मुंबई : आफताबच्या अमानुषतेमुळे देशभरात गाजलेल्या श्रद्धा वालकर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत केली. नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसर्या दिवशी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मांडलेल्या लक्षवेधीवर उत्तर देताना फडणवीस यांनी ही घोषणा केली.
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाचे पडसाद मंगळवारी विधानसभेतही उमटले. श्रद्धा वालकर हत्या प्रकरण हे मानवतेला काळीमा फासणारी असल्याचे म्हणत श्रद्धाने तुळींज नालासोपारा पोलिसांकडे दाखल केलेली तक्रार मागे घेण्यासाठी पोलिसांवर कुठलाही राजकीय दबाव नव्हता हेदेखील फडणवीस यांनी यावेळी स्पष केले आहे. मंगळवारी सभागृहात श्रद्धा वालकर हत्याकांडाच्या चर्चेचीसुरुवात करताना भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ’श्रद्धा वालकरने आफताबविरोधात तक्रार दिली होती. त्यावेळी पोलिसांवर दबाव असल्याची चर्चा होती. हा दबाव राजकीय होता का, असा प्रश्न उपस्थित केला. अमरावती येथे कोल्हे प्रकरण घडले. त्यावेळी ‘एनआयए’ने प्रकरण हातात घेतल्यानंतर हत्येचे खरे कारण समोर आले.त्यामुळे श्रद्धाने तक्रार मागे घेण्याबाबत त्यावेळीचा सरकारमधील प्रमुखांचा दबाव होता का? असा प्रश्न भातखळकरांनी उपस्थित केला होता.
यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, “श्रद्धा वालकर हत्या प्रकरण हे मानवतेला काळीमा फासणारे आहे. तिच्या वडिलांची माझी भेट झाली. त्यांनी संपूर्ण घटनाक्रम मला सांगितला.” तथापि या प्रकरणात राजकीय दबाव आढळून आलेला नसल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. “श्रद्धाने तक्रार दिली आणि एक महिन्यानंतर अर्ज मागे घेतला होता. आम्ही आता त्या एक महिन्यात पोलिसांनी काय करवाई केली याची चौकशी करत आहोत. पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखली समिती नेमली असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.”
यावर बोलताना भाजप आमदार अॅड. आशिष शेलार यांनी या प्रकरणात काही गंभीर विसंगती असल्याने हे प्रकरण संशयास्पद असल्याचे म्हटले आहे. श्रद्धा वालकर हिने सदर आरोपीकडून आपल्या मारहाण झाली होती, अशी तक्रार पोलीस ठाण्यात केली होती. मग, गुन्हा दाखल करून या प्रकरणाची चौकशी का करण्यात आली नाही? दोन्ही कुटुंबाला बोलावून जे लेखी घेण्यात आले. त्याला एक वर्षे उशीर का झाला? त्या कागदावर तारखेत खाडाखोड करण्यात का आली? असे प्रश्न उपस्थितीत केले.
मागील अडीच वर्षांच्या काळात तसेच तत्कालीन सरकारने घेतलेल्या भूमिका या संशयास्पद होत्या.
त्यामुळे या प्रकरणी कोणता दबाव होता का? अशी शंका येते. त्यामुळे विशेष पोलीस पथकाची नियुक्ती करून या प्रकरणी चौकशी करा, अशी आग्रही मागणी भाजपा आमदार आशिष शेलार आणि अतुल भातखळकर यांनी केली होती. शेलार आणि भातखळकर यांच्या मागणीला फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून श्रद्धा वाल्कर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करणार असल्याचे घोषित केले आहे.