भारतीय सैन्यदलात तरुणपिढीने आवर्जून सहभागी व्हावे, यासाठी शाळा आणि महाविद्यालयात जाऊन मार्गदर्शन करणार्या मेजर विनय देगावकर यांच्या कार्याविषयी...
विनय देगावकर यांचा जन्म डोंबिवलीतला. सध्या ते डोंबिवलीतील पांडुरंगवाडी परिसरात वास्तव्यास आहेत. विनय यांना एक भाऊ आणि एक बहीण. त्यांचे वडील हे ‘एएमपी लॅब’मध्ये कार्यरत होते. अशा एका मध्यमवर्गीय कुटुंबात विनय यांची जडणघडण झाली. तसे त्यांच्या घरात रा. स्व. संघाचे वातावरण. त्यांचे आईवडील हे संघविचारसरणीशी जोडलेले. त्यामुळे भावी आयुष्यात या विचारांचा खूप फायदा झाला, असे विनय नम्रपणे कबलू करतात.
विनय यांचे बालवाडी ते बारावीपर्यंतचे शिक्षण टिळकनगर विद्यामंदिर येथून झाले. दहावीनंतर त्यांनी विज्ञान शाखेची निवड केली. त्यानंतर त्यांनी ‘आर्किटेक्चर’चे प्रशिक्षण पिल्लाई महाविद्यालय, न्यू पनवेल येथून घेतले. ‘आर्किटेक्चर’चा पाच वर्षांचा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला. विनय यांच्यातील नेतृत्वगुणांची प्रचिती त्यांच्या शालेय जीवनापासून दिसू लागली. पुढे महाविद्यालयीन जीवनातही ते विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करीत असत.
त्यांच्या महाविद्यालयात फुटबॉल खेळणारी एक टीम होती. त्या टीमसाठी विद्यापीठातून परवानगी आणणे, यांसारखे कामे विनय यांनी अगदी आवडीने केली. ते म्हणतात की, “प्रत्येकाने कोणत्याही एखाद्या संस्था किंवा संघटनेशी जोडलेले असणे गरजेचे आहे. त्यामुळे नेतृत्व करता येते. कसे बोलावे, वागावे हे समजू लागते. एखादं कार्यक्रम कसा आयोजित करावा, हेदेखील शिकता येते.” मी संघ परिवारशी जोडलेला असल्याने मला वैयक्तिक जीवनातही याचा फायदा झाल्याचे विनय सांगतात.
विनय यांनी ‘आर्किटेक्चर’चे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर स्वतंत्र ‘प्रॅक्टिस’ सुरू केली. या क्षेत्रातील एक-दोन कामेही त्यांनी केली. पण, त्यात त्यांचे मन रमले नाही. दरम्यानच्या काळात काहीतरी वेगळी संधी शोधण्याचे त्यांचे प्रयत्न सुरूच होते. जे क्षेत्र आपण कामासाठी निवडणार आहोत, त्यात किमान सन्मान मिळावा, अशी त्यांची अपेक्षा होती. त्यासाठी एक मार्ग होता तो ‘युपीएससी’ची परीक्षेचा आणि दुसरा मार्ग म्हणजे सैन्यात भरती होणे. मग काय त्यांनी पहिला पर्याय निवडत ‘युपीएससी’चा अभ्यासही सुरू केला होता.
दुसर्या बाजूला पुणे विद्यापीठातून त्यांचा ‘एमपीएससी’चा ही अभ्यास सुरू होता. पण, सन्मानाचे जीवन जगायची अपेक्षा असली तरी त्यांना ‘आर्किटेक्चर’ या त्यांच्या आवडीच्या क्षेत्रापासून दूरही जायचे नव्हते. म्हणूनच सैन्याकडून भरतीसाठी विचारणा होईल, तेव्हा त्याला सकारात्मक प्रतिसाद देण्याचे विनय यांनी मनोमन निश्चित केले होते. सैन्याकडून त्यासंबंधी सूचना आल्यानंतर अर्ज भरायचे त्यांनी ठरविले.
‘आर्किटेक्चर’ची प्रत्येक कोर्समध्ये एकच जागा असते, त्यामुळे आपला नंबर लागेल, याची त्यांनाही खात्री नव्हतीच. दुसरीकडे घरच्यांना आपण काय करणार आहोत, याविषयी विनय यांनी कुठलीही माहिती दिली नव्हती. पण, एकेदिवशी सैन्यातून मुलाखतीसाठी लगेचच त्यांना बोलवणे आले. पण, त्यांना त्या परीक्षेची फारशी तयारी करता आली नाही. पण, तरीही त्यांनी मुलाखत दिली. सैन्यात जाणे एवढे सोपे नाही, अशी चर्चा त्यांच्या घरातही होती.
कुटुंबीयांच्या मनात थोडी साशंकता होती. पण, नशीबाने साथ दिली आणि मुलाखत विनय यांनी उत्तम दिल्याने त्यांची निवडही झाली. त्यांची निवड झाल्याने ते ऑफिसर अकादमी, चेन्नई येथे प्रशिक्षणासाठी रवाना झाले. 2004 ते 2005 या एक वर्षाच्या कालावधीत त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले. सैन्याचे प्रशिक्षण हे कठीण असल्याने इतरांप्रमाणणे ते मलाही पूर्ण करणे कठीण गेल्याचे विनय अगदी प्रांजळपणे कबूल करतात.
विनय यांची ‘लेफ्टनंट’ म्हणून 2005 साली अमृतसर येथे ‘पोस्टिंग’ झाली. ‘टेक्निकल’ शाखेत पदवीधर असल्यामुळे त्यांना सहाच महिन्यात ‘प्रमोशन’देखील मिळाले. ‘प्रमोशन’ झाल्याने त्यांना ‘कॅप्टन’ ही पोस्ट मिळाली. त्यानंतर ते सिक्कीमनजीक एका भागात काही काळ कार्यरत होते. त्याठिकाणी रस्ते बांधणीसारखी विविध कामे सुरू होती. विनय यांनी 2011पर्यंत सैन्यात अगदी निष्ठेने सेवा बजावली.
त्यांनी लखनौमधून ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’ हा कोर्स करून 2011च्या मे महिन्यात परतले. हा कोर्स करण्यासाठी सरकारकडूनच साहाय्य केले जाते. हा कोर्स पूर्ण झाल्यावर ते डोंबिवलीत परतले. पुन्हा डोंबिवलीत आल्यावर ‘आर्किटेक्चर’ची आणि बांधकाम व्यवासायिक म्हणून कामे करण्यास त्यांनी सुरूवात केली. रोहा आणि पेण येथे अशाच काही प्रकल्पांसाठी त्यांनी काम केले आणि ही सर्व कामे करता करताच सामाजिक कार्याशी ते जोडले गेले.
2012 पासून डोंबिवलीच्या गणेश मंदिर संस्थानचे सदस्य म्हणूनही विनय यांनी काम पाहिले आहे. 2014 ते 2018 या कालावधीत त्यांनी नववर्ष स्वागत यात्रा समितीमध्येदेखील काम केले. 2017 आणि 2018 या कालावधीत त्यांनी नववर्ष स्वागत यात्रा प्रमुख म्हणूनही जबाबदारी पार पडली. स्वागत यात्रेच्या दरम्यान सर्व जातिधर्मांना सामावून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. शेलारनाका येथील वाल्मिकी समाजाला पालखीचे भोई होण्याचा मानही त्यांनी दिला.
त्यासाठी वाल्मिकी समाजातील तरुणांकडे विनय यांनी प्रस्ताव मांडला तेव्हा त्या तरुणांना गहिवरून आले. कारण, आजपर्यंत या समाजाला असा मान कधीच दिला नव्हता. जातिपंथाच्या पुढे जाऊन सर्व समाजाला नववर्ष स्वागतयात्रेत त्यांनी सर्वांना सामावून घेतले. 2013 साली ‘रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्ट’ या संस्थेशीही ते जोडले गेले.
विनय हे ‘अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदे’चे महाराष्ट्र प्रदेश सचिव म्हणूनही काम पाहतात. या माध्यमातून माजी सैनिकांचे काही मुद्दे, त्यांच्या समस्यानाही त्यांनी उपस्थित केल्या. तसेच काही ‘वीरमाता’ आणि ‘वीरपत्नी’ यांना ज्यांना सरकारी गोष्टींची फारशी माहिती नसते, त्यांना त्यासंबंधी नियम, कायदे यांची माहिती करून देण्याचे काम ते करतात. तरूणांमध्ये भारतीय सैन्याविषयी प्रेम निर्माण करून त्यांनीही सैन्यात भरती व्हावे, यासाठी लेक्चर्स घेण्याचे काम विनय करतात. त्यांनी आतापर्यंत 30 ते 35 ठिकाणी अशी व्याख्याने दिली आहेत. देशसेवा करुन आता तरुणाईची पावले देशसेवेकडे वळावी, म्हणून प्रयत्नशील असलेल्या या राष्ट्रसैनिकाला दै.‘मुंबई तरूण भारत’कडून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!