बिईंग द चेंज : स्व-पल्याडचा विचार करणार्‍या व्यक्तींचा कार्यगौरव

    17-Dec-2022
Total Views | 147
Being the Change


‘बिईंग द चेंज’मध्ये स्व-पल्याडचा विचार करणार्‍या व्यक्ती आहेत, त्यांनी महात्म्यांचे ‘सत्याचे प्रयोग’ केवळ वाचून ठेवले नाहीत तर ते प्रत्यक्षात आणले म्हणून त्यांची नोंद घ्यावी लागते.


ईंग द चेंज’ - गांधीजींच्या पाऊलवाटेवर चालणारे खरेखुरे आयडॉल्स, हे आशुतोष सलिल आणि बरखा माथुर यांचे नवे पुस्तक नुकतेच बाजारात आले आहे. इंग्रजीत ’हार्पर कॉलिन्स’ आणि मराठीत ’मधुश्री पब्लिकेशन’ने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
या लेखकद्वयींत आशुतोष प्रशासक आहेत, तर बरखा पत्रकार आहेत. त्यांनी आपल्या आजूबाजूची सामान्य माणसं जे असामान्य काम करत होती, त्यावर या पुस्तकातून प्रकाश टाकला आहे; ते काम जगासमोर आणले आहे. ती माणसं प्रकाशात आली नव्हती, असे नव्हे; त्यातली काही तर अवघ्या जगात ज्ञात आहेत. पण, काहींचे काम अगदीच त्यांच्या जिल्ह्यापुरते ठाऊक होते; ते मात्र या पुस्तकाच्या रूपाने परिघाबाहेरील लोकांपर्यंत पोहोचले, हे नक्की. यातून त्यांच्या कार्याला हातभारच लागणार आहे.

अनिल अवचटांनी ’कार्यरत’ नावाचे याच आवलीतले एक पुस्तक लिहिले होते. त्यासारखीच ’बिईंग द चेंज’ या पुस्तकात काही नि:स्वार्थी माणसं आपल्याला भेटतात. या स्वार्थी जगात स्वतःपलीकडे पाहणारी माणसं आहेत, यावर ज्यांना विश्वास नाही, त्यांनी तर हे पुस्तक आवर्जून वाचावे. एकदा का आपला भवताल जगण्यायोग्य बनवण्याचा त्यांनी ध्यास घेतला की मग मागे वळून पाहिले नाही, संघर्षाला स्वतःचे बळ बनवले, लोकसंग्रहातून प्रेरणा घेतली, अंतस्थ उर्मी तर होतीच; या शिदोरीवर त्यांनी आपला खडतर प्रवास चालू ठेवला आणि अशा ठेक्यापर्यंत तो पोहोचवला की, कमीत कमी त्यांच्या कार्याला लाभलेल्या परिमाणाची नोंद घेतली गेली. त्यांनी मांडलेल्या समस्यांवर विचार करण्यात आला, काही समस्या सोडवण्यात आल्या; यात या कार्यरतांच्या विजिगीषेचा वाटा फार मोठा आहे.

’बी द चेंज यू विश टू सी’ असे महात्मा गांधी म्हणाले होते. गांधीजी, विनोबा भावे, जयप्रकाश नारायण यांची पुस्तकं त्यांनी केवळ वाचली नाहीत, तर ते त्यांचे तत्त्वज्ञान जगले आहेत, म्हणून हे लोक असाधारण ठरतात.माणसाला संघर्ष चुकत नाही, किंबहुना संघर्षाशिवाय माणूस घडत नाही, हे जरी खरे असले तरी या लोकांचा संघर्ष स्वतःपुरता नव्हता. यांनी ’विश्वचि माझे घर’ या उदात्त वैश्विक भावनेतून आपल्या भवतालातला संघर्ष स्वतःच्या अंगावर घेतला आहे, म्हणून ते मोठे आहेत. त्यांचा विचार स्व-पल्याडचा आहे, त्यांनी महात्म्यांचे ’सत्याचे प्रयोग’ केवळ वाचून ठेवले नाहीत, तर ते प्रत्यक्षात आणले, म्हणून त्यांची नोंद घ्यावी लागते.

