संपत्तीच्या सुरक्षिततेसाठी न्यास (ट्रस्ट) स्थापना आणि प्रकिया

    17-Nov-2022   
Total Views |
trust


सर्व प्रकारच्या संपत्ती एकत्रित करावयाच्या असतील व संपत्तीची मालकी कुटुंबाकडे विनाअडथळा जावी म्हणून किंवा कर वाचविण्यासाठी संपत्तीचे नियोजन करण्यासाठी संपत्ती कौटुंबिक वादातून न्यायालयात प्रकरणे जाऊ नयेत, हे सर्व टाळण्यासाठी न्यास (ट्रस्ट) स्थापन करावा. त्याविषयी आजच्या लेखातून सविस्तर जाणून घेऊया...


न्यास दोन प्रकारचे आहेत. एक सार्वजनिक व एक खासगी. ‘सार्वजनिक न्यास’ हा नावाप्रमाणे बर्‍याच माणसांना फायदेशीर ठरु शकतो. न्यासासाठी भारतात ‘इंडियन ट्रस्ट अ‍ॅक्ट, 1882’ हा अस्तित्वात आहे. ‘खासगी न्यास’ हा कुटुंबाला फायदेशीर ठरणारा असतो. न्यासात तीन मुख्य पक्ष असतात. पहिला पक्ष जो न्यास स्थापन करुन आपली संपत्ती न्यासाच्या नावावर करतो, तो ज्यांना फायदा व्हावा म्हणून हा ट्रस्ट स्थापन केला आहे, त्या व्यक्ती हा न्यासाचा दुसरा पक्ष. तिसरा पक्ष म्हणजे न्यासाचे विश्वस्त, जे न्यासाचा कारभार चालवणार ते. न्यासाचे ‘डीड’ तयार करावे लागते. त्याला ‘ट्रस्ट डीड’ म्हणतात. या ‘डीड’मध्ये न्यास का स्थापन केला? याचे कार्यक्षेत्र काय असणार? वैशिष्ट्ये काय असणार? वगैरे सर्व तपशील नमूद करावा लागतो.

ट्रस्टच्या बाबतीत ‘ट्रस्ट डीड’ हे महत्त्वाचे ‘डॉक्युमेंट’ असते. ‘ट्रस्ट डीड’ सादर केल्याशिवाय बँकेत खातेही उघडता येत नाही. जो ट्रस्ट स्थापन करतो, तो ट्रस्टचा विश्वस्त होऊ शकतो, पण एकटा विश्वस्त होऊ शकत नाही. अनेक विश्वस्तांपैकी तो एक म्हणून राहू शकतो. ट्रस्टचे फायदे कोणाकोणाला मिळावेत, या यादीत इतरांबरोबर न्याय स्थापन करणार्‍याचे नावही असू शकते. कुटुंबातील संपत्ती संबंधीचे वाद, कुटुंबातील सदस्यांच्या मनात असलेला असंतोष, न्यासाच्या स्थापनेमुळे कमी होऊ शकतो. न्यासांच्या स्थापनेसाठी संपत्तीच्या मूल्याचा विचार यास प्राधान्य नसते, तर कुटुंब संपत्तीच्या बाबतीत एकीने नांदावे, हा विचार असतो. 50 ते 60 कोटी रुपयांची संपत्ती असणारा कोणीही ट्रस्ट स्थापन करु शकतो.

 एखाद्याला जर विशिष्ट हेतूने न्यास स्थापन करायचा असेल, उदाहरणच द्यायचे, तर पाल्याच्या भविष्यासाठी न्यास स्थापन करावयाचा आहे, तर अशा वेळी संपत्तीच्या मूल्याला महत्त्व नसते. ज्या कारणासाठी न्यास स्थापन केला जात आहे, त्या कारणाला महत्त्व असते. न्यास स्थापन करताना तो कोणत्या प्रकारचा स्थापन करायचा, याला महत्त्व द्यायला हवे. समजा, एखाद्याला त्याची संपत्ती पुढच्या पिढीकडे जावी, या हेतूने न्यास स्थापन करावयाचा असेल, तर अशावेळी सहा ‘रिव्होकेबल ट्रस्ट’ स्थापन करावा. हा स्थापन केल्यास या ट्रस्टवर ज्याने ट्रस्ट स्थापन केला आहे, त्याचा तो जीवंत असेपर्यंत पूर्ण ताबा राहील. अजून भारतात वारसाहक्क कर आकारला जात नाही.

 भविष्यात जर असा एखादा कर लादला गेला, तर अशासाठी ‘रिव्होकेबल ट्रस्ट’ चांगला. पण, न्यास स्थापन करणार्‍याचे काही दायित्व असेल. काही देणी असतील, तर ती चुकविण्यासाठी न्यास स्थापन करता येणार नाही. कुटुंबाकडे संपत्ती हस्तांतरित करुन दायित्व टाळता येणार नाही.‘इनसॉव्हन्सी अ‍ॅण्ड बँकरप्सी कोड 2016’ अन्वये संपत्ती मालमत्ता न्यासाकडे हस्तांतरित झाल्यानंतर दोन वर्षांचा ’कुलिंग पीरिएड’ असतो. त्यामुळे दोन वर्षांच्या आत काही व्यवहार अपेक्षित असतील, तर ते होऊ शकणार नाहीत. विश्वस्त कोणाला नेमावे? त्यांना किती अधिकार द्यावेत? त्यांच्या अधिकारांवर काही नियंत्रणे असावीत का? या सर्व बाबींचा विचार न्यास स्थापन करणार्‍याने करावयास हवा. एकापेक्षा जास्त विश्वस्त नेमावेत. एकच विश्वस्त नेमला व दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला, तर न्यासाचा कारभार अडू शकतो.

 