स्वामींनी स्पष्ट शब्दांत पुढे सांगितले आहे की, हा परमेश्वर दयाळू आहे. भक्ताच्या बाबतीत तो श्रीमंत-गरीब असा भेदभाव करीत नाही. दयाळू परमेश्वराला मनात आठवावे. तो ‘दीनाचा दयाळू’ आपली काळजी घ्यायला समर्थ आहे. ‘दीन’ होण्यात शरणागतीचा भाव असतो. भगवंतासाठी दीनदया, शरणागती धारण केल्यास त्याचे स्मरण राहते. तो कृपा करतो. भगवंताला सोपस्कारांपेक्षा मनाची शुद्घता आणि भक्तिप्रेम हवे असते. अशा दयाळू भगवंताचे सदैव मनात स्मरण ठेवणे, हे यज्ञ-यागादी साधनांपेक्षा श्रेयस्कर आहे, असे समर्थ सांगतात
विज्ञाननिष्ठेचे महत्त्व कळले असले, तरी समाजात व्रतवैकल्ये करणे, व्रत समाप्त करताना उद्यापनांचे समारंभ, जेवणावळी करणे, देवांच्या नावाने उपवास करणे, अनुष्ठान करणे अशा प्रकारांना धार्मिकतेच्या नावाखाली मान्यता आहे. त्यांचे यथासांग पालन करायचे तर शरीराला कष्ट द्यावे लागतात, हे आपण पाहतोच. त्याहीपेक्षा कठोर व अघोरी व्रतसाधना समर्थकाळी लोक सिद्धी मिळवण्यासाठी करीत असत. अशी कामनातृप्तीची व्रते तत्कालीन समाजात रुढ होती. लोकांची त्यासाठी चढाओढ असे. हे लोकोपचार पाहून समर्थांनी दासबोधात ‘लोक कामनेच्या व्रताला झोंबोनि पडती।’ असे आपले निरीक्षण नोंदवले आहे. हे सारे पाहिले असल्याने समर्थ मागील श्लोकात म्हणाले की, ‘देह दंडणेचे महादु:ख आहे।’ यासाठी समर्थ पुन्हा पुन्हा सांगतात की, सर्व साधनात रामनाम हे सोपे साधन आहे. त्यासाठी ना शारीरिक कष्ट करावे लागतात, ना पैसे खर्च करावे लागतात.
पण, तरीही लोक सांगण्याकडे दुर्लक्ष करतात. याचे कारण म्हणजे लोकांचा असा समज आहे की, जेथे खूप पैसे खर्च करावे लागतात, ज्याच्यासाठी शारीरिक परिश्रम करावे लागतात, देहाला त्रास द्यावा लागतो, त्या व्रताचरणातून मिळणारे फायदे किंवा पुण्य मोठे असले पाहिजे, त्यातून काहीतरी चमत्कार घडून इच्छा तृप्त होतील. ते फळ सोप्या साधनांनी मिळणार नाही. रामनाम घेणे तर खूप सोपे वाटत असल्याने (वस्तुत: ते सोपे नाही) अशा सोप्या क्रियांतून काय फायदे मिळणार? कठीण व्रतचरणातून, अनुष्ठान, दानांतून पुण्यसंचय होतो, शिवाय लोकांत मानसन्मान मिळून प्रतिष्ठा प्राप्त होते. नामस्मरणाने लोक तुम्हाला ओळखतही नाहीत, अशी विचार करण्याची पद्धत तयार झालेल्या मूर्खांना रामनामाचे महत्त्व कसे पटवून द्यावे, हे मोठे आव्हान स्वामींसमोर असावे. म्हणून स्वामी पुन्हा पुन्हा ‘दीनांच्या दयाळू’ असा रामाचा उल्लेख करुन त्याचे चिंतन करावे, असे सांगतात. पुढील श्लोकात आशयही याच स्वरुपाचा आहे-
बहूतांपरी संकटे साधनाचीं।
व्रत दान उद्यापने तें धनाचीं।
दिनाचा दयाळू मनीं आठवावा।
प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥७४॥
