सर्व साधनांच्या बाबतीत एक मजेशीर बाब म्हणजे कर्म, योग, धर्म, दान भोग ही साधने समाधान मिळवून देतील, यावर माणसाचा विश्वास असतो. हे सर्व प्रयोग आलटून पालटून अथवा अंशत्वाने करुन माणूस सुख शोधण्याचा प्रयत्न करतो. पण, नामस्मरणासारख्या सोप्या साधनावर माणूस विश्वास ठेवायला तयार नसतो. नामस्मरणातून सुख मिळेल, असे त्याला वाटत नाही. परंतु, हा बुद्धीचा किंवा तर्काचा विचार नसून तो अनुभूतीचा विषय आहे. यासाठी अनुभवातून स्वामी सांगतात, ते या श्लोकाच्या तिसर्या ओळीत आले आहे.
रोज प्रभातकाली मनात रामाचे चिंतन करावे, असे रामदासस्वामींनी मागील नऊ श्लोकांतून सांगितले आहे. त्या श्लोकांत स्वामींनी अनेक प्रकारांनी नामस्मरणाचे, रामनामाचे महत्त्व विशद केले आहे. ते आपण आतापर्यंत पाहिले. प्रपंचात काय किंवा अध्यात्मात काय कोणावरही आपल्या विचारांची बळजबरी करून चालत नाही. भक्तिमार्गात ‘हेच कर,’ ‘असेच कर’ असे सांगून चालत नाही. प्रत्येकजण आपल्या कुवतीप्रमाणे विचार करून स्वत: ठरवत असतो. एखादी गोष्ट लादली जाण्यापेक्षा ती स्वत:च्या विचारांनी, प्रचितीने स्वीकारणे हिताचे असते. परंतु, अनुभवी माणसाकडून त्यातील बारकावे समजून घ्यावे लागतात. यासाठी समर्थांनी नामस्मरणासंबंधी वेगवेगळ्या बाजू समजावून सांगून वाचकांचे मन निर्णय घेण्यासाठी तयार केले आहे.
महाभारतातील वर्णनानुसार, भगवान श्रीकृष्णांनी हीच पद्घत वापरली आहे. युद्घप्रसंगी अर्जुनाचे मन मोहग्रस्त झाले होतेे. तो आपले कर्तव्य विसरला होता. अर्जुनाच्या भ्रांत मनाला ताळ्यावर आणण्यासाठी श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे, अर्जुनाला ‘सांख्ययोग’, ‘ज्ञानयोग’, ‘कर्मयोग’, ‘ध्यानयोग’, ‘योगमार्ग’, ‘भक्तियोग’ हे सारे समजावून सांगितले. त्याला विश्वरूप दर्शन घडवून हेही सांगितले की, “अर्जुना, तू यांना मारले नाही. म्हणजे ते मरणार नाहीत, असे थोडेच आहे. ते सारे काळाचे भक्ष्य आहेत आणि तो काळ मी आहे.” भगवंतांनी अर्जुनाला तर्हेतर्हेने त्याच्या क्षात्रधर्माची आठवण करून दिली. सत्यासाठी असत्याचा नाश करणे, हा क्षत्रियाचा धर्म आहे. हे सर्व गुह्यज्ञान सांगून झाल्यावर भगवंतांनी अर्जुनाला तू अमूकच कर, असे न सांगता विचार करून तुला हवे ते तू कर, असे सांगितले.
इति ते ज्ञानमाख्यातं गुह्याद्गुह्यतरं मया।
विमृश्यैतद्शेषेण यथेच्छसि तथा कुरू॥ (१८-६३)
याप्रमाणे समर्थांनीही कर्म, धर्म, योग या मार्गातील अडचणी सांगून सर्वसामान्य माणसांनी कुठे विश्वास ठेवावा, हे सांगितले आहे. तो विषय पुढील श्लोकाचा असून मनाच्या श्लोकांतील, ‘प्रभाते मनीं राम चिंतीत जावा’ या प्रकरणातील हा शेवटचा श्लोक आहे.
नव्हे कर्म ना धर्म ना योग काहीं।
नव्हे भोग ना त्याग ना सांग पाहीं।
म्हणे दास विश्वास नामीं धरावा।
प्रभाते मनीं राम चिंतीत जावा॥ ७६॥
समर्थकाळी कर्म, धर्म, योग, दान, त्याग या अध्यात्ममार्गातील प्रगतीच्या क्रिया आहेत, असे समजले जात होते. या क्रिया आचरल्याने मनुष्य चांगले जीवन जगतो, असे लोक मानत असत, पण ही विचासरणी पुढे तशीच राहिली नाही. आज तर या सर्व क्रिया ग्रंथांतच राहिल्या. थोड्या फार प्रमाणात त्यांचे अनुशेष वेगळ्या रूपात राहिले, पण माणसांना त्यात समाधान सापडत नाही. समर्थांनी त्यांच्याकाळी हे ओळखून समाधान प्राप्तीसाठी नामस्मरण करावे, या क्रिया उपयोगी पडत नाहीत, हे सांगितले. कालमानाप्रमाणे या क्रियांत बदल होत गेले. त्यामुळे त्यात समाधान शोधताना कोणकोणत्या अडचणी येतात, याचे दिग्दर्शन ज्ञात्या पुरूषाने समाजाला केले पाहिजे, या भूमिकेतून समर्थ प्रस्तुत श्लोकात या क्रियांनी समाधान साधते का, ते तुम्ही पाहा, असे सांगत आहेत.
