बिलावल भुट्टो यांनी १९७१ सालचा नरसंहार आठवावा

भारताने सुनावले

    16-Dec-2022
Total Views | 76
BJP


नवी दिल्ली
: पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी १९७१ साली बंगालीभाषकांसह हिंदूचा केलेला नरसंहार बिलावल भुट्टो यांनी आठवावा. त्याद्वारे अल्पसंख्यांकांविषयी पाकचे धोरण अद्यापही बदलले नसल्याचे दिसून आले आहे, अशा शब्दात परराष्ट्र मंत्रालयाने पाकचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांना सुनावले आहे.

संयुक्त राष्ट्र संघाच्या बैठकीमध्ये परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी बिलावल भुट्टो यांना त्यांनी जम्मू – काश्मीकरविषयी केलेल्या टिप्पणीविषयी कठोर शब्दात सुनावले होते. त्यानंतर नाचक्की झालेल्या पाकच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी अश्लाघ्य टिप्पणी करून नैराश्य व्यक्त केले होते. मात्र, त्यास भारतीय परराष्ट्रा मंत्रालयाकडून अतिशय सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, दहशतवादाचा बिमोड करण्याचा मुद्दा हा सर्वच जागतिक व्यासपीठांवर ऐरणीवर आहे. दहशतवाद आणि दहशतवादी संघटनांना प्रायोजित करणे, त्यांना आश्रय देऊन वित्तपुरवठा करणे यामध्ये पाकचा सहभाग असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पाकच्या परराष्ट्र मंत्र्यांचे असभ्य वक्तव्य हे पाकच्या अपयशाचे द्योतक आहे. न्यूयॉर्क, मुंबई, पुलवामा, पठाणकोट आणि लंडन ही शहरे पाकिस्तान प्रायोजित, समर्थित आणि भडकावलेल्या दहशतवादाचे बळी ठरले आहेत. त्यामुळे जगभरात निर्यात होणारा ‘मेक इन पाकिस्तान’ दहशतवाद थांबवावाच लागेल, असे बागची यांनी म्हटले आहे.

पाकिस्तान हा ओसामा बिन लादेनचा हुतात्मा म्हणून गौरव करणारा आणि लखवी, हाफिज सईद, मसूद अझहर, साजिद मीर आणि दाऊद इब्राहिम सारख्या दहशतवाद्यांना आश्रय देणारा देश आहे. या देशात संयुक्त राष्ट्र संघाच्या यादीतील १२६ दहशतवादी आणि २७ दहशतवादी संस्थांना आश्रय देण्यात आला असून हे अजिबात भूषणावह नाही. त्यामुळे पाकच्या परराष्ट्र मंत्र्यांचै नैराश्य हे त्यांच्या देशाच्या दहशतवाद धोरणातून आले असल्याचाही टोला लगाविण्यात आला आहे.

दिल्लीतील पाक उच्चायुक्तालयासमोर निदर्शने


बिलावल भुट्टो यांच्या विधानाविरोधात देशाची दिल्ली येथील पाकच्या उच्चायुक्तालयासमोर भाजप कार्यकर्त्यांतर्फे निदर्शने करण्यात आली. यावेळी दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष विरेंद्र सचदेव आणि युवा मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष खासदार तेजस्वी सूर्यादेखील सहभागी झाले होते.

पंतप्रधान मोदी – राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची चर्चा


रशियाने पुन्हा एकदा युक्रेनवर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. रशियाने युक्रेनमध्ये ६० हून अधिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवर चर्चा केली. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या संदर्भात पंतप्रधान मोदींनी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याशी झालेल्या चर्चेत संवाद आणि मुत्सद्दीपणा पुढे नेण्याच्या त्यांच्या आवाहनाचा पुनरुच्चार केला. समरकंदमधील शांघाय सहकार्य शिखर परिषदेत झालेल्या त्यांच्या भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंचा आढावा घेतला. ज्यात ऊर्जा सहकार्य, व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य आणि इतर प्रमुख क्षेत्रांचा समावेश आहे.



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121