मुंबई : उच्च व तंत्रशिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय आयोजित ग्रंथोत्सव दिनांक १६ व् १७ नोव्हेम्बर रोजी दादर येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लेखक, वक्ते व संगणक तज्ज्ञ अच्युत गोडबोले उपस्थित होते. प्रथम दिवशी ग्रंथदिंडी पाठोपाठ प्रसिद्ध लेखक प्रवीण दवणे व निवेदिका दीपाली केळकर यांची व्याख्याने आयोजित केली होती. तसेच दुसऱ्या दिवशी डॉ. राजेंद्र कुंभार यांचे वाचनसंस्कृती- काल आज आणि उद्या या विषयावर व्याख्यान होते, त्यानंतर परिसंवादाचे आयोजन केले होते.
कार्यक्रमाच्या पूर्वार्धात ७५ विद्यार्थिनींना पुस्तकांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर उपस्थित होते. यावेळी त्यांनी जमलेल्या विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्व समजावून संगितले. तसेच त्यांच्या आयुष्यातील लेखन आणि अवांतर वाचनाच्या आठवणी मुलांना सांगितल्या. मुणगेकर म्हणाले, "महाविद्यालयीन काळात माझ्यावर जे संस्कार झाले ते वाचलेल्या खांडेकरांमुळे. मी रिझर्व्ह बँकेतले पद सोडले ते खांडेकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन. शिक्षक होणं हि माझी अदम्य उच्च होती व त्याचसाठी माझा जन्म झाला होता. खांडेकरांच्या क्रौंचवध कादंबरीने मला जगाकडे पाहायचा दृष्टिकोन दिला."
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माहितीशास्त्र व ग्रंथपाल डॉ. कुंभार म्हणाले, "वाचन ही फार महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही महिन्याला एक पुस्तक घ्याल तर वर्षाला त्याची बारा होतील. काहीच वर्षात तुमच्याकडे एक छोटा ग्रंथालय निर्माण होईल. विद्यार्थ्यांनी वाचले पाहिजे. ते अतिशय म्हत्वाचे आहे." असे म्हणत त्यांनी समाज माध्यमांवरून वाचन करणाऱ्या मंडळींवर ताशेरे ओढले.
द्वितीय सत्रात 'ग्रंथोत्सव का व कशासाठी या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रशांत पाटील, संजय बसोड, सिद्धी जगदाळे, सुषमा जोशी या चार मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा चव्हाण यांनी केले होते. त्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.