खानिवडे : पालघर जिल्ह्यातील वनवासी महिलांसाठी ‘सेवा विवेक’ या सामाजिक संस्थेमार्फत नुकतेच ‘संविधान साक्षरता वर्गा’चे आयोजन करण्यात आले होते. पालघर तालुक्यातील बोट या गावातील बांबूपासून हस्तकलेत प्रावीण्य मिळवलेल्या वनवासी महिलांना प्रमुख पाहुणे ‘सेवा विवेक’चे मार्गदर्शक, ‘हिंदुस्थान प्रकाशन संस्थे’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ विचारवंत, लेखक रमेश पतंगे यांनी ‘संविधान साक्षरता मोहिमे’अंतर्गत संविधानाचे महत्त्व व फायदे याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी राजकुमारी गुप्ता (समाजसेविका) आणि प्रगती भोईर (प्रशिक्षण व विकास अधिकारी, ‘सेवा विवेक’ हे उपस्थित होते.
महिलांना संविधानातून मिळालेल्या हक्काचे रमेश पतंगे यांनी यावेळी पटवून दिले. संविधानाने आपल्याला काय दिले, तर आम्हाला राजकीय अधिकार दिले. मतदान करण्याचा अधिकार काय असतो, आपल्यावर राज्य कोणी करायचे, हे आपण आपल्या मतदानातून ठरवू शकतो. ‘स्री-पुरुष लिंगभेद’, ‘कन्या जन्म’; महिलांना संविधानाने खूप संरक्षण दिले आहे. रस्त्यावर फिरताना कोणी छेड काढली किंवा त्रास दिला, तर त्याला संविधानात दंड देण्याची तरतूद आहे, अशी संविधानातील संरक्षणात्मक व विविध माहिती रमेश पतंगे यांनी दिली.
‘’संविधानाने मुक्तपणे जगण्याचा, मुक्तपणे बोलण्याचा अधिकार दिला आहे. तसेच, एकत्रित येऊन बसण्याचा आणि विचार करण्याचा अधिकार दिला आहे. आपण चार पैसे आपल्या मनाप्रमाणे खर्च करू शकतो, हे सर्व स्वतंत्र आपल्याला संविधानाने दिले असून संविधानचे पुस्तक महिलांनी नक्की वाचावे,” असे रमेश पतंगे यांनी आवर्जून सांगितले.
या मार्गदर्शन शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरातील महिलांशी संवाद साधताना महिला रमेश पतंगे यांच्या प्रश्नांना उत्तर देत होत्या. त्यांचा मनातील प्रश्न त्या शिबिरात मांडत होत्या. कार्यशाळा संपल्यावर महिलांनी संविधानाचे महत्त्व, संविधानातील अधिकार तसेच, संविधानातील हक्क याची माहिती मिळाल्याने समाधान व्यक्त केले.
बांबू प्रशिक्षणातून रोजगाराच्या संधी
‘सेवा विवेक’ सामाजिक संस्थेने गेल्या अनेक वर्षांपासून महिला सक्षमीकरणासाठी पालघर जिल्ह्यातील वनवासी गरजू महिलांना घरकाम सांभाळून त्यांना आर्थिक हातभार लाभावा, त्यांना सन्मानजनक रोजगार प्राप्त व्हावा, यासाठी पुढाकार घेतला आहे. पालघर जिल्ह्यातील वनवासी महिलांना बांबू हस्तकलेचे प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित करण्यात येत असून आतापर्यंत शेकडोहून अधिक महिलांनी प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रशिक्षणानंतर घरच्या घरी रोजची कामे सांभाळून फावल्या वेळेत बांबू काम करून रोजगाराची मोठी संधी मिळाली आहे. आज संस्थेतील अनेक प्रशिक्षण घेतलेल्या महिला या संस्थेच्या प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहेत. तसेच, नवीन महिलांना प्रशिक्षण देत आहेत. यामुळे आदिवासी समाजातील महिलांचा आत्मविश्वासही वाढला आहे.