अन्य धर्मपंथीयांनी साधनेतील शुद्ध आचार विचारांचे रहस्य न ओळखल्यामुळे त्यांच्यात स्वैराचार, मद्य-मांस खाण्याचे प्रकार धर्मसंमत मानले आहेत. खरा योगी कधीच मद्य-मांस भक्षण करू शकत नाही. कारण, उत्क्रांतीत मानवी शरीराची दंतरचना आणि आतड्याची लांबी हेच दर्शविते की, मद्य-मांस मानवाचे अन्न-पेय नाही. मानवाखालील लागून असलेले माकड, गाय, बकरी इत्यादी अनुत्क्रांत योनींचे खाद्य मद्य-मांस नाही. वैदिक परंपरेनेच हे ओळखल्यामुळे वैदिक आचार परंपरेत मद्य-मांसाचा निषेध आहे.
इतर धर्मपरंपरेत मुद्दाम धर्मवचनांना धरून मद्य-मांस पवित्र मानून ग्रहण केले जाते. मद्य-मांस भक्षण करणारा साधक उत्क्रांत अवस्था प्राप्त करणारा उच्च साधक होऊच शकत नाही. धर्माच्या नावावर सर्वत्र पशुव्यवहार चालला आहे, हे एक सत्य आहे. हिंदूंचा द्वेष करण्याची वृत्ती त्यांच्या धर्म शिकवणुकीची विकृती दाखविते. धर्माच्या नावावर सर्वत्र हैदोस घालून रक्तपात, जाळपोळ, बलात्कारासारखे सर्व प्रकार झाले आहेत व आजही होत आहेत. काही पंथातील लोकांना येनकेन प्रकारे इतर मानवांना आपल्या कथित पवित्र धर्मात आणून आपली संख्या वाढवून आपल्या दयाळू परमेश्वराला त्या कृत्यांद्वारे प्रसन्न करण्याची इच्छा उत्पन्न होत असते. या सर्व गोष्टींचे मूळ कारण अशुद्ध शरीर, संस्कार, मन, बुद्धी हे होत. योग्य आचार-विचार केल्यास कोणत्याही मतपंथाच्या साधकाद्वारे असले अनाचार आणि अत्याचार कदापि होणार नाहीत. वैदिक परंपरा या सर्व गोष्टींची साक्ष आहे.
साधनेत प्रगती झाल्यावर साधकाला बाहेरून कमीत कमी वस्तूंची आवश्यकता असते. त्याचा आहार कमी आणि निर्मांस बनतो. त्याची झोपसुद्धा कमी होते. इच्छाही कमी होऊन तो अधिकाधिक निरीच्छ बनत जातो. धन व कपडेही त्याला अधिक लागत नसतात. म्हणून भगवान राम, श्रीकृष्ण, गौतम बुद्ध व महावीर यांच्या अंगावर फारशी वस्त्रे अथवा अलंकार दाखविले नाहीत. चुकीच्या कल्पनांमुळे आपण दैवत मूर्तींच्या अंगावर भरपूर दागिने दाखवीत असतो. थोर वैदिक परंपरेचे हे अध:पतन आहे. आपल्या मनातील अतृप्त इच्छांना धरून आपण असे वागत असतो. या विटंबनेतून नाही म्हणायला एक देवता वाचली आहे आणि ती म्हणजे भगवान शंकर होय. त्यांचे वैराग्य त्यांना स्मशानात बसवून स्वत:च्या इच्छारूप प्रेताचे भस्म करून ते सर्वांगाला लावायला लावते. समाजातील लोकांना बरे वाटावे म्हणून महादेव एक वस्त्र मात्र परिधान करतात. बौद्ध आणि जैन राजे असूनही अलंकार तर नाहीच, पण वस्त्रांचासुद्धा त्याग करतात. त्यांचे प्रतिमा-आदर्श, उच्च व उन्नत आहेत यात शंका नाही.
