सत्ताधार्यांकडून आपल्या सत्तेचा, शक्तीचा गैरवापर करून विरोधकांना नामोहरम करण्याचे प्रकार तसे नवीन नाहीत. असे प्रकार अगदी रशिया, पाकिस्तानपासून, चीन, म्यानमार अशा बर्याचशा देशांमध्ये यापूर्वीही दिसून आले आहेतच. असाच काहीसा प्रकार नुकताच तुर्की किंवा बदललेल्या नावानुसार तुर्कीये या देशातही दिसून आला. तुर्कीची राजधानी इस्तंबूल शहराचे महापौर इक्रम इमामोग्लू यांना एका प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा नुकतीच तेथील न्यायालयाकडून सुनावण्यात आली. पण, त्यांच्या या न्यायालयीन शिक्षेमागे तुर्कीचे राष्ट्रपती रसीप तैय्यप एर्दोगान यांचेच षड्यंत्र असल्याची जोरदार चर्चा तुर्कीमध्ये रंगली आहे. तसेच, इमामोग्लू यांच्या समर्थनार्थ तुर्कीची जनताही या आठवड्यात मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरली. त्यानिमित्ताने हे इक्रम इमामोग्लू नेमके कोण आणि हे संपूर्ण प्रकरण काय आहे, ते जाणून घेणे महत्त्वाचे ठरावे.
वर्ष 2019... तुर्कीची राजधानी आणि लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात गजबजलेले शहर असलेल्या इस्तंबूलमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष रसीप एर्दोगान यांच्या सत्ताधारी एके पार्टीला धूळ चारत, विरोधकांच्या ‘सीएचपी’ पक्षाचे इक्रम इमामोग्लू महापौर म्हणून निवडून आले. तेव्हापासूनच 52 वर्षीय इमामोग्लू हे कुठे तरी एर्दोगान यांच्या रडारवर होतेच. तसेच, नंतर तुर्कीत करण्यात आलेल्या काही सर्वेक्षणांनुसार तर आगामी निवडणुकांमध्ये एर्दोगान यांचे दावेदार म्हणून तेथील जनतेने इमामोग्लू यांच्या नावाला पसंती दिल्याचेही समोर आले होते. त्यामुळे कुठे तरी इमामोग्लू हे आपल्यापेक्षा वरचढ ठरू शकतात आणि निवडणुकांमध्ये आपला धुव्वा उडू शकतो, याची धास्ती एर्दोगान यांना होतीच. मग काय, इमामोग्लू यांनी केलेल्या एका विधानामुळे त्यांना न्यायालयीन प्रकरणांमध्ये अडकवून निवडणुकांपासून दूर ठेवण्याची एक नामी संधीच एर्दोगान यांच्याकडे चालून आली आणि त्यांनीही त्या संधीवर स्वार होत इमामोग्लू यांना गजाआड करण्याचे सुप्त मनसुबे कृतीत आणले.
त्याचे झाले असे की, इस्तंबूलच्या 2019च्या महापौर निवडणुकीनंतर इमामोग्लू यांनी विरोधकांना, काही निवडणूक अधिकार्यांना उद्देशून फक्त ‘मूर्ख’ अशी टीप्पणी केली होती. इमामोग्लू यांच्या म्हणण्यानुसार, तुर्कीचे मंत्री सुलेमान सोयलू यांच्या तशाच एका वक्तव्यावर दिलेली ती एक उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. पण, इमामोग्लू यांच्या ‘मूर्ख’ या टीप्पणीवरून त्यांच्यावर बदनामीचा खटला दाखल करण्यात आला. तुर्कीच्या कायद्यानुसार, अशा गुन्ह्यासाठी त्यांना दोन वर्षे सात महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. एवढेच नाही, तर या शिक्षेसोबत या कालावधीत इमामोग्लू यांना कोणतीही निवडणूक लढविता येणार नाही. परंतु, ते महापौरपदावर या काळात कायम राहू शकतात. न्यायालयाच्या या निर्णयामुळे आगामी जून महिन्यातील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील एक संभाव्य दावेदार असलेले इमामोग्लू मात्र बाहेर झाले. परिणामी, तुर्कीच्या जनतेनेही या निर्णयाविरोधात नाराजी दर्शविली. इस्तंबूलमध्ये रस्त्यावर उतरून नागरिकांनी एर्दोगान सरकारने राजीनामा द्यावा म्हणून जोरदार घोषणाबाजी करून इमामोग्लू यांचे जाहीर समर्थन केले. एवढेच नाही, तर युरोपियन युनियन आणि अमेरिकेनेही इमामोग्लू यांच्याप्रती संवेदना व्यक्त करत त्यांना पाठिंबा दर्शविला आहे.
इमामोग्लू यांच्या टीमने वरील न्यायालयात या शिक्षेला आव्हान देण्याचे ठरवले आहेच. परंतु, न्यायालयीन प्रकरण लक्षात घेता, याचा निकालही जूननंतर म्हणजे तेथील सार्वत्रिक निवडणुकांनंतरच लागण्याची चिन्हे आहेत. पण, यानिमित्ताने का होईना, एर्दोगान यांच्या विरोधातील जनआक्रोश तुर्कीमध्ये उफाळून आलेला दिसला. त्यातच तुर्कीची ढासळती आर्थिक स्थिती, ग्रीकशी संघर्ष, आपला देश सोडून सीरियामध्ये नाक खुपसणे आणि एकूणच मुस्लीमजगताचा ‘खलिफा’ म्हणून मिरवण्याची एर्दोगान यांची महत्त्वाकांक्षा हे सगळे लपून राहिलेले नाही. त्यातच केमाल पाशांच्या धोरणामुळे तुलनेने मोेकळ्याढाकळ्या तुर्कीला अधिक कट्टरवादी इस्लामच्या गर्तेत एर्दोगान ढकलतात की काय, अशी एक भीतीदेखील सातत्याने व्यक्त केली जाते. त्यामुळे एर्दोगान यांनी आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच संभाव्य दावेदार असलेल्या इमामोग्लू यांना न्यायालयीन कचाट्यात अडकवून त्यांचा पत्ता कट केल्याची चर्चा सध्या रंगली आहे. त्यामुळे आगामी काळात हे सगळे प्रकरण काय वळण घेते, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.