मुंबई : नागपूरमधील विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. "एका ३२ वर्षांच्या तरुणाला हे खोके सरकार घाबरलंय आणि म्हणून बदनामीचे प्रयत्न होत आहेत. घोटाळेबाज, गद्दार मुख्यमंत्री हे ज्या एका प्रकरणात सापडलेले आहेत, त्या प्रकरणावरून विरोधकांना रोखण्याचा प्रयत्न ते करत आहेत. सत्ताधारी पक्षाचे आमदार सतत विधानसभेत गोंधळ घालत आहेत. आणि विधानसभेचे अध्यक्ष आम्हाला बोलूच देत नाहीत. सत्ताधारी पक्षातील १४ जणांना पाठोपाठ बोलू दिलं गेलं. यानंतर मग सभागृह स्थगित करायचं आणि पुन्हा तेच करायचं. अडीच वर्षात मी कधीच अशा प्रकारे विधानसभेचं कामकाज होताना बघितलं नाही." अस युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे म्हणाले.
ते म्हणाले, "आम्ही राज्यपाल हटाव ही मागणी सतत करत आहोत. या महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांविरोधात आंदोलन करत आहेत. महापुरुषांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांना वाचवण्यासाठी, मुख्यमंत्र्यांना वाचवण्यासाठी हा प्रयत्न सुरु आहे. मुख्यमंत्र्यांविरोधात आम्ही NIT घोटाळा उघडकीस आणला आहे. सभागृहात यावर चर्चाच होऊ नये, यासाठी हा मुद्दा उकरून काढला आहे. यावरून 32 वर्षाच्या तरुणाने खोके सरकारला हलवून ठेवलंय, हेच दिसून येतं." अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली.
शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी काल दिशा सालियान आणि सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली. सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूपूर्वी मैत्रीण रिया चक्रवर्ती हिच्या फोनवर AU नावाने ४४ कॉल आले होते, हा AU नावाने कुणाचा नंबर सेव्ह होता, याची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. AU चा संबंध आदित्य उद्धव ठाकरेंशी आहे का? हे एकदा समोर आलं पाहिजे, अशी मागणी करत आज सकाळपासूनच सत्ताधाऱ्यांनी जोरदार मागणी केली. विधानभवन परिसरातच भारत गोगावले आदी नेत्यांनी ये AU AU क्या है… अशा आशयाचे बॅनर घेऊन जोरदार घोषणाबाजी केली.