आध्यात्मिक साधनेकरिता इतक्या धर्मपंथांची आवश्यकता नसते. समाजातील मागील चालीरीतीत अनाचार माजून साधक अध:पतनाच्या मार्गावर जात असतो म्हणून त्याला असल्या अध:पतनापासून वाचविण्याकरिता गत काळात वारंवार महापुरूष निर्माण झाले आहेत. त्यांनी आपली साधनामते लोकांसमोर मांडली. ते असेपर्यंत त्यांनी आपल्या मतांचा प्रचार केला, ते निघून गेल्यानंतर त्यांच्या शिष्यांनी त्यांच्या मतांचे आग्रहाने अवडंबर करून त्यांच्या मतांना धर्माचे सांप्रदायिक आणि द्वेषमूलक स्वरूप दिले. मुसलमान धर्मप्रचार तर पूर्वीपासूनच आक्रमक व हिंसाचारी होता. वैदिक परंपरेत कोणत्याही व्यक्तिचा, धर्माचा, मताचा अथवा सांप्रदायाचा डांगोरा पिटला जात नाही. योगी हा कोणत्याच धर्ममताचा नसतो. तो सर्व संप्रदायांच्या वर म्हणजे व्रात्य असतो. दुर्दैवाने मराठीत ‘व्रात्य’ या शब्दाचा चुकीचा आशय लावला जातो. पण ‘व्रात्य’ म्हणजे सर्व मतसंप्रदायांच्या वर असलेला, उच्च धारणायुक्त संयमी साधक होय. वैदिक परंपरेतील संन्याशांना असलेच व्रात्य बनण्यास सांगितले आहे. जुने कुटुंब, नाव, जुना समाज आणि धर्मप्रकार त्यागून त्याला नवजीवन स्वीकारायचे असते. सर्व वृत्तींचा संन्यास म्हणजे खरा संन्यासी होय. योगी असाच असतो. गीता असल्या उच्च अवस्थेचे वर्णन करते -
काम्यानां कर्मणां न्यासं सन्यासं कवयो विदुः।
सर्वकर्मफलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणाः॥
काम्य कर्मांचा न्यास म्हणजे संन्यास असून कर्मांच्या फलाची इच्छा धरणार्या वृत्तींचा त्याग म्हणजे त्याग होय. त्याकरिता मनावर उच्च संस्कार करावे लागतात. केवळ भोग अथवा कल्पनांच्या आहारी जाणे हा धर्म नाही. सभ्यता आणि संस्कृती मनाची क्रिडांगणे आहेत. भौगोलिक परिस्थिती आणि मनावर झालेल्या संस्कारांना धरून ज्या ज्या कल्पना रूढ होतात त्यांच्या पायावर सभ्यतेच्या इमारतीची उभारणी होत असते. समाजधारणेकरिता कोणत्या उच्च संस्कारांची आवश्यकता असते, याचा विचार करून प्रयत्नाने मनावर आणि समाजावर जे संस्कार घडविण्याची संथा व पद्धती स्वीकारली जाते, त्याला ‘संस्कृती’ असे म्हणतात.
अध्यात्म मार्गाची संस्कृती याच्याही वर असते. त्यामुळे मनाला प्रथमपासून तसेच उच्च संस्कार देऊन त्या उच्च अवस्थेकरिता तयार करावे लागते. असले मन कदाचित सभ्यता आणि संस्कृतीचे सभ्य नियम न मानता त्याही वर जाण्याचा प्रयत्न करेल. योग अध्यात्मशास्त्र असे आहे.
‘संकल्पविकल्पात्मकं मनः’ अशी मनाची व्याख्या आहे. संकल्प आणि विकल्पांचा लपंडाव म्हणजे मनाची प्रकृती आहे. ‘मन एव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयोः’ असेही मनाचे चरित्र शास्त्रे वर्णन करतात. त्यामुळे असंस्कारित मन बंधनात राहून माकड चेष्टाही करू शकते. अनेक संस्कारांची मूस म्हणजे मन होय. इंद्रियांच्या संपर्काशिवाय साधारणत: मन स्वतंत्र राहू शकत नाही आणि कारणही उघड आहे. सर्व संस्कार इंद्रियांद्वारे प्राप्त होत असतात. इंद्रियांच्या आधाराशिवाय स्वतंत्र अस्तित्व असलेले मन बरेच काही करू शकते. मनात ही शक्ती आणण्याकरिता त्यावर इंद्रियभावाशिवाय सुसंस्कार करावे लागतात. त्याकरिता त्यावरील बुद्धीची कास धरून विवेक बुद्धीला पटतील असलेच संस्कार सततच्या चिंतनाने मनावर करावे लागतात. मनाच्या असल्या प्रशिक्षणाकरिता विवेकबुद्धीचे बरेच साहाय्य घ्यावे लागते.
मन जडलेल्या संस्कारानुसार वागेल पण मनाचे तसे वागणे पलीकडील उच्च साधनावस्थेला योग्य की अयोग्य आहेत, याचा सारासार विचार बुद्धीच करते. कित्येकवेळा बुद्धीही संस्कारांच्या कुबड्यांवर बसून प्रवास करीत असते. असल्या कुबड्यांचा तोल जाऊन बुद्धीही कित्येकवेळा साथ देत नाही. म्हणून परंपरागत अयोग्य विचाराच्या पगड्यावर बुद्धीला खेचून वर नेले पाहिजे. हे काम विवेचक बुद्धी म्हणजे विवेक करू शकतो. काट्याने काटा काढावा असेच काही हे आहे. संपूर्ण विश्वात जी बुद्धी संचारलेली आहे तिचा मागोवा पिंडाच्या आश्रयाने राहणार्या अल्पबुद्धीला वारंवार घेण्याचा अभ्यास करविल्यास बुद्धीची ही अडचण नाहीशी होऊ शकते आणि स्वतंत्र निर्णय घेण्याची बुद्धीत क्षमता येते. ध्यानामुळे हे साध्य होऊ शकते.
योगिराज हरकरे
(शब्दांकन - राजेश कोल्हापुरे)