मुंबई(प्रतिनिधी): पुणे वनविभागाने शुक्रवार दि. १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता सिंहगड किल्ल्यावरील अनधिकृत स्टॉल जमीनदोस्त केले. पहाटेच्या या मोहिमेत हे बांधकाम पाडण्यात आले. किल्ल्यावरील खाद्यपदार्थांच्या स्टॉल्समुळे ऐतिहासिक वास्तूचे सौंदर्य नष्ट होते, असे पुणे विभागाच्या अधिकाऱ्यांनी या वेळी व्यक्त केले. स्टॉलधारकांना वनविभागाच्या निसर्ग पर्यटन योजनेंतर्गत किल्ल्यावर स्थलांतरित केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
स्टॉलधारकांना यापूर्वीच बांधकामे हटवण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यापैकी काहींनी त्यांचे स्टॉल काढले होते, तर काहींनी हटवले नव्हते. उर्वरित तात्पुरती बांधकामे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी काढून टाकली आहेत. आणि या ठिकाणी वाहने पार्किंगसाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. यामुळे इथे होणारी वाहतूक कोंडी कमी होईल. ही मोहीम एनआर प्रवीण, मुख्य वनसंरक्षक, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत राहुल पाटील, उपवनसंरक्षक, पुणे, दीपक पवार, सहायक वनसंरक्षक (डब्ल्यूकेई), परिक्षेत्र वन अधिकारी प्रदीप संकपाळ, मुकेश सणस, सुशील मंतवार, संतोष चव्हाण, हनुमंत जाधव, अजित सूर्यवंशी व इतर वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.