या पुस्तकात सात लेख आणि 14 व्यक्ती आहेत.


बंडू धोत्रे


या पुस्तकात बंडू धोत्रे यांच्यासारखे चंद्रपूरमधील हिरवाईचे रक्षक भेटतात. सुरुवातीच्या काळात काय करावे, हे न सूचल्यामुळे पडेल ते काम करणारे, पण स्वतःच्या अंतर्मनाचा आवाज ऐकू येताच स्वच्छतेचा, हिरवाईचा दूत होऊन, ‘इको-प्रो’च्या माध्यमातून स्वतः अंगावर सामाजिक जबाबदारी घेणारे. माणूस म्हणून न चुकलेला सांसारिक संघर्ष त्यांच्या ध्येयप्राप्तीत बाधा आणू शकत नाही. सरकारी यंत्रणेसोबत दोन हात करण्याची त्यांची तयारी होते, नियमांना लोकाभिमुख करण्यासाठी त्यांची धडपड वैयक्तिक दुःखांचा अडसर बाजूला सारून त्यांना सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारायला लावते. लोकांना त्यांची पर्यावरणीय निष्ठा भावते, लोक स्वतःहून आंदोलनात सहभागी होतात, त्यास यशस्वी बनवतात. त्यांच्या कार्याची दखल घेतली जाते, केंद्रीय मंत्री त्या भागात येऊ घातलेला मोठा प्रकल्प रद्द करतात, अशी वस्तुस्थिती या लेखात वाचकांसमोर सत्यकथात्म पद्धतीने ठेवण्यात लेखकद्वयी यशस्वी झाले आहेत.

डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे


‘पद्मश्री’ डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे यांनी मेळघाटच्या ’बैरागड’ (‘बे-राह-गड’), जिथे जायला देखील वाट नव्हती, अशा गावालाच आपली कर्मभूमी बनवले. तेथील वनवासी माणसाचे आरोग्य सुधारण्याच्या कामी तारुण्य वेचले. ईश्वरप्राप्तीचा एकमेव मार्ग म्हणजे त्यांनी निर्माण केलेल्या प्राणिमात्राला ईश्वरस्वरूप मानून, त्याच्याशी एकरूप होणं, हा गांधीजींचा विचार त्यांनी आचरणात आणला. अनंत अडचणींचा डोंगर समोर उभा असताना त्यांनी केवळ आंतरिक ऊर्जेतून,ज्ञानप्राप्तीतून, बरे झालेल्या लोकांच्या आशीर्वादातून बळ मिळवले. स्वतःच्या भावी अर्धांगिनीकडूनदेखील, काटकसरीने संसार करावा लागेल, 40 किमी चालायची तयारी ठेवावी लागेल, रेशनचे कपडे घालावे लागतील, स्वतःसाठी कधीच नाही, पण लोकांसाठी भीक मागायची तयारी ठेवावी लागेल, असे कठोर वचन वदवून घेणारे डॉ. रवींद्र यात भेटतात.

तसेच एकदा वचन दिल्यावर नवर्‍याच्या वैद्यकीय कौशल्यावर विसंबून आपल्या मरणाच्या दारात उभ्या नवजात मुलाला जिल्ह्याच्या ठिकाणी न्यायला आलेल्या, जिल्ह्याधिकार्‍यांनी मुद्दाम पाठवलेल्या जीपने जायला नकार देणार्‍या, डॉ. स्मितादेखील इथे भेटतात. अशा नाजूक प्रसंगी एकच प्रश्न दोघांच्या मनांत असतो, आपण जर आपल्या स्वतःच्या मुलाला जिल्ह्याच्या ठिकाणी नेले, तर वनवासी त्यांची आजारी मुलं कोणत्या विश्वासाच्या शिदोरीवर आपल्याकडे घेऊन येतील?
एवढा स्व-पल्याडचा विचार करणारी निखळ नि:स्वार्थी माणसं आणि त्यांचं प्रेरणादायी चरित्र या पुस्तकाचा प्राण आहे. त्यांनी कधीही मोठ्या लोकांशी असलेल्या आपल्या ओळखीचे भांडवल केले नाही, एकदा एक व्रत डोळसपणे स्वीकारले की त्याचे प्रामाणिकपणाने पालन मात्र केले आहे. आजच्या तणावपूर्ण व्यावहारिक जगात अविश्वसनीय वाटाव्यात अशा सत्यकथा या पुस्तकात आहेत.