जीवाच्या उद्धारासाठी अथवा भौतिक सुखाच्या प्राप्तीसाठी समाजात अनेक साधने प्रचलित आहेत.त्यातील काही शास्त्रधारे असल्याचे सांगितले आहे, तर इतर साधने परंपरागत चालत आलेली असतात. अशा सधानात योगसाधना आणि यज्ञ-याग यांना पूर्वी फार महत्त्व होते. योगाचा पसारा तर खूप मोठा आहे. त्यात कुंडलिनी जागृती व त्याद्वारा मिळणारा सिद्धींचा समावेश आहे. पतंजली महामुनींचे ‘अष्टांगयोग’ प्रसिद्ध आहेत. आजकाल योगासनांना ‘योगसाधना’ म्हणून ओळखले जाते, पण, ते बरोबर नाही. योगशास्त्रात साधनेत यम, नियम, आसन, प्राणायम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी या क्रिया समाविष्ट असतात. त्या क्रियांनी अंतर्बाह्य शुचिता साधून साधना करावी लागते. हे सर्व अधिकारी पुरुषाच्या मार्गदर्शनाखाली शिकावे लागते. त्यात चूक झाली, तर साधकाला अनेक संकटांशी सामना करावा लागतो.
थोडक्यात, ही साधने निर्विघ्न नाहीत. त्याचप्रमाणे यज्ञहवन, याग हे प्रकार पूर्वी ऋषिमुनींच्या काळी चालत असत. ते सफल होण्यासाठी कोणा सिद्धपुरुषाकडूनच यज्ञ करुन घेत असत. यज्ञासाठी यज्ञभूमी, यज्ञसामुग्री, यज्ञप्रीत्यर्थ करावयाची महागडी दाने, इतर ऋषींना शिष्यांसह पाचारण, त्यांचे आदरातिथ्य वगैरे यांचा समावेश असे यज्ञदानात सुवर्णदान, गोदान, भूमिदान, द्रव्यदान इत्यादी दाने फलप्राप्तीसाठी करावी लागत. हे सामान्य माणसाचे काम नाही. पूर्वीच्या काळी राजे, महाराजे यज्ञांचे आयोजन करीत. त्यांची वर्णने वाचायला मिळतात. आज यज्ञयाग हे प्रकार कालबाह्य झालेले आहेत. महागडे यज्ञ कुठे दिसत नाहीत. तथापि, यज्ञसंस्थेकडून शिल्लक राहिलेले काही अवशेष प्रकार कालमानाप्रमाणे बदल करुन समाजाने चालू ठेवले आहेत. दानाचे निरनिराळे आधुनिक प्रकार झाले आहेत. लोक वाराप्रमाणे उपवास करु लागले. वार देवांच्या नावाशी, अवतारांशी जोडले गेले.
आचार्यसत्काराऐवजी व्रताच्या पारायणाला नातेवाईकांना बोलावले जाऊ लागले. अशारीतीने थोड्या फार फरकाने यज्ञक्रियावशेष टिकून राहिले. समर्थांच्या काळी तर शाक्त, कापालिक या अघोरी पंथांचे अस्तित्व होते. हे पंथ सिद्धी मिळवण्यासाठी अघोरी क्रिया अमावास्येच्या रात्री स्मशानात जाऊन करीत असत. या सर्व साधनांचा साकल्याने विचार केला, तर ती अघोरी, संकटांनी युक्त पैशांच्या द्रव्याचा व्यय करणारी असत. समर्थांनी या श्लोक क्र. ७४च्या पहिल्या ओळीत ‘बहुतांपरी संकटे साधनांचीं।’ असे त्यांचे वर्णन केले आहे.ही सर्व भेसूर वाटणारी किंवा धनाढ्य माणसांची साधने, सामान्यांसाठी नाहीत, असे असल्याने सामान्यांचा परमेश्वराविषयी गैरसमज होईल की, आपल्याला हे शक्य नाही. म्हणून स्वामींनी स्पष्ट शब्दांत पुढे सांगितले आहे की, हा परमेश्वर दयाळू आहे.
भक्ताच्या बाबतीत तो श्रीमंत-गरीब असा भेदभाव करीत नाही. दयाळू परमेश्वराला मनात आठवावे. तो ‘दीनाचा दयाळू’ आपली काळजी घ्यायला समर्थ आहे. ‘दीन’ होण्यात शरणागतीचा भाव असतो. भगवंतासाठी दीनदया, शरणागती धारण केल्यास त्याचे स्मरण राहते. तो कृपा करतो. भगवंताला सोपस्कारांपेक्षा मनाची शुद्घता आणि भक्तिप्रेम हवे असते. अशा दयाळू भगवंताचे सदैव मनात स्मरण ठेवणे, हे यज्ञ-यागादी साधनांपेक्षा श्रेयस्कर आहे, असे समर्थ सांगतात. म्हणून सुप्रभाती रामाचे चिंतन करावे.नामस्मरण हे सर्व प्रकारांचे सार आहे, हे कळत नसेल, तर स्वामींचा पुढील श्लोक पाहावा-
समस्तामध्यें सार साचार आहे।
कळेना तरी सर्व शोधून पाहें।
जिवा संशयो वाडगा तो तजावा।
प्रभाते मनीं राम चिंतीत जावा॥७५॥
भगवंताकडे जाण्याच्या मार्गांचा विचार केला, तर सर्व प्रकारांचे सार हे नामस्मरण आहे. हे स्वामींनी सांगूनही तुम्हाला पटत नसेल, तर तुम्ही स्वत: सर्वांचा अभ्यास करून खात्री करून घ्या. संतांनी प्रचितीतून त्यांचे विचार मांडलेले असतात. संतांच्या वाड्मयाचा अभ्यास केला तर त्यातही नामस्मरणाचे महत्त्व सांगितलेले आढळेल. भगवंताच्या नामात त्याचे स्मरण होत असते. सततच्या नामाने भगवंताचे अस्तित्व जाणवते. व्यवहारातसुद्घा एखाद्या व्यक्तीची आठवण काढायची, तर त्याचे नाव प्रथम पुढे येते. नामस्मरणाच्या अभ्यासात, इतर साधनांच्या अभ्यासाने मिळणारे फळ अपेक्षित आहे. त्यामुळे सर्वांचे सार ‘नामस्मरण’ आहे. आपल्या मनात संशय असल्याने ते आपल्याला पटत नाही. तथापि संशय घेणे हे गैर आहे, असे नव्हे.
संशयाने जिज्ञासा उत्पन्न होते व मन ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करू लागते. संशय घेऊ नका, असे समर्थ सांगत नाहीत. जिज्ञासेपोटी संशय घ्यायला हरकत नाही. पण, माझ्या इतका कोणी ज्ञानी नाही, माझ्या इतका कोणी हुशार-बुद्घिमान नाही, या भावनेतून केवळ वितंडवाद घालण्याकरिता कोणी शंका उत्पन्न करीत असेल, संशय वाढवीत असेल, तर त्यातून कोणाचे भले होणार नाही. ही व्यर्थ शंका घेण्याची सवय माणसाने सोडून द्यावी. यासाठी स्वामी सांगतात, ‘जिवा संशयो वाडगा तो तजावा’ असा वावगा म्हणजे व्यर्थ, निरुपयोगी संशय टाकून द्यावा. हा निरुपयोगी संशय माणसाचे नुकसान करतो. ‘वावगा संशय’ फेकून देऊन सकाळी मनात रामाचे चिंतन करावे. नामस्मरण सोडू नये. त्यातच माणसाचे भले आहे.