मुंबई : मविआने मुंबईत महामोर्चा आयोजित केला. तीन पक्ष एकत्र येऊनही इतका छोटा मोर्चा निघाला. ड्रोन शॉट दाखवण्या इतपतही मोर्चा निघाला नाही. आम्ही तुमच्या नाकाखालून सरकार घेऊन गेलो पण तुम्ही काहीही करु शकले नाही. त्यामुळे आमचं हे सरकार टिकणार, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहणार, पुढच्या वेळीही आम्ही त्यांच्या नेतृत्त्वात निवडणुका लढणार आणि आम्हीच पुन्हा सत्तेत येणार. असं प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राउतांना दिलं आहे.
मविआच्या मोर्चाला आपण गंभीरतेने घेत नाही. आझाद मैदान एवढी तरी गर्दी मविआने जमवायला हवी होती, यावरुन मविआच्या मोर्चाला लोकांनी प्रतिसाद दिलेला नाही, असं दिसून येतय, त्यात मविआ महामोर्चा काढण्यात अशस्वी झाली आहे. राहुल गांधी आणि बिलावल भुट्टो यांच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले, "खरे तर 16 डिसेंबर रोजी राहुल गांधी यांनी भारतावर प्रश्न उपस्थित करत मोदी सरकारवर निशाणा साधला होता. त्याचवेळी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनीही याच दिवशी भारतावर निशाणा साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. भारत 16 डिसेंबर रोजी विजय दिवस साजरा करतो. या दिवशी भारतीय लष्कराने पाकिस्तानचा पराभव केला. त्याच दिवशी बिलावल भुट्टो आणि राहुल गांधी पंतप्रधानांवर प्रश्न उपस्थित करतात, हा काय संबंध? बिलावल भुट्टो हे एका अयशस्वी देशाचे (पाकिस्तान) परराष्ट्र मंत्री आहेत पण त्याचवेळी आपले प्रमुख विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केले तर त्यांच्यासाठी राष्ट्र मोठे की राजकारण? असा सवाल त्यांनी यावेळी केला.
काय म्हणाले होते संजय राउत ?
आजच्या महाविकास आघाडीच्या विराट मोर्चाने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना पदच्युत केलं आहे. राज्यपालांना पदच्युत करणारा हा विराट मोर्चा आहे. शिंदे-फडणवीस सरकार तुम्ही फेब्रुवारी महिना बघणार नाही.