मोहन हिरालाल आणि देवाजी तोफा


’रस्ता खोदा’ या जयप्रकाश नारायण यांच्या विधानाचा, ‘लोकांसाठी मार्ग काढा’ असा ’सर्वोदयी’ अर्थ घेऊन अविरत काम करणारे मोहन हिरालाल यांनी लोकलढा उभारला. जंगलातील लोकांना त्यांचे हक्क मिळवून दिले. अहिंसात्मक आंदोलनं केली आणि लोकांचे ते ’मोहनभाऊ’ झाले. त्यांनी ’जंगल बचाओ, मानव बचाओ’ हे आंदोलन केले. त्यांना देवाजी तोफा या वरिष्ठ सहकार्‍याची, स्थानिक सरपंचाची मदत झाली. खरी सत्ता जनतेमध्ये असते, त्यांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींमध्ये नसते, हा गांधीजींचा ’हिंद स्वराज्य’मधील विचार त्यांचे आयुष्य उजळून गेला. त्यांच्यावर तुकडोजी महाराजांच्या, ’ग्रामगीता’चादेखील प्रभाव होता.

त्यांनी सरकारी यंत्रणेशी संघर्ष करून वनवासींच्या सांस्कृतिक पाऊलखुणांचा मागोवा घेतला, तरुणांना एकत्र आणून पुन्हा ’घोटुल’ संस्कृतीचे पुनरुज्जीवन केले. वनवासींना जंगलात जगण्यासाठी आवश्यक असे ’निस्तार हक्क’ मिळवून दिले, त्यासाठी कायदेशीर लढा दिला. त्याचा परिणाम म्हणून वन विभागाने मेंढा लेखा भागाला ’आरक्षित जंगल’ म्हणून मान्यता दिली. वीस-वीस गावे सायकलवर जाऊन या दोघांनी लोकांना एकत्र केलं. लढा उभारला. सगळी कागदपत्रं जुळवून त्याला कायद्याच्या कोंदणात बसवले आणि शांततामय मार्गाने आपली ध्येयप्राप्ती केली. त्यासाठी वेचले ते स्वतःचे तारुण्य! ’सर्वोदय’ आणि ’स्वराज्य’ या कविकल्पना नाहीत, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवले.

दिगंत, अनघा आणि अनिकेत,समीक्षा आमटे


दिगंत, अनघा आणि अनिकेत, समीक्षा, या हेमलकसा येथून आमटे कुटुंबाचा समाजसेवेचा वसा वाहणार्‍या नव्या पिढीच्या कार्याची माहिती या भागात मिळते. काही नवे प्रयोग करायचे म्हटलं की, जुन्याला नवं रुपडं बहाल करणं आलं, पण ते समजून घेणारे लोक आजूबाजूला असणे हीदेखील जमेची बाजू असते. कधी त्यांच्या कलानेदेखील घ्यावे लागते, या सगळ्या उलाघालीचा प्रत्यय हा आलेख वाचताना येतो. तीन पिढ्यांनी ‘माडिया गोंड’ या वनवासी लोकांना आरोग्य सेवा पुरवणं, त्यातून पुढे शालेय शिक्षण, वन, पाणी इ. आवश्यक व्यवस्था उभी करणं, याकामी त्यांच्या अर्धांगिनींनी त्यांना मनापासून मदत करत राहणं, सगळंच अगदी अकल्पनीय आहे. तिसर्‍या पिढीलादेखील पहिल्या पिढीने काय अलौकिक कार्य करून ठेवले आहे, याची जाणीव असणं आणि आपणही याच कामात आयुष्य वेचावं, असे वाटणे, सगळेच स्तिमित करणारे आहे.

