नवी दिल्ली:भारतातून परागंदा झालेल्या झाकीर नाईकला ‘फिफा विश्वचषक स्पर्धे’चे निमंत्रण देण्यास भाजपने विरोध केला आहे. या प्रकरणावर नाराजी व्यक्त करताना केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी म्हणाले की, “भारत हा मुद्दा नक्कीच उचलून धरेल. झाकीर नाईक हा मलेशियाचा नागरिक आहे आणि तुम्ही त्याला कुठेही बोलावू शकता, पण त्याला काहीच माहिती नाही, अशा व्यासपीठावर बोलावण्यात काय अर्थ आहे,” असे ते म्हणाले.
झाकीर नाईकला ‘विश्वचषक 2022’साठी आमंत्रित करण्यात आले आहे. प्रक्षोभक भाषण दिल्याबद्दल झाकीर नाईकवर भारतात बंदी घालण्यात आली असून त्याच्याविरुद्ध अटक वॉरेंट आहे. मात्र, झाकीर नाईक गेल्या अनेक वर्षांपासून देशाबाहेर राहत आहे. आता झाकीरला ‘फिफा वर्ल्ड कप’साठी आमंत्रित करण्यात आले आहे. संपूर्ण विश्वचषकात तो धार्मिक भाषण देईल.
नाईकवर ‘मनीलॉण्ड्रिंग’ आणि भारतात द्वेषयुक्त भाषणाचा वापर केल्याचा आरोप आहे. 2016 मध्ये, नाईकच्या ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’वर विविध धार्मिक समुदाय आणि गटांमधील शत्रुता, द्वेष किंवा इतर नकारात्मक भावनांना प्रोत्साहन देण्याचा आणि गटाच्या सदस्यांना प्रोत्साहन आणि मदत केल्याचा आरोप होता. यानंतर ही संघटना भारतात बेकायदेशीर घोषित करण्यात आली. नाईक यांनी भारत सोडून मलेशियामध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. तो सध्या मलेशियामध्ये राहतो.