के, तर जपानमध्ये केवळ दहा टक्के कर आकाररण्यात येतो.
कार असणे ही चैनीची बाब मानण्यात येत असल्यामुळे त्यावर जास्त कर आकारण्यात येतो, अशी येथील लोकांची धारणा आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना वाटते की, कारसाठी आकारण्यात येणारे कर हे योग्यच आहेत. मात्र, यामुळे या क्षेत्राचा अपेक्षित विकास होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. वाहन उद्योगावर अवाजवी आकारण्यात येणारे कर कमी करण्याचे धाडस भारताने दाखवायला हवे, त्यातुनच या क्षेत्राची तसेच देशाचीही प्रगती होईल, त्यातुनच आपण जागतिक स्पर्धेत तग धरू शकू असा सल्लाही भार्गव यांनी दिला आहे.
राज्य आणि केंद्र सरकारच्या दृष्टीने वाहन उद्योग जोपर्यंत सुख आणि चैनीच्या श्रेणीत असेल तोपर्यंत या क्षेत्राची अपेक्षित प्रगती होणार नाही. करांचे नियमन करणार्यांनी बाजारपेठेतील सत्यता दुर्लक्षित केली आहे.
-आर. सी. भार्गव, चेअरमन, मारुती उद्योग समूह