 प्रत्येक पिढीने काळानुरूप होणारा बदल अंगीकारताना, घडवून आणताना, त्यांना संघर्ष मात्र चुकत नाही, हेदेखील या लेखात अधोरेखित होते; केवळ त्याचे स्वरूप बदललेले असते, एवढेच.स्थानिक वनवासींच्या पिढ्यादेखील या ’लोक बिरादरी’ प्रकल्पातून बळ मिळवू लागल्या आहेत, उपेक्षितांचे जिणे त्यांनी देखील मागे सोडले आहे. दिगंत आणि अनिकेत यांची कार्याप्रती निष्ठा पुढील वाक्यातून व्यक्त होते- “एकवेळ आमच्या आई-वडिलांच्या किंवा आजोबांच्या तुलनेत आम्ही त्यांच्याइतकं चांगलं काम करत नाही, असं लोकांनी म्हटलं तर चालेल. पण, कुठल्याही परिस्थितीत त्यांनी कमावलेलं नाव आमच्याकडून खराब झालं तर ती आमच्यासाठी अत्यंत दुर्दैवाची गोष्ट असेल.”

मतीन भोसले


मतीन भोसले अत्यंत उपेक्षित समाजातल्या मुलांच्या हक्कासाठी लढत आहेत. फासेपारधी समाजातील मुलांना जन्मतःच ’गुन्हेगारी प्रवृत्तीचा’ ठरवले जाते. त्याच्या मुळाशी 1871 साली ब्रिटिशांनी केलेला ’क्रिमिनल ट्राईब्ज अ‍ॅक्ट’ कारणीभूत ठरला. तो कित्येकांचे आयुष्य उद्ध्वस्त करून गेला आहे.शंकर नाथ, मतीनचे वडील, त्यांनी मनावर घेऊन मुलांना शिक्षण दिले. ‘फक्त शिक्षणच तुझ्या कुटुंबाची परिस्थिती बदलू शकतं. तुझ्यावर गुन्हेगारीचा शिक्का बसलाय म्हणून तू ही शिक्षा भोगत आहेस. तुझ्या पोरांच्या नशिबी हे भोग तुला नको असतील तर त्यांना शिकावं,’ हे मित्राचं वाक्य त्यांच्या मनावर ठसलं. बापानं हातपाय जोडून पोरांना शाळेत घातलं. लहानगा मतीन मन लावून शिकला. रेशनकार्ड बनवायला जातीचं ‘सर्टिफिकेट’ लागतं आणि त्यासाठी घरचा पत्ता वगैरे लागतो. पण, या भटक्या जमातीकडे काहीही नव्हतं. म्हणून त्यांना ’रास्ता रोको’ आंदोलन करावं लागलं, तेव्हा कुठे सरकारने त्यांना जातीचे प्रमाणपत्र दिले.

पुढे मतीन जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक झाला. त्याने आपल्या समाजातील इतर मुलांना शिक्षण घेण्यासाठी कायम प्रोत्साहित केले. सर्वात आधी तर त्याने गावोगाव फिरून गुन्हेगारी जगतात गुरफटलेली फासेपारधी समाजातील मुलं शोधली. धडपड करून एक शाळा आणि वसतिगृह उभे केले. त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली. पण, सरकारी नियम न पाळल्यामुळे रस्ता रुंदीकरणात शाळा मोडली गेली. पुन्हा नव्याने सगळे उभे करण्याचा त्याने चंग बांधला. ’देह मंदिर चित्त मंदिर’सारख्या प्रार्थना आजही त्याला बळ देतात.

