नवी दिल्ली : ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनने (ओआयसी) भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये नाक खुपसू नये, अशा शब्दात भारताने ओआयसीला फटकारले आहे. ओआयसीचे सरचिटणीस हिसेन ब्राहिम ताहा यांच्या पाकव्याप्त जम्मू – काश्मीरच्या दौऱ्यावरल भारताने तीव्र आक्षेप घेतला आहे.
त्याचप्रमाणे त्यांनी जम्मू – काश्मीरविषयीच्या त्यांच्या वक्तव्यावरही टिका केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले, ओआयसीचे सरचिटणीस हिसेन ब्राहिम ताहा यांनी त्यांच्या पीओके भेटीदरम्यान जम्मू-काश्मीरबाबत केलेल्या टिप्पणीचा भारत तीव्र निषेध करतो. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, भारताचा अविभाज्य आणि अविभाज्य भाग असलेल्या जम्मू आणि काश्मीरशी संबंधित प्रकरणांमध्ये ओआयसीचे कोणतेही अधिकार क्षेत्र नाही. ओआयसीकडून भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करणे भारतास कदापी मान्य नसल्याचे बागची यांनी म्हटले आहे.
ते पुढे म्हणाले, सांप्रदायिक, पक्षपाती आणि वस्तुस्थितीनुसार चुकीचा दृष्टीकोन स्वीकारून आयआयसीने आपली विश्वासार्हता गमावली आहे. त्याचे सरचिटणीस दुर्दैवाने पाकिस्तानचे मुखपत्र बनले आहेत. आम्हाला आशा आहे की भारतात, विशेषत: जम्मू आणि काश्मीरमध्ये सीमापार दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचा पाकिस्तानचा नापाक अजेंडा पूर्ण करण्यामध्ये ओआयसी भागिदार होणार नसल्याची भारताला आशा वाटत असल्याचेही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.