साहित्य संस्कृती मंडळाची आणखी एक ‘पुरोगामी’ कामगिरी

ख्रिस्ती अंधश्रद्धांना विज्ञानविषयक पुरस्कार

    17-Dec-2022
Total Views | 128
gadre


‘उत्क्रांती – एक वैज्ञानिक अंधश्रद्धा’ पुस्तकास विज्ञानविषयक पुरस्कार
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : नक्षलवादाचे उदात्तीकरण करणाऱ्या कोबाड घंडीच्या फ्रॅक्चर्ड फ्रिडमला पुरस्कार देणाऱ्या साहित्य संस्कृती मंडळाची आणखी एक पुरोगामी कामगिरी उघडकीस आली आहे. ‘उत्क्रांती – एक वैज्ञानिक अंधश्रद्धा’ या ख्रिश्चन धार्मिक मतांचा पुरस्कार करणाऱअया अरुण गद्रे यांच्या पुस्तकास चक्क विज्ञानविषयक पुरस्कार देण्याची पुरोगामी कामगिरी मंडळाने केली आहे.
 
साहित्य संस्कृती मंडळातर्फे पुरस्कारांसाठी पुस्तकांची निवड करताना झालेली आणखी एक मोठी चूक उघडकीस आली आहे. ख्रिस्ती धर्मोपासत असलेल्या अरुण गद्रे यांच्या ‘उत्क्रांती – एक वैज्ञानिक अंधश्रद्धा’ या विज्ञान नाकारणाऱ्या पुस्तकास साहित्य संस्कृती मंडळातर्फे विज्ञानविषयक पुस्तकाचा पुरस्कार देण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे साहित्य संस्कृती मंडळाच्या एकूणच कार्यशैलीमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी असल्याचे सिद्ध झाले आहे.
 
लेखक अरुण गद्रे यांच्या पुस्तकामध्ये विज्ञानाने सिद्ध केलेल्या उत्क्रांतीच्या सिद्धांतास त्याज्य ठरविण्यात आले आहे. उत्क्रांती सिद्धांतामुळे बायबलच्या आरंभी येणारी विश्वाच्या निर्मितीची कथा फोल ठरते, त्यामुळे उत्क्रांतीचा सिद्धांतच नाकारण्याची भूमिका ख्रिस्ती धर्मग्रंथ आणि धर्मगुरूंची असते. ख्रिश्चनांच्या' मते बायबलातील जेनेसिस कथा हीच परमेश्वराच्या सृष्टीनिर्मितीचा उद्देश सांगते. एवढेच नव्हे तर देवाने सृष्टी कशी टप्प्याटप्प्याने अस्तित्वात आणली याचा क्रमदेखील सांगणारी आहे.
 
ख्रिश्चन श्रद्धेनुसार तीच कथा फक्त खरी आहे. त्या कथेतील धारणेला छेद देणारे कोणतेही वैज्ञानिक सत्य आणि प्रतिपादन त्यांना नकोसे वाटते. म्हणून जेनेसिस कथेशी सुसंगत भासावे अशा बेताने एक छद्म युक्तीवाद 'विज्ञान ' म्हणून पुढे केला जातो. त्याला परमेश्वरकृत सुबुद्ध योजना (इंटेलिजेन्ट डिझाईन) म्हटले जाते. गद्रे यांनी आपल्या पुस्तकामध्ये याच विज्ञानविरोधी संकल्पनेची भलामण केली आहे.
 
 
pradeep d
 
सरकारने पुरस्कार रद्द करावा – प्रदीप रावत
 
पुण्याचे माजी खासदार प्रदीप रावत यांनी साहित्य संस्कृती मंडळाचा हा भोंगळ कारभार उघडकीस आणला आहे. दैनिक ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना ते म्हणाले, धार्मिक मते मांडण्याचा अधिकार प्रत्येकालाच आहे. मात्र, अशा धार्मिक विचारांना विज्ञानविषयक पुरस्कार देणे हा अतिशय भयानक प्रकार आहे. सदर पुस्तकामध्ये ख्रिश्चन धर्मोपासक असलेल्या लेखकाने विज्ञानाला खोटे ठरविले आहे. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या विज्ञाननिष्ठ प्रणेत्याचा वारसा सांगणाऱ्या सरकारने हा पुरस्कार रद्द केला पाहिजे. त्याचप्रमाणे साहित्य संस्कृती मंडळाची पुरस्कारासाठी पुस्तकांची निवड करणारी व्यवस्थेमध्ये भरपूर दोष असून त्या दोषांचे समूळ उच्चाटन होणे अत्यंत गरजेचे आहे.
 
पुरस्कार रद्द करण्याचा सरकारला हक्क – सदानंद मोरे
 
अरुण गद्रे यांच्या पुस्तकास देण्यात आलेला पुरस्कार रद्द करण्याचा सरकारला अधिकार आहे. त्यांनी तसे केल्यास अध्यक्ष म्हणून माझी कोणत्याही प्रकारची हरकत नाही. मंडळाची कार्यकक्षा केवळ पुरस्कारासाठी निवड करण्यापुरतीच असून त्यापुढे सरकारचा अधिकार अंतिम आहे, असे मत साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे यांनी व्यक्त केले आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121