डॉ. सतीश गोगुलवार आणि शुभदा देशमुख


नागपूरपासून 150 किलोमीटरवर असलेल्या कुरखेडा येथे डॉ. सतीश गोगुलवार आणि शुभदा देशमुख यांनी लोककार्याचा वसा घेतला. जंगलातील वनस्पतींवर स्थानिकांचा हक्क आहे, तो त्यांना मिळवून देणं, त्यांचं पारंपरिक शहाणपण, ज्ञान जपणं, बालमृत्यू घटवणं इ. क्षेत्रांत त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. ’आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ हा स्व-मदत गट त्यांनी सुरू केला. तसेच त्यांनी सामुदायिक विवाह घडवून आणले आहेत. त्यांनी डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांच्यासोबत दारूबंदीची मोहीम राबवली. पारंपरिक ज्ञान ज्यांच्याकडे आहे, असे वैदू त्यांनी शोधले, जे आपल्या उपचारांचा मोबदलादेखील घेत नसत, त्यांच्यासोबत वैद्यकीय ज्ञानाची देवाणघेवाण होत असे. ’स्व-मदत’ गटातील महिलांना हे ज्ञान आहे का? याची चौकशी केली, त्यातील 1500 स्त्रियांना औषधी वनस्पतींची लागवड करायला शिकवलं, त्यातून पारंपरिक औषधांबद्दलची जागरूकता निर्माण झाली. त्यांना वाटतं, आपण जर स्वयंपूर्ण, सक्षम गाव आणि समर्थ देशाचं स्वप्न बघत असू तर शहरातील शिक्षित मुलांनी मोठ्या प्रमाणावर खेड्यात यायला हवं. इथं काम करायला हवं. नव्या पिढीत त्यांना आशेचा किरण दिसतो.

डॉ. आशिष आणि डॉ. कविता सातव


मेळघाटमधील वनवासींना आरोग्य उपचार पुरवताना स्वतःच्या यातना विसरणारे कुटुंब. जेव्हा डॉक्टर पेशंटकडे जातात तेव्हा वेगळी नाती तयार होतात. लोकांचा विश्वास बळावतो. यानुसार त्यांनी नवीन पायंडा घातला. जेव्हा पेशंट्स येत नसत तेव्हा ते गावोगावी फिरून पेशंट्सना शोधून उपचार करत असत. हळूहळू त्यांच्या नि:स्वार्थ भावाने लोकांचा विश्वास संपादन केला. त्यांचा मुलगादेखील आता त्यांच्याच पाऊल ठशांचा मागोवा घेत आहे.

या पुस्तकात लेखकांनी जे जसे आहे, घडले, ते तथ्याधारित मांडले आहे. कल्पना विस्तार केला नाही. त्यामुळे काही ठिकाणी या पुस्तकातील लेखांमध्ये कायद्याची भाषा किंवा परवलीचे शब्द वाचकाची सोबत करतात. पण, यामुळे लेखनाला वास्तवाचे भान लाभले आहे, ते वस्तुनिष्ठ झाले आहे.आयुष्यात कधी आलेल्या निराशेवर यातील कार्यरत तरुणांनी मात केली आहे, त्यांनी सकारात्मक विचारातून बळ मिळवले आहे, एखादी ’ओवी अनुभवली’ आहे; त्यामुळे या पुस्तकातून भेटणार्‍या व्यक्ती त्यांच्या तरुणाईतला संघर्ष जसा वाचकांसाठी उलगडतात तसेच त्यातून कमावलेल्या यशाच्या किरणांमुळे आपल्याला प्रेरणा देतात.

पुस्तकाचे नाव : बिईंग द चेंज
लेखक : आशुतोष सलिल आणि बरखा माथुर
इंग्रजी - हार्पर कॉलिन्स, मराठी - मधुश्री पब्लिकेशन
मराठी अनुवाद : प्राजक्ता चित्रे
पृष्ठसंख्या : 193
मूल्य :250


-जीवन तळेगावकर




अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121