
आपल्याला सगळ्यांना ‘डिटेक्टिव्ह’ म्हटले की, एक सुप्त आकर्षण मनात लगेच निर्माण होते. त्यांचे काम, त्यांची कार्यशैली, स्वतःची ओळख लपवून, आपल्या कुठल्याही बेताचा कोणालाही थांगपत्ताही लागू न देता आपल्याला हवी ती माहिती किंवा आपल्याला हवे ते नेमके कसे काढून घ्यायचे, हे या गुप्तहेरांबद्दलचे कुतूहल सामान्य जनतेच्या मनात कायम असते. या गुप्तहेरांच्या जगाबद्दल वाचायला, ऐकायला, सगळ्यांनाच आवडते. मग, तो आर्थर केनॉन डायलचा जगप्रसिद्ध शेरलॉक होम्स असो किंवा शरदिंदू बंदोपाध्याय यांचा व्योमकेश बक्षी असो.
सगळ्यांच्याच कथा आपल्याला वाचायला ऐकायला आवडतात आणि आज इतकी वर्षे उलटूनसुद्धा त्यांच्याबद्दलचे आकर्षण तसूभरही कमी झालेले नाही. पण हे गुप्तहेरांचे जग नेमके असते कसे? ते काम कसे करतात? जर मला गुप्तहेर व्हायचे असेल तर काय केले पाहिजे? हे काहीच आपल्याला माहीत नसते. याच गोष्टींमुळे हे जग कायम एका पडद्याआड राहते. त्यामुळे एक गूढ वलय या क्षेत्राबद्दल असते. पण, याच क्षेत्रात काम करण्यासाठी कोणी उद्योजक पुढे येत असेल आणि या क्षेत्रात एखादा ‘स्टार्टअप’ सुरु करत असेल, तर ते एकदम नवलच असेल आपल्यासाठी. हीच गोष्ट घेऊन या गुप्तहेरांच्या विश्वात आपला स्वतःचा एक उद्योग सुरु करण्याचे धाडस केले आहे, नरेंद्र कुलकर्णी यांनी. त्यांच्या ‘फोकस डिटेक्टिव्ह एजन्सी’च्या निमित्ताने...
नरेंद्र हे या गुप्तहेरांच्या जगाकडे कसे वळले, ही कथाच मोठी रंजक आहे. घरात कुठेही व्यवसायाची पार्श्वभूमी नाही. वडील ‘बीएआरसी’सारख्या एवढ्या मोठ्या संस्थेत शास्त्रज्ञ होते. वडिलांची अपेक्षा अशी की, मुलानेही शास्त्रज्ञ म्हणून तिथे रुजू व्हावे. म्हणून नरेंद्र यांनी ‘मास्टर्स’ करण्यासाठी ‘फिजिक्स’ हा विषय निवडला, पण वडिलांनी एक अट घातली होती की, ‘मास्टर्स’ला जर प्रथम श्रेणी मिळाली तरच मी तुझी शिफारस करेन. पण गंमत झाली अशी की, नरेंद्र यांना ‘मास्टर्स’ला 58 टक्केच मिळाले.
‘क्लास टू ऑफिसर’ आयुष्यभर ‘क्लास टू ऑफिसर’च राहतो, असे सांगून वडिलांनी त्यांची शिफारस करण्याचे नाकारले. मग आता करायचे काय, हा प्रश्न नरेंद्र यांच्या समोर उभा राहिला. त्याच वेळेला कर्मधर्मसंयोगाने नरेंद्र त्यावेळी ‘अॅपल’ कंपनीने ‘अॅपटेक’ कंपनीच्या माध्यमातून काही ‘डिप्लोमा कोर्सेस’ चालू केले होते. तो कोर्स नरेंद्र करत होते. त्यावेळी ही संस्था 100 टक्के नोकरीची हमी देत असे. याच वेळेस या इन्स्ट्यिूटमध्ये नरेंद्र यांच्या परिचयाच्या एका मॅडमनी त्यांना एका खासगी गुप्तहेर कंपनीसाठी मुलाखत देण्यास सांगितले. निवड झाली तर झाली, असे ठरवूनच ते गेले होते. पण, इथेच नरेंद्र यांच्या या व्यवसायाची सुरुवात होणार होती. नरेंद्र यांची निवड झाली.
1997 मध्ये या क्षेत्रात नरेंद्र यांनी पदार्पण केले. लवकरच त्यांनी हे क्षेत्र शिकून घेतले आणि त्यात चांगल्या पद्धतीने काम करण्यास सुरुवात केली. पुढे पुण्यास ब्रँच मॅनेजर म्हणून स्वतंत्र कार्यभार देऊन नरेंद्र यांना पुण्यास पाठविण्यात आले. मुळातच तत्त्वनिष्ठ स्वभाव असल्याने त्यांना काही गोष्टी खटकायला लागल्या. त्यातली मुख्य म्हणजे, अगदी छोट्यातल्या छोट्या कामासाठी जास्तीत जास्त पैसे ग्राहकांकडून उकळण. छोटे म्हणजे 500 रुपयांच्या कामासाठी ग्राहकांकडून पाच हजार रुपये घ्यायचे, हे नरेंद्र यांना पटत नव्हते. तसे त्यांनी वरिष्ठांना बोलून दाखवले, पण आपल्याला व्यवसाय करायचा आहे बाकीच्या गोष्टींशी आपल्याला काय करायचे? अशा प्रकारची उडवाउडवीची उत्तरे त्यांना मिळाली. त्यामुळे त्यांचे कार्यालयामध्ये वादंग व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे कंटाळून शेवटी नरेंद्र यांनी नोकरी सोडून दिली. पुढे काही काळ त्यांच्या ओळखीच्या मित्रांबरोबर काही दिवस काम केले आणि दि. 18 ऑगस्ट, 2002 रोजी नरेंद्र यांनी त्यांच्या ‘फोकस डिटेक्टिव्ह एजन्सी’ची स्थापना केली. सुरुवातीला ‘विमा क्लेम्स’च्या केसेसवर काम करण्यास सुरुवात केली.
यामध्ये काही गोष्टींची पडताळणी करायची असते. जेव्हा एखादा अपघात होतो तेव्हा साहजिकच गाडीचा विमा ‘क्लेम’ केला जातो. त्या ‘क्लेम’मधून त्या गाडीचे बरेच पैसे वसूल होतात. त्याच पार्श्वभूमीवर हे केलेले दावे किती खरे किती खोटे, यांची पडताळणी करणे, हे या गुप्तहेर संस्थांचे काम असते. असली कामे ते सुरुवातीला करायचे. त्यानंतर ही कामे सोडून त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्राच्या कामांकडे आपले लक्ष वळवले. याच काळात नरेंद्र यांच्या लक्षात आले की, सर्वात महत्त्वाचे आणि सर्वात जास्त काम असलेले काम म्हणजे ‘कार्पोरेट व्हिजिलन्स’ हे काम सर्वात महत्त्वाचे आहे आणि या क्षेत्रात इतके काम आहे की ते संपणारच नाही. इतके मोठे हे काम आहे. आपल्याकडे मोठमोठ्या ‘कॉर्पोरेट’ कंपन्यांमध्ये या गुप्तहेरांच्या कामाची गरज आहे. ‘इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी’ची चोरी, कामगारांकडून कंपनीवर टाकल्या जाणार्या भरपाईच्या केसेस, तसेच वरिष्ठ व्यवस्थापकांना कंपनीत काय चालू आहे? कशा पद्धतीने काम चालू आहे याबद्दल माहिती करून देण्यासाठी या खासगी गुप्तहेर संघटनांचा वापर केला जातो.
तसेच याव्यतिरिक्त वैयक्तिक पातळीवरही खासगी गुप्तहेरांची मदत घेतली जाऊ लागली आहे. आपल्या मुलांना वाईट मार्गाला लागू नये, म्हणून गुप्तहेरांमार्फत त्यांच्यावर लक्ष ठेवले जाते, तसेच लग्नानंतर जोडप्यांकडून आपल्या जोडीदाराच्या संशयावरून खासगी गुप्तहेरांकडून पाळत ठेवली जाते, अशा वैयक्तिक कारणांसाठी गुप्तहेरांची मदत घेतली जाते आहे, असे नरेंद्र सांगतात.हे क्षेत्र काम करते कसे, याचे एक उदाहरण घेऊनच समजून घ्यावे लागेल. समजा, एका मोठ्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये या अशा प्रकारच्या गुप्तहेर सेवेची गरज भासली, तर त्या कंपनीमध्ये त्या गुप्तहेर कंपनीमार्फत त्यांची माणसे त्या कंपनीमध्ये कर्मचारी म्हणून भरती केली जातात.
ते इतर कर्मचार्यांसारखेच काम करत असतात, पगार इतर सुविधाही त्यांना मिळत असतात. फक्त त्या कंपनीच्या व्यवस्थापनाला आणि त्या गुप्तहेर कंपनीला माहीत असते की, ते लोक कोण आहेत आणि कशासाठी काम करत आहेत. अशा पद्धतीने त्या कंपनीच्या दैनंदिन कामांच्या बाबतीत व्यवस्थापनाला जी माहिती हवी असते ती मिळवून दिली जाते. अशा पद्धतीने कॉर्पोरेटजगात काम केले जाते. हे एक उदाहरण झाले. अशा असंख्य गोष्टींसाठी खासगी गुप्तहेर संस्थांची मदत घेतली जात आहे.
खासगी गुप्तहेर संस्थांच्या समोरचे सर्वात मोठे आव्हान म्हणजे, त्यांना आजही माहितीचा कायदेशीर ‘सोर्स’ म्हणून कुठल्याही कायदेशीर तपासांमध्ये ग्राह्य धरले जात नाही. आज या संस्था सर्व प्रकारचे कर भरत आहेत आणि त्यांच्या उत्पन्नाचे ‘सोर्स’ वगैरे गोष्टी उघड करत आहेत, म्हणून त्या कायदेशीर कामच करत आहेत, पण जेव्हा केव्हा पोलीस तपासांमध्ये त्यांची मदत घेतली जाते तेव्हा त्यांचे स्थान फक्त एक माहितीचा दुय्यम स्रोत म्हणूनच घेतले जाते, त्यापुढे काही नाही. या खासगी गुप्तहेर संस्थांना अशा प्रकारे कायदेशीर दर्जा देण्यासाठी संसदेत तसे विधेयक 2007 मध्ये आणण्यात आले होते. पण, लोकसभेत मंजूर झाले, पण राज्यसभेत मात्र ते विधेयक मंजूर न झाल्याने तो कायदा होऊ शकला नाही. तसे झाले असते तर या खासगी गुप्तहेर संस्थांनाही या कायदेशीर प्रक्रियांमध्ये स्थान मिळाले असते, पण तसे ते होऊ शकलेले नाही.
हे गुप्तहेरांचे जग वाटते तितके सोपे नाही.कारण, एखादी व्यक्ती गुप्तहेर म्हणून काम करत आहे, हे त्याला उघडपणे सांगणेही अवघड असते. त्यामुळे अशा व्यवसायांसाठी कुठल्याही विद्यापीठांमध्ये किंवा शिक्षण संस्थांमध्ये प्रशिक्षण अभ्यासक्रम उपलब्ध नाही. त्यामुळे अशा पद्धतीने काम करण्याची ज्या व्यक्तीची इच्छा आहे किंवा ज्या व्यक्तीला या क्षेत्रात व्यवसाय सुरु करायचा असेल तर थोडेसे स्वबळावर, स्वतःच्या कौशल्यांवरच तसे काम करावे लागते. त्यामुळे भविष्यात या क्षेत्रासाठी आताच्या शिक्षण संस्थांनी या क्षेत्रासाठी म्हणून काही अभ्यासक्रम तयार करावेत, अशी अपेक्षा नरेंद्र व्यक्त करतात. त्याच बरोबरीने या क्षेत्राचे काम आता खूप वाढत जाणार आहे.
‘कॉर्पोरेट’ क्षेत्रातील गुप्तहेरांची गरज दिवसेंदिवस वाढणार आहे. फक्त आपल्या कंपनीच्या अंतर्गत गोष्टींसाठीच नव्हे, तर परदेशांतील ‘क्लाएंट’च्या माहिती काढून घेणे, कामगार संघटना आणि कंपनीचे व्यवस्थापन यांच्यातील वादांचा छडा लावणे काम करणे इत्यादी कामांसाठी खासगी गुप्तहेर संस्थांची मदत घेतली जाणार आहे. त्यामुळे भविष्यात हे क्षेत्र वाढतच जाणार आहे आणि लोकही या क्षेत्राकडे एक उत्तम रोजगाराची संधी म्हणून बघतील.सामान्यांसाठी एका पडद्याआड असलेल्या गूढ गुप्तहेरांच्या जगात काम करून स्वतःचा उद्योग उभा करण्याचे काम करणार्या नरेंद्र कुलकर्णी यांची कामगिरी नक्कीच उल्लेखनीय आहे.