मुंबई ( T20WC2022) ; ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर भारत विरुद्ध झिम्बाब्वे सामन्यात टीम इंडियाने विजय संपादन करून उपांत्य फेरीतील आपले स्थान पक्के केले आहे. नाणेफेक जिंकून भारतीय संघाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेत, विजयासाठी झिम्बाब्वे समोर १८६ धावांचा डोंगर रचला आहे.सूर्यकुमार यादवची झंझावती खेळी आणि लोकेश राहुलच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने तगडे लक्ष्य उभे केले. त्यानंतर गोलंदाजांनी त्यांची जबाबदारी चोख पार पाडली. भारताने या विजयासह ग्रुप २ मध्ये ८ गुणांसह अव्वल स्थान कायम राखले. उपांत्य फेरीत त्यांच्यासमोर इंग्लंडचे आव्हान असणार आहे.
नाणेफेक जिंकून( T20WC2022) प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने २० षटकांत ५ गडी गमावून १८६ धावा केल्या.आजच्या सामन्यात भारतीय संघात दिनेश कार्तिक ऐवजी ॠषभ पंतला संधी देण्यात आली. सलामीसाठी आलेला कर्णधार रोहित शर्मा केवळ १५ धावा करून गारद झाला. त्यानंतर विराट कोहली व केएस राहुल या जोडीने भारताची खिंड लढवत ६० धावांच्या भागीदारीसह मोठी धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न केला. झिम्बावे विरुद्धच्या सामन्यात केएसराहुल याने टी२० विश्वचषकात दुसऱ्यांदा अर्ध शतक झळकावले. आपल्या ५१ धावांची खेळी करताना त्याने ३ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता.
त्याचबरोबर सूर्यकुमारने( T20WC2022) केवळ २५ चेंडूत ६१ धावांची नाबाद खेळी खेळली. सूर्यकुमारने आपल्या तुफान फटके बाजीत सहा चौकार आणि चार षटकारांचा वर्षाव केला. या दोघांव्यतिरिक्त विराट कोहली (२६) आणि हार्दिक पंड्या (१८) यांनी दोन आकडी धावसंख्या पार करत संघाच्या धावसंख्येत मोलाचे योगदान दिले. दिनेश कार्तिकच्या जागी संधी मिळालेल्या ॠषभ पंतने या सामन्यात ३ धावा केल्या.
झिम्बाब्वेच्या चार गोलंदाजांना ( T20WC2022) विकेट्स घेण्यात यश आले. शॉन विलियम्स याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने २ षटकात ९ धावा देत २ गडी बाद करण्याची कामगिरी केली. त्याच्याव्यतिरिक्त सिकंदर रझा, ब्लेसिंग्स मुझरबानी आणि रिचर्ड नगारवा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. उपांत्य फेरीतील टीम इंडियाचा सामना ऐतिहासिक अॅडलेड ओव्हल मैदानावर १० तारखेला होणार आहे. जर हा सामना पावसामुळे रद्द झाला तर भारत थेट अंतिम फेरीत पोहचेल.