मुंबई : “ ‘संविधान दिना’निमित्त ‘जागर संविधानाचा’ या विशेष पुरवणीची निर्मिती केल्याबद्दल दै. ‘मुंबई तरुण भारत’चे मी सर्वप्रथम अभिनंदन करतो. क्रांतिसूर्य प्रज्ञाशील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिले आणि आज देशाचा कारभार त्यानुसार चालतो. आज संविधान दिनानिमित्त त्या संविधानाचा जागर आणि गौरव करणार्या दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या ‘जागर संविधाना’चा या पुरवणीचे प्रकाशन करताना मला अतीव आनंद होत आहे,“ असे मनोगत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. शनिवार, दि. 26 नोव्हेंबर रोजी शहीद स्मारक सभागृह, माता रमाबाई आंबेडकर नगर, घाटकोपर (पू) येथे दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या ‘जागर संविधानाच्या’ विशेष पुरवणी प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी शहीद स्मारकचे अध्यक्ष अशोक हिरे, ज्येष्ठ कलाकार प्रभाकर पोखरीकर, स्थानिक सामाजिक कार्यकर्ता मोहन पोळ, रूपेश निकम आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. यावेळी दै. ‘मुंबई तरुण भारत’चे संपादक किरण शेलार यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, “दै. ‘मुंबई तरुण भारत’ हे कृतिशील वाचकांचे कृतिशील दैनिक आहे. ‘संविधान दिना’निमित्त ‘जागर संविधानाचा’ विशेषांक प्रकाशित करताना आम्हाला अभिमान वाटत आहे.”
दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या उपसंपादिका योगिता साळवी यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या या पुरवणी प्रकाशन सोहळ्यास दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या प्रशासन व्यवस्थापक गौरी परब, सिनियर एक्धिक्युटिव्ह एचआर आदिती राणे, मॅनेजर स्पेस सेलिंग आनंद वैद्य, स्पेस सेलिंग एक्झिक्युटिव्ह प्रशांत कांबळे, रवींद्र जाधव, सुधीर लवांडे, किशोर दळवी, सचिन महाले, राजीव रेवंडकर आदी दै. ‘मुंबई तरुण भारत’चे कर्मचारी उपस्थित होते.