नवी दिल्ली: अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे चिनी सैन्यासोबत झालेल्या झटापटीनंतर भारतीय हवाईदलाने गुरुवारपासून पूर्व सीमेवर आपल्या पूर्वनियोजित हवाईसरावास प्रारंभ केला. यामध्ये राफेल, सुखोई आणि चिनुकसह भारतीय हवाईदलातील लढाऊ विमाने चिनला धडकी भरविणार आहेत.
लष्करी सरावाचा उद्देश भारतीय हवाई दलाची एकूण लढाऊ क्षमता आणि या क्षेत्रातील लष्करी सज्जतेची चाचणी घेणे हा आहे. तथापि, हा सराव पूर्वनियोजित होता आणि त्याचा चिनसोबत झालेल्या झटापटीशी संबंध नसल्याचे हवाईदलाने स्पष्ट केले आहे. या सरावामध्ये हवाई दलाचे आघाडीवर सर्व तळ आणि ईशान्य भारतातील अॅडव्हान्स लँडिंग ग्राउंड्स यांचाही समावेश करण्यात येणार आहे.
हवाई दलाची सुखोई लढाऊ विमाने तेजपूर हवाईतळावर तैनात आहेत, तर राफेल लढाऊ विमानांची एक तुकडी हसिमारा येथे तैनात आहे. याशिवाय अपाचे हेलिकॉप्टर आणि वाहतूक विमाने जोरहाटमध्ये तैनात आहेत. या दोन दिवसीय सरावात हेलिकॉप्टर आणि लष्करी वाहतूक विमानेही सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे चिनुक हेलिकॉप्टरदेखील सरावामध्ये आपले कसब दाखविणार आहे.
दरम्यान, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममधील वास्तविक नियंत्रण रेषेवर पूर्व लडाखमधील संघर्षानंतर लष्कर आणि हवाई दल गेल्या दोन वर्षांपासून उच्च पातळीवरील ऑपरेशनल सज्जता राखत आहेत चीनच्या वाढत्या हवाई हालचालींनंतर गेल्या आठवड्यात अरुणाचल प्रदेशच्या तवांग सेक्टरमध्ये भारतीय लढाऊ विमानांनी उड्डाण केले होते.
भारताचा ‘राफेल’ ताफा पूर्ण
फ्रान्ससोबत झालेल्या करारानुसार भारताला ३६ वे आणि शेवटचे राफेल लढाऊ विमान मिळाले आहे. हवाई दलाने 'द पॅक इज कम्प्लीट' असे ट्विट करून त्याची माहिती दिली आहे. दोन्ही देशांमधील ६० हजार कोटी रुपयांच्या करारांतर्गत भारताला एकूण ३६ राफेल विमाने पाठवण्याचा करार झाला होता. ही सर्व विमाने अंबाला, हरियाणा आणि पश्चिम बंगालमधील हाशिमारा येथे तैनात आहेत.