यापूर्वी समर्थांनी सदाचाराचे महत्त्व वारंवार सांगितले आहे, ते व्यक्ती आणि समष्टी दोघांच्याही हिताचे आहे, हे मान्य करावे लागते. सर्व आध्यात्मिक साधनांचे ध्येय सदाचार असले पाहिजे. त्याशिवाय समाधान मिळणार नाही. सर्वसाधारण माणसाची वृत्ती धरसोडीची असते. एक साधन आचरित असताना दुसरे त्यापेक्षा चांगले परिणाम करते का, असा विचार मनात येतो. दुसरे साधन आचरून बघावे, तर आणखी वेगळ्या साधनांनी लवकर समाधान मिळेल का, असा विचार मन करते. यासंबंधी निश्चय करण्यात आयुष्याची अनेक वर्षे निघून जातात. या सर्व आध्यात्मिक साधनांचे माणसाला आकर्षण असते, पण त्यातील अडचणी समजत नाहीत. म्हणून समर्थ सांगतात की, “तू विचार करून ठरव की, या साधनांचे यथासांग आचरण शक्य आहे का?” कर्मयोगाचा विचार केला तर त्यातील अंतर्बाह्य शूचिता पाळता येईल का? सामाजिक व्यवहार सांभाळताना लोकांत राहून ते पूर्णपणे शक्य होणार नाही. धार्मिक वृत्तीने राहायचे ठरवले, तरी अनेक अडचणी आहेतच.
देवतार्चन, पूजाअर्चा, तीर्थयात्रा, दानधर्म यथासांग पार पाडता येत नाहीत. त्यासाठी पुष्कळ द्रव्य, चांगले शरीर, सभोवतालचे सहकार्य यावर अवलंबून राहावे लागते. समर्थकालीन धार्मिक, राजकीय, सामाजिक स्थिती प्रतिकूल म्हणावी लागेल. सतराव्या शतकात राज्य म्लेंच्छांच्या ताब्यात होते. त्याकाळात मूर्तिपूजा करणे, देवळे बांधणे यांना मनाई होती. शहाजहानच्या एका हुकूमावरून काशी क्षेत्रातील ७५ देवळे उद्ध्वस्त करण्यात आली. औरंगजेब हा हिंदूद्वेष्टा होता. हे बादशहा मूर्तिभंजक होते. हे बादशहा आणि त्यांचे सरदार लोकांवर अनन्वित अत्याचार करीत. हिंदूंना आपला जीव, आयुष्य वाचवणे कठीण होते. मग कसले कर्मकांड अन् कसला धर्म? धार्मिक आचरण फारच कठीण होते.
आता योगाचा विचार करु. योग साधायचा तर चित्तवृत्तींचा विरोध करुन मन शांत ठेवावे लागते. लोकांना नित्याचे जीवन जगण्यासाठी धडपड करावी लागते. त्यात योग साधनेसाठी मन शांत ठेवण्याच्या अभ्यासाला वेळ कुठून मिळणार? योगासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी, सात्विक अन्न, मन प्रसन्न करणारा निसर्ग यांची पार्श्वभूमी असणे आवश्यक असते. आज या सर्वांचीच वानवा आहे. त्यामुळे योगातील यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार या प्राथमिक क्रिया साधणे कठीण! मग ध्यान-धारणा-समाधी या अवस्था कोसो दूर. दानाचे पुण्य मिळवायचे म्हटले, तर सांपत्तिक स्थिती चांगली असावी. बरं, सांपत्तिक स्थिती अनुकूल आहे, तरी दान कोणाला करावे हाही प्रश्न आहेच. दान सत्पात्री झाले, तर त्याचा उपयोग अन्यथा दानाचा विपरित परिणाम शक्य आहे.
संत तुकाराम महाराज म्हणतात, “सर्वांभूती द्यावे अन्न। द्रव्य पात्र विचारुन।”एकंदरीत काय, दानाचा विचार करुन समाधान मिळवणे कठीणच. त्यानंतरचा विचार भोगाचा. भोग भोगून समाधान मिळवावे, तरी तेही अवघड. भोग माणसाला तृप्त करीत नाहीत. भोग आसक्ती वाढवतात. त्यातून अंतिमत: दु:ख वाट्याला येते. भोगाला मर्यादा असते. मर्यादेपलीकडील भोग नुकसान करतात. त्यामुळे ‘भोग’ या साधनाचा प्रश्न निकालात निघतो. या सर्व साधनांच्या बाबतीत एक मजेशीर बाब म्हणजे कर्म, योग, धर्म, दान भोग ही साधने समाधान मिळवून देतील, यावर माणसाचा विश्वास असतो. हे सर्व प्रयोग आलटून पालटून अथवा अंशत्वाने करुन माणूस सुख शोधण्याचा प्रयत्न करतो. पण, नामस्मरणासारख्या सोप्या साधनावर माणूस विश्वास ठेवायला तयार नसतो. नामस्मरणातून सुख मिळेल, असे त्याला वाटत नाही. परंतु, हा बुद्धीचा किंवा तर्काचा विचार नसून तो अनुभूतीचा विषय आहे. यासाठी अनुभवातून स्वामी सांगतात, ते या श्लोकाच्या तिसर्या ओळीत आले आहे. समर्थ म्हणतात, ‘म्हणे दास विश्वास नामीं धरावा।’ समर्थांसारख्या अनुभवी संतमहात्म्याचे हे उद्गार आहेत. त्याचे आचरण करुन प्रभातकाली रामाचे चिंतन केले, तर आपला दिवस प्रसन्न जाईल आणि आयुष्य उद्धरुन जाईल.