मोठी बातमी! जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू!

    13-Dec-2022
Total Views | 91

Jalyukta Shiwar Yojana
 
 
 
 
 
मुंबई : जलयुक्त शिवार अभियान २.० सुरु करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यापूर्वी जलयुक्त शिवार अभियान २०१५-२०१९ या कालावधीत राबविण्यात आले होते व ३९ लाख हेक्टर शेतीसाठी सिंचनाच्या सुविधा निर्माण झाल्या होत्या. आता नव्याने सुरु होणाऱ्या या अभियानात येत्या ३ वर्षात सुमारे ५ हजार गावे नव्याने समाविष्ट केली जातील.
 
 
जलयुक्त शिवार अभियान २२ हजार ५९३ गावात राबविण्यात आले व यामध्ये ६ लाख ३२ हजार ८९६ कामे पूर्ण झाली. तसेच २० हजार ५४४ गावे जल परिपूर्ण झाली. या कामांमुळे २७ लाख टीसीएम पाणीसाठा क्षमता निर्माण झाली. तसेच कृषीचे विशेषत: रब्बीतील उत्पादनही वाढले. जलयुक्त शिवार अभियान टप्पा-२ मध्ये प्रथम टप्प्यातील पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम न राबविलेल्या पात्र गावांमध्ये मृद व जलसंधारणाची कामे घेण्यात येतील. त्याचप्रमाणे ज्या गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियानाचा पहिला टप्पा राबविला गेला आहे पण अद्याप गावांमध्ये पाण्याची गरज आहे तेथे देखील ही कामे लोकसहभागातून करण्यात येतील.
 
 
या अभियानासाठी जलयुक्त शिवार अभियान पहिला टप्पा, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प व आदर्श गाव तसेच इतर पाणलोट क्षेत्र विकासाची कामे पूर्ण झालेली गावे वगळता उर्वरित गावे निवडण्यात येतील. गाव आराखडा तयार करताना पाणलोट क्षेत्र हा नियोजनाचा घटक राहील. अंतिम आराखड्याला ग्रामसभेची मान्यता झाल्यानंतर तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता देण्यात येईल. गाव आराखड्यानुसार कामे झाल्यानंतर गावाचा जल परिपूर्णता अहवाल तयार करण्यात येईल.
 
 
पूर्ण झालेल्या योजनांसाठी देखभाल दुरुस्ती परिरक्षण देखील करण्यात येईल. गावांमधील ग्रामस्थांची जलसाक्षरता अभियानाद्धारे जनजागृती देखील करण्यात येईल. पिकाच्या उत्पादकतेमध्ये शाश्वतता आणणे त्याचप्रमाणे सामुहिक सिंचन सुविधा निर्माण करणे या व इतर बाबींचा आराखड्यामध्ये समावेश असेल.
 
 
जलयुक्त शिवार अभियानाच्या संनियंत्रणासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तसेच तालुका स्तरावर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समित्या असतील. कामे गुणवत्तापूर्ण होण्यासाठी ३ लाखांपेक्षा अधिकचे काम ई-निविदेमार्फत करण्यात येईल. सर्व मृद व जलसंधारण कामाचे मॅपिंग करून नकाशे अद्ययावत करून जिओ पोर्टलवर टाकण्यात येतील.
मुक्ताईनगर तालुक्यातील उपसा सिंचन योजनेस मान्यता
 
 
२६ हजार हेक्टर क्षेत्रास लाभ
 
जळगांव जिल्ह्यातील कुऱ्हा-वढोदा इस्लामपूर उपसा सिंचन योजनेला गती देण्याचा आणि त्यासाठी २२२६ कोटी रुपयाच्या सुधारित खर्चास मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
 
इस्लामपूर धरणातून जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील २१ गावे तसेच बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव-जामोद तालुक्यातील ५३ गावे तसेच संग्रामपूर तालुक्यातील ३० गावे अशी एकूण १०४ गावातील २५ हजार ८९८ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार आहे. जळगाव जिल्ह्यातील ८ हजार २४९ हेक्टर आणि बुलढाणा जिल्ह्यातील १७ हजार ६४९ हेक्टर क्षेत्र सिंचित होणार आहे.
 
या प्रकल्पासाठी ५९७ हेक्टर जागेपैकी ४५८ हेक्टर भूसंपादन झाले आहे. माती धरणाचे काम ६८ टक्के पूर्ण झाले असून कमांड एरियामध्ये ५ हजार १६२ शेततळी देखील घेण्यात येणार आहेत.
 
 
नाममात्र नोंदणी व मुद्रांक शुल्क आकारणार
 
शेतजमिनीच्या ताब्यावरून वाद मिटवणाऱ्या सलोखा योजनेस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यासाठी सवलतीत मुद्रांक शुल्क नाममात्र १००० रुपये व नोंदणी फी १०० रुपये आकारण्यात येईल.
 
शेतजमिनीच्या ताबा व वहिवाटीबाबत शेतकऱ्यांमध्ये आपापसात वाद होतात. ते मिटविण्यासाठी व समाजामध्ये सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी ही योजना आणण्यात आली आहे.
 
या योजनेत एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमीन धारकांचे अदलाबदल दस्तासाठी नोंदणी फी व मुद्रांक शुल्कामध्ये सवलत देण्यात येईल.
 
या योजनेमुळे शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक मानसिकता निर्माण होईल. तसेच विविध न्यायालयातील प्रकरणे निकाली निघतील. भूमाफियांचा अनावश्यक हस्तक्षेप सुद्धा होणार नाही. महाराष्ट्रात एकूण जमिनधारकांची खातेसंख्या 3 कोटी 37 लाख 88 हजार 253 एवढी असून एकूण वहिवाटदार शेतकरी 1 कोटी 52 लाख इतकी आहे. शेत जमिनीच्या ताब्यासंदर्भात एकूण बाधित शेतकऱ्यांची संख्या सुमारे 13 लाख 28 हजार 340 इतकी आहे. सलोखा योजनेत अर्ज केल्यानंतर तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी 15 दिवसात पंचनामा करणे आवश्यक आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
सामर्थ्य-परमार्थाचा मेळ म्हणजे मधु मंगेश कर्णिक!

सामर्थ्य-परमार्थाचा मेळ म्हणजे मधु मंगेश कर्णिक!

"कोकणी माणसाचे भावविश्‍व मराठी साहित्यामध्ये योग्य शब्दात चितरणारे मधु मंगेश कर्णिक म्हणजे सामर्थ्य आणि परमार्थाचा अनोखा संगम आहे" असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केले. ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या ९५व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्याच्या भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत, सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रदीप ढवळ, अध्यक्ष ..

पाकिस्तानी नागरिकांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धस्तरावर: मुख्यमंत्री

पाकिस्तानी नागरिकांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धस्तरावर: मुख्यमंत्री

महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची यादी प्राप्त केली असून, त्यांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरु आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मिरातील पर्यटकांना परत महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारने केलेले तिसरे विशेष विमान 232 प्रवाशांना घेऊन आज मुंबईत दाखल झाले. मंत्री आशिष शेलार यावेळी उपस्थित होते. यातील अकोला, अमरावती येथील प्रवाशांच्या पुढच्या प्रवासासाठी बसेसची व्यवस्था सुद्धा करण्यात आली. आतापर्यंत सुमारे ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121