दोष नाहीसे करणारे नामस्मरण

    30-Nov-2022   
Total Views |
 
नामस्मरण
 
 
 
नामस्मरणाने अंत:करण शुद्ध होऊ लागल्यावर दोषांचा भार हलका होऊ लागतो. त्या दोषांत गुरफटून न जाता माणूस त्यांच्याकडे तटस्थपणे पाहू लागतो. नामस्मरण भ्रांत मनाला शांत करते. यासाठी दिवसाचा प्रारंभ नामस्मरणाने, देवाच्या नावाने करावा, असे समर्थांसारखे थोर संत विचारवंत आग्रहाने सांगत आलेले आहेत.
 
मनाचे श्लोक क्र. 67 पासून समर्थांनी नामस्मरणाचे महत्त्व सांगायला सुरुवात केली आहे. सर्व संत देवाचे नाव घ्यायला सांगतात. प्रत्येक पंथाचे आराध्यदैवत वेगळे असल्याने ते त्यांना प्रिय असलेल्या देवाचे नाव घ्यायला सांगतात. रामदासी संप्रदायाचे मुख्य दैवत प्रभू रामचंद्र आहे. म्हणून समर्थ रामनामाची महती सांगत असले, तरी समर्थांची दृष्टी सर्वसमावेशक असल्याने भगवंताची सर्व नामे अखेरीस त्या ’थोरल्या देवा’कडे म्हणजे परब्रह्माकडे जातात, असे स्वामी म्हणतात. भगवंताच्या कुठल्याही नामाने अंत:करणाची शुद्धी होत जाते. भक्तीसाठी मन निर्मळ असावे लागते. तथापि नीट विचार करुन आपल्या मनात डोकावण्याचा प्रयत्न केला, तर तेथे द्वेष, मत्सर, स्वार्थ, परनिंदा इत्यादी अनेक दोषांचा साठा असल्याचे आढळते. या दोषांबरोबर आपण काही सवयींच्या आहारी गेलेला असतो. नुसत्या उपदेशाने हे दोष किंवा सवयी सोडावेसे माणसाला वाटत नाही. वाईट सवयी आणि अनेक प्रकारचे दोष माणसाचे जीवन भ्रष्ट करुन टाकतात. त्यांपासून सुटका करुन घ्यायची, तर भगवंताच्या सतत नामाने ते शक्य आहे, असा समर्थांचा अभिप्राय आहे. स्वामी नामस्मरणाचे सामर्थ्य पुढील श्लोकात सांगत आहेत-
 
 
जयाचेनि नामें महादोष जाती।
जयाचेनि नामें गति पाविजेती।
जयाचेनि नामेें धडे पुण्य ठेवा।
प्रभाते मनीं राम चिंतीत जावा॥ 71 ॥
 
 
रामनामाने दोष निघून जाऊन अंत:करण शुद्ध होत जाते, असे स्वामी म्हणतात. पण, आपल्या नित्याच्या सवयींनी आपले जीवन इतके व्यापून टाकले आहे की, परिणामत: मन गढूळ झालेले असते. पूर्वी माणसे सकाळी झोपेतून उठल्यावर दोन्ही तळहातांचे दर्शन घेऊन ‘कराग्रे वसते लक्ष्मी। करमध्ये सरस्वती। करमुले तु गोविंदम्। प्रभाते करदर्शनम्॥’ हा भगवंताचे स्मरण करणारा श्लोक म्हणत असत. पण, आता तसे होताना दिसत नाही. आज आपण सकाळी उठल्यावर तळहाताऐवजी प्रथम मोबाईल बघतो. मोबाईलवरील विविधता, चित्ताकर्षक चित्रे, विविध संदेश यात मन घोटाळत राहते. रामाच्या गुणांचे प्रभातसमयी चिंतन होत नाही. मोबाईल नंतर आपण वृत्तपत्र चाळून बघतो, ती आपली दिवसाची सुरुवात असते. त्यापासून काय मिळते, याचा आपण विचार करीत नाही. वृत्तपत्रातून काय मिळते पाहा. त्यात राजकारणाला महत्त्वाचे स्थान असते. त्यातील पुढार्‍यांची आत्मप्रौढी सांगणारी भाषणबाजी, विरोधकांवर टीकाटिप्पणी वगैरे या सार्‍यांतून निष्पन्न म्हणजे द्वेष, मत्सर, उर्मटपणा यांचा मनावर पडणारा ठसा. त्यानंतर नंबर लागतो तो चित्रपट-नाटक यांतील नटनट्यांचा, त्याच्याविषयींच्या बातम्यांचा. नटनट्यांच्या खासगी आयुष्याविषयी सामान्यांना खूप आकर्षण का असते, ते समजत नाही.
 
 
नटनट्यांची प्रेमप्रकरणे, घरगुती भानगडी, संपत्ती, बंगले यासंबंधीच्या बातम्या लोक चविष्टपणे वाचतात. या गोंधळामुळे वर्तमानपत्रातील विचारप्रवर्तक लेखांकडे वाचकांचे दुर्लक्ष होतं. आध्यात्मिक स्वरुपाचे वैचारिक लेख वाचणे, हे तर मागासलेपणाचे वा वृद्धत्वाचे लक्षण समजण्याचीआजकाल ‘फॅशन’ झाली आहे. सामान्य माणसाला काय मिळते, याचा विचार केला, तर दिवसाची सुरुवातच मानसिक अस्वस्थता, व्यग्रता, प्रसंगी चीड अथवा नैराश्य या दोषांचे गाठोडे बरोबर घेऊन आपण दिवसाच्या प्रवासाची सुरुवात करतो. नामस्मरणाने अंत:करण शुद्ध होऊ लागल्यावर दोषांचा भार हलका होऊ लागतो. त्या दोषांत गुरफटून न जाता माणूस त्यांच्याकडे तटस्थपणे पाहू लागतो. नामस्मरण भ्रांत मनाला शांत करते. यासाठी दिवसाचा प्रारंभ नामस्मरणाने, देवाच्या नावाने करावा, असे समर्थांसारखे थोर संत विचारवंत आग्रहाने सांगत आलेले आहेत.
प्रस्तुत श्लोकात समर्थ सांगतात की, या रामनामाने महादोषसुद्धा जातात. अंतःकरण मलीन करणारे अनेक दोष असले, तरी त्यापैकी पाच दोषांना ‘महादोष’ म्हणतात. प्रा. के. वि. बेलसरे हे महादोष पुढीलप्रमाणे सांगतात. खोटे बोलणे, चोरी करणे, दारू पिणे, हिंसा म्हणजे हत्या करणे, व्यभिचार करणे, या दोषांना ‘महादोष’ म्हणतात. हे महादोषात गणले जातात. कारण, या दोषांनी संबंधित व्यक्तीचे व्यक्तिगत आयुष्य बरबाद होते. पण, ती व्यक्ती समाजाचाही हानी करीत असते. भगवंताच्या नामाने हे महादोषही जातात, असे समर्थांनी म्हटले आहे. रामनामाचा या दोषांवर कसा परिणाम होतो, हे पाहण्यासारखे आहे.
 
 
सर्वसामान्य माणसे परिणांमाचा विचार न करता दोषक्रियांहून मिळण्यार्‍या तात्पुरत्या लाभाचा विचार करतात. पुढे ते अंगवळणी पडते. वाईट सवय सोडायची, तर मन कुठेतरी दुसरीकडे गुंतवले पाहिजे. पण, एक सवय सोडण्यासाठी दुसरी सवय लावून घेतली. परिणाम शून्य म्हणावा लागेल. यासाठी सात्त्विक विचाराने वाईट सवय सोडता येईल. नामस्मरणाने ते साधता येते. आणखी वेगळ्या दृष्टीने नामस्मरणाचा विचार करता येतो. विवेकी माणसाच्या मनात रामाबद्दल अपार आदर आणि श्रद्धा असते. रामनामाने रामाच्या अस्तित्वाची जाणीव झाल्यावर माणसाला आपल्या दोषांची जाणीव होऊ लागते. त्यातून त्याला स्वतःचे क्षुद्रत्व समजू लागते. दोषांनी भरलेल्या मला रामाचे पवित्र नाम घेण्याचा काय अधिकार? असे वाटू लागते. हे प्रामाणिक मन मग दोषमुक्त होण्याच्या दिशेने प्रयत्न करते. येथे रामकृष्ण परमहंस यांच्या चरित्रातील एक प्रसंग आठवतो. रामकृष्णांच्या एका शिष्याला दारुचे व्यसन होते. दारु सोडण्याचे त्याने खूप प्रयत्न केले, पण उपयोग झाला नाही. शेवटी एक दिवस त्याने गुरुलाच यावर उपाय विचारला. रामकृष्ण परमहंस म्हणाले, “तुला दारू प्यायची ना, मग त्यापूर्वी एका ग्लासमध्ये थोडी दारू घेऊन माझे स्मरण करुन मला दाखव व मग पी.” शिष्याने त्याप्रमाणे ग्लासात दारू ओतून गुरुंचे स्मरण केले. त्यांना दारू अर्पण केली. खाडकन् त्याची धुंदी उतरली. तो म्हणाला, “अरेरे, हे मी काय केले? माझ्या पवित्र, निर्मल मनांच्या गुरुला दारू अर्पण केली. माझा धिक्कार असो.” असे म्हणून त्याने तो ग्लास व दारूची बाटली फोडून टाकली. तो सवयीपासून मुक्त झाला, दोषमुक्त झाला. तात्पर्य, स्वामी सांगतात, त्याप्रमाणे भगवंताचे पवित्र नाम सतत घेत राहिले तर आपल्या दोषांची लाज वाटून मन निर्मल होऊ लागते व महादोषही निघून जातात.
 
 
नाम आपल्या दोषांचा हळूहळू परिहार करुन मनाला निर्मळ बनवते. असे निर्मळ मन सदाचाराने वागू लागते. चारित्र्य, नीती, न्यायप्रियता, विवेक, धैर्य हे गुण येऊ लागतात. अशा माणसाची संतत्वाकडे वाटचाल सुरू होते. त्याला उत्तम गती प्राप्त होते. नामस्मरणाने उद्धाराचा मार्ग साधकाला स्पष्टपणे दिसू लागतो. तो आचरण्याचे मानसिक बळ प्राप्त होते. याला समर्थ ‘गती पाविजेती’ असे म्हणतात. पूर्वी केलेल्या पापांची निष्कृती करण्याचे सामर्थ्यही रामनामात आहे. या संदर्भात महर्षी वाल्मिकींचे उदाहरण सर्वज्ञात आहे. म्हणून नामस्मरणाने पापे नाहिशी होऊन ‘घडे पुण्य ठेवा’ असे उद्गार समर्थांनी काढले आहेत. अर्थात, त्यासाठी आळस, कंटाळा, अहंकार दूर सारुन नित्यनेमाने भगवंताचे नामस्मरण सुप्रभाती करावे व दिवसांची छान सुरुवात करावी. मनाच्या प्रसन्नतेचा अनुभव घ्यावा. त्याने दिवसभर प्रपंचात वावरताना भौतिक नकारात्मक सूचना मनापर्यंत पोहोचणार नाहीत आणि आपली प्रगतीची गती कुंठीत होणार नाही. हा पुण्यठेवा स्वामींना अपेक्षित असावा.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

सुरेश जाखडी

दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये 'समर्थांच्या पाऊलखुणा' या सदराचे लेखक, 'एम.ए'पर्यंत शिक्षण, समर्थ वाङ्मयाचे अभ्यासक, रिझर्व्ह बँकेतून निवृत्त अधिकारी..