बर्याचदा व्यावसायिक गतिविधींशी संबंधित आकडेवारीकडे आपले फारसे लक्ष जात नाही. केवळ आकडेवारीशी संबंधित बातम्यांचे मथळे वाचून दुसर्या बातम्यांकडे आपण वळतो. पण, कित्येकदा जे मथळ्यांत लिहिलेले असते तेच सत्य नसते तर सत्य त्यापेक्षाही वेगळे असू शकते. नुकतीच चीनबरोबरील भारताच्या व्यापार तुटीची आकडेवारी जारी केली गेली. पण, त्यांना आपल्यापुढे सादर करण्याची पद्धत आणि त्यामागचे वास्तविक सत्य नेमके काय आहे, हे समजून घेतले पाहिजे.
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी राज्यसभेत चीनबरोबरच्या व्यापार तुटीची आकडेवारी जारी असून त्याच्या बातम्याही विविध माध्यमांनी दिल्या. उदाहरणार्थ, ‘इकॉनॉमिक टाईम्स’ आणि ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या बातम्यांचे मथळे अनुक्रमे, ‘इंडिया, चायना ट्रेड डेफिसिट अॅट युएसडी ५१.५ बिलियन डॉलर्स ड्युरिंग एप्रिल-ऑक्टोबर धीस फिस्कल’ आणि ‘इंडिया, चायना ट्रेड डेफिसिट रिचेस ५१.५ बिलियन डॉलर्स ड्युरिंग एप्रिल-ऑक्टोबर २०२२’ असे होते. या मथळ्यांना वाचून कोणालाही असे वाटेल की, चीनबरोबर भारताची व्यापार तूट सातत्याने वाढतच आहे. यामुळे सरकार ‘मेक इन इंडिया’ची चर्चा करते, चीनकडून आयात कमी करण्याची चर्चा करते, तरीही चीनकडून आयात वाढतच चालली आहे, असा विचार अनेक लोक करतील. पण, खरेच असे काही होत आहे का? तर त्याचे थेट उत्तर नाही, असेच आहे. कसे?
चालू आर्थिक वर्ष म्हणजेच एप्रिलपासून ऑक्टोबरपर्यंत भारत आणि चीनमधील व्यापार तुटीचे अंतर ५१.५ अब्ज डॉलर्स राहिले. ९ डिसेंबरला भारत सरकारने याची माहिती संसदेत दिली. वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी जी आकडेवारी संसदेत दिली, त्यानुसार २०२०-२१ मध्ये व्यापार तूट ४४.०३ अब्ज डॉलर्स होती ती आता २०२१-२२ मध्ये वाढून ७३.३१ अब्ज डॉलर्स झाली. आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्ष म्हणजे एप्रिलपासून ऑक्टोबरपर्यंत ६०.२७ अब्ज डॉलर्सची आयात चीनमधून झाली तर निर्यात केवळ ८.७७ अब्ज डॉलर्सची झाली. पीयूष गोयल यांनी संसदेत सांगितले की, भारतातून चीनला २०१४-१५ मध्ये ११.९३ अब्ज डॉलर्सची निर्यात झाली होती जी २०२१-२२ मध्ये वाढून २१.२६ अब्ज डॉलर्स झाली. गेल्या सहा वर्षांत यात ७८.२ टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर दुसरीकडे चीनकडून २०१४-१५ मध्ये ६०.१४ अब्ज डॉलर्सची आयात झाली होती जी २०२१-२२ मध्ये वाढून ९४.५१ अब्ज डॉलर्सवर पोहोचली.
यावरून असे दिसते की, निर्यात वाढली पण निर्यातीच्या तुलनेत आयात फारच जास्त आहे. यामुळे व्यापारी तूटदेखील वाढली आणि हेच सगळी प्रसारमाध्यमे सांगत आहेत, पण यापुढचेही चित्र पाहिले पाहिजे. वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी संसदेत सांगितले की, २००४-०५ मध्ये व्यापार तूट १.४८ अब्ज डॉलर्स होती जी २०१३-१४ मध्ये वाढून ३६.२१ अब्ज डॉलर्स झाली. म्हणजे यात २,३४६ टक्क्यांची वाढ झाली. तर त्यानंतर २०२१-२२ पर्यंत चीनबरोबरील व्यापार तूटीत फक्त १०० टक्क्यांची वाढ झाली असून, २०२१-२२ मध्ये ती ७३.३१ अब्ज डॉलर्स होती. अर्थात २००४-०५ पासून २०१३-१४ पर्यंत व्यापार तूटीत जी वाढ २,३४६ टक्के झाली होती ती वाढ पुढील वर्षांत कमी झाली. २०१४-१५ पासून २०२१-२२ मध्ये व्यापारी तुटीत १०० टक्क्यांची वाढ झाली असून ती आधीच्या वाढीपेक्षा फार कमी आहे. अशा परिस्थितीत हे निश्चितपणे सांगता येते की, चीनकडून आयात नक्कीच कमी झाली असून निर्यात वाढली आहे.
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी याबरोबरच असेही सांगितले की, चीनकडून ज्या वस्तूंची आयात केली गेली, त्यात कॅपिटल गुड्स, इंटरमिजिएट गुड्स आणि कच्च्या मालाचा वाटा अधिक आहे. या सामानाची आयात केली गेली, कारण यामुळे इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकॉम आणि विजेसारख्या भारतात वेगाने वाढणार्या क्षेत्रांच्या मागणीची पूर्तता व्हावी म्हणून. याबरोबरच वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी सांगितले की, चीनकडून आयात केली जात असून यामुळे भारतात वस्तूनिर्मिती होईल व त्याची निर्यात करता येईल. याचा अर्थ, इथे वस्तूंची निर्मिती करून अन्य देशांना निर्यात करण्यासाठीच चीनकडून वस्तूंची आयात केली जात आहे. त्यामुळे आधीच्या काळासारखीच चीनकडून आयात केली जात आहे, असे म्हणणे संपूर्णपणे चुकीचे ठरते. मात्र, यावरून चीनबरोबरील वाढती व्यापार तूट चांगली आहे. कारण तिथून कच्चा माल खरेदी करून भारत देशातच वस्तूनिर्मिती करत असून नंतर अन्य देशांना त्याची विक्री करत आहे, असे नक्कीच म्हणू शकतो.