ठाणे: ठाणे जिल्ह्यातल मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम सुरु झाला असून या मतदार नोंदणी मोहिमेंतर्गत पुढील वर्षी वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तींची नोंदणी करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.मतदार नोंदणी मोहिमेत महिलावर्गाचा पुढाकार उल्लेखनीय असल्याचेही त्यांनी सांगितले.
दिनांक १ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित मतदारयादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. याबाबतची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी जिल्हाधिकारी शिनगारे यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली. उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यावेळी उपस्थित होते.
निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार,२०२३ या वर्षात ०१ जानेवारी, ०१ एप्रिल, ०१ जुलै आणि ०१ ऑक्टोबर या चार दिनांकांना १८ वर्षे पूर्ण होणाऱ्याना मतदार नोंदणी करता येणार आहे.तसेच, ३० सप्टे.२०२३ रोजीपर्यत ज्यांची १८ वर्ष पूर्ण होणार आहेत.अशा मतदारांनी ९ नोव्हे. ते ८ डिसेंबर २०२२ या कालावधीत सुरु असलेल्या मोहिमेत आगाऊ मतदार नोंदणी करता येणार आहे. मतदारयादीत आपले नाव नोंदविण्यासाठी व्होटर हेल्पलाईन ॲप (VHA), एनएसव्हीपी व व्होटर पोर्टल या ऑनलाईन सुविधांचा वापर करावा. असे आवाहनही शिनगारे व जिंदल यांनी केले आहे.