नवी दिल्ली : सिनेअभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील ‘एयु’ म्हणजे आदित्य उध्दव ठाकरे हे असल्याची माहिती आपल्याला प्राप्त झाली आहे. त्यामुळे याप्रकरणी सरकारने योग्य तो खुलासा करावा, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे लोकसभेतील गटनेते राहुल शेवाळे यांनी बुधवारी सभागृहात केली.
लोकसभेत देशातील अंमली पदार्थांची समस्या व त्याविषयीच्या उपाययोजना याविषयी चर्चा झाली. चर्चेमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाचे खासदार आणि लोकसभेतील गटनेते राहुल शेवाळे यांनी सिनेअभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा संदर्भ देऊन शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्याविषयी गंभीर दावा केला आहे.
खासदार शेवाळे म्हणाले की, मुंबईमध्ये अंमली पदार्थांची प्रश्न अतिशयय गंभीर आहे. सिनेअभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणामध्ये अंमली पदार्थांच्या सेवनाचा मुद्दा असल्याचे पुढे आले आहे. याप्रकरणाची चौकशी मुंबई पोलिस, बिहार पोलिस आणि सीबीआयतर्फे करण्यात आली आहे. मात्र, या प्रकरणातील सत्य अद्यापही पुढे आलेले नाही. राजपूत यांच्या मृत्यूचे खरे कारण अद्यापही अनुत्तरीत आहे. मात्र, बिहार पोलिसांना केलेल्या तपासामध्ये सिनेअभिनेत्री रिया चक्रवर्ती ही राज्यातील एका प्रमुख नेत्याच्या संपर्कात असल्याचे पुढे आले होते. तिच्या मोबाईलमध्ये ‘एयु’ नावाने ४० हून अधिकवेळा फोन करण्यात आला होता. ‘एयु’ म्हणजे अनन्या उध्दव असा दावा करण्यात येत आहे. मात्र, ‘एयु’ म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे असल्याची माहिती बिहार पोलिसांकडून आपणास प्राप्त झाली असल्याचा दावा शेवाळे यांनी केला आहे.
याप्रकरणी नेमके सत्य काय, याचा तपास होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले, याप्रकरणात असलेल बिहार कनेक्शन समोर आल्यानेच आदित्य ठाकरे यांनी नुकताच बिहार दौरा केला होता का, असा सवालही शेवाळे यांनी महाराष्ट्र सदनात पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला आहे.