नाशिक : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविरोधी केलेल्या वक्तव्याचा समाचार भाजप, मनसे कडून घेण्यात आला. दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "राहुल गांधी यांना वक्तव्य टाळता आलं असतं तर बरं झालं असतं. इतिहासामध्ये प्रत्येकाच्या बाबतीत काहीतरी प्लस मायनस निघतंच." असे छगन भुजबळ म्हणाले.
पुढे ते म्हणाले, "राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर राज्यभरात मोर्चे आणि आंदोलनं सुरू आहे. राहुल गांधींची यात्रा अतिशय चांगली चालली होती. परंतु तुम्ही कोणीच दाखवत नव्हते. आता यात्रा चांगली चर्चेत आली आहे. हा महत्त्वाचा फायदा आता राहुल गांधींच्या दृष्टीने नक्कीच झालेला आहे. असे मी म्हणेन. या सगळ्या इतिहासात आता जाण्यात सध्या काही अर्थ नाही. सध्या जे काही प्रॉब्लेम आहेत त्यावर राहुल गांधी बोलत आहेत. महागाई, बेकारी, दडपशाही वेगवेगळ्या संस्था ताब्यात घेऊन एकतर्फी कारभार होत आहे. या सगळ्यावर ते बोलत आहेत आणि यावर सगळीकडे चांगला पाठिंबा देखील मिळत आहे. प्रश्न राहिला तर राहुल गांधींनी काही पत्र दाखवले. मी काही इतिहासकार नाही. पण मग त्या पत्राला इंदिरा गांधी काय म्हणाल्या, महात्मा गांधी काय म्हणाले, त्यांनी केलं म्हणून यांनी केलं... यावर वैचारिक विरोध व्हायला पाहिजे." असे भुजबळ म्हणाले.