नवी दिल्ली : “इस्लाममध्ये ‘जिहाद अफजल’ या प्रथेचा अर्थ कुणाच्याही भावना अथवा अहंकाराशी खेळणे नसून निरपराध नागरिकांचे हित जपणे असा आहे. मात्र, कट्टरपंथीयांनी सुरू केलेला दहशतवाद हा इस्लामविरोधीच आहे,” असे मत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी व्यक्त केले आहे.
राजधानी दिल्लीत मंगळवारी भारत आणि इंडोनेशिया यांच्यावतीने आयोजित ‘शांतता आणि सामाजिक सलोखा राखण्यामध्ये उलेमांची भूमिका’ या विषयावरील परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी ते उपस्थितांना संबोधित करीत होते. याविषयी बोलताना डोवाल म्हणाले की, “दहशतवाद आणि फुटीरतावाद याचा फटका दोन्ही देशांना बसत आहे. त्यातून आपण बाहेर येणे गरजेचे आहे. सीमेपलीकडून सुरू असलेल्या ‘इसिस’ पुरस्कृत दहशतवादी कारवायांचे आव्हान पेलणे काळाची गरज आहे.
सर्वसामान्यांना विश्वासात घेऊन या कारवाया रोखणे आवश्यक आहे.” दहशतवादी विध्वंसक कारवाया केल्यानंतर सीरिया किंवा अफगणिस्तानात आश्रय घेत असल्याचेही ते म्हणाले. सहनशीलता, सौहार्द आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी उलेमा आणि त्यांच्या अनुयायांनी पुढाकार घेण्याची वेळ आली असून कट्टरपंथीयांचा दहशतवाद रोखण्यासाठी हाच परिणामकारक उपाय असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
धर्माचा दुरुपयोग करणे, तसेच कट्टरपंथी आणि त्यांचा न्याय मिळविण्याचा मार्ग याचे समर्थन करता येणार नाही, त्याचबरोबर या मार्गांना अंत नसल्याचेही डोवाल यांनी यावेळी बोलताना अधोरेखित केले. इस्लाममध्ये अशा प्रवृत्तींना स्थान नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “विरोधकांनी दहशवाद्यांच्या कृत्याचे कोणत्याही परिस्थितीत समर्थन करू नये,” असा इशाराही त्यांनी यानिमित्ताने दिला.
मानवता, शांतता आणि सामंजस्य हाच खरा धर्मप्रसाराचा संदेश आजघडीला गरजेचा असून, तिच शिकवण पवित्र कुराणात असल्याचेही त्यांनी सांगितले. एखाद्या व्यक्तीला मारणे म्हणजेच मानवतेची हत्या करण्यासारखे असून, त्यास वाचविणे हीच खरी मानवता आहे. निरपराधांची हत्या करणे हे इस्लामविरोधात असल्याचे ठाम मत डोवाल यांनी यावेळी व्यक्त केले.
सीमापार आणि ‘इसिस’प्रेरित दहशतवाद हे मानवतेपुढील सर्वांत मोठे आव्हान आहे. सीरिया आणि अफगाणिस्तान हे दहशतवादाचे केंद्रस्थान बनले आहेत.
आशियामध्ये सुसंवाद आणि शांतता हे भारताचे ध्येय आहे. भारत आणि इंडोनेशियाचे संबंध शतकानुशतके जुने आहेत. चोल राजवटीच्या काळातही भारताचे इंडोनेशियाशी व्यापारी संबंध होते. दोन्ही देशांमध्ये पर्यटनाचेही संबंध आहेत. संपूर्ण भारतातून पर्यटक बाली येथे भेट देतात, तेथे भव्य असे हिंदू मंदिर देखील आहे. जगातील पहिला सर्वात मोठा मुस्लीम देश इंडोनेशिया आहे, तर भारत तिसरा सर्वात मोठा मुस्लीम लोकसंख्येचा देश आहे. त्यामुळे दहशतवादाविरोधात दोन्ही देशांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज डोवाल यांनी व्यक्त केली.