ठाणे : वारकरी संप्रदाय तसेच हिंदु देवदेवतांविरोधात शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याकडून होत असलेल्या टीकेच्या निषेधार्थ शनिवारी ठाणे बंदची हाक देण्यात आली आहे. शासकिय विश्रामगृहात शुक्रवारी आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यावेळी विश्व वारकरी संघटनेचे अध्यक्ष विलास फापाळे, ब्राम्हण सभेचे कार्याध्यक्ष रविंद्र कराडकर,विलास जोशी, स्वामी परिवाराचे किरण नाकती,भाजप आध्यत्मिक सेल विकास घांग्रेकर,जैन समाजाचे उदय परमार, वारकरी संप्रदायाचे नवनाथ बेंडके आणि स्वामी समर्थ संप्रदायाच्या संस्कार साधना केंद्राच्या भगिनी उपस्थित होत्या. सुषमा अंधारे यांच्याविरोधात वारकरी संप्रदाय,ब्राम्हण समाज,जैन समाजासह स्वामी समर्थ भक्त एकवटले असताना या ठाणे बंदला भाजपने तसेच बाळासाहेबाच्या शिवसेनेनेही पाठींबा दर्शविला असुन बाजारपेठेतील विठ्ठल मंदिर येथून दुपारी निघणाऱ्या लाँगमार्चमध्ये देखील सर्वजण सामील होणार आहेत.
उध्दव ठाकरे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गेल्या काही दिवसापूर्वी वारकरी संप्रदाय आणि संत महात्म्यांवर केलेली टीका वादग्रस्त ठरली आहे. त्याच्या प्रतिक्रिया आता उमटू लागल्या असुन त्यांच्याविरोधात वारकरी संप्रदाय,ब्राम्हण समाज,जैन समाजासह स्वामी समर्थ भक्त एकवटले आहेत.सुषमा अंधारे यांच्याकडून हेतुपुरस्सरपणे हिंदू धर्माबरोबरच जैन धर्माचा अपमान केला जात आहे. त्याचबरोबर साधू-संत, देवी-देवतांविरोधात सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करून विष ओकण्याचे काम केले जात आहे. यामुळे समस्त वारकरी संप्रदायासह लाखो भाविकांच्या भावना दुखावल्याने तीव्र धिक्कार करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर वारकरी संप्रदाय व हिंदुत्ववादी संघटनांच्या बंद आंदोलनाला भाजपाने पाठिंबा दिल्याचे आ. निरंजन डावखरे आणि आ.संजय केळकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहिर केले.दरम्यान, बाळासाहेबांच्या शिवसेनेचा तसेच महिला आघाडीचा पूर्ण पाठिंबा असल्याचे शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के आणि महिला आघाडीप्रमुख मिनाक्षि शिंदे यांनी जाहीर केले आहे.
संतांच्या भूमीला अंधारात नेणाऱ्या अंधारे
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने गरळ ओकणान्या सुषमा अंधारे हिंदू धर्म व हिंदू देवदेवतांविरोधात अपमानास्पद वक्तव्य करुन समाजात तेढ निर्माण करत आहेत.या निर्बुद्ध बाईने हिंदुत्व संपवण्याचा विडा उचलल्याची टिका वारकरी संप्रदायाने केली आहे.तर, संतांच्या भूमीला अंधारात नेण्याचे काम अंधारे ताई करत असुन या पिढीला काय दाखले द्यायचे. असा सवाल स्वामी समर्थ परीवाराने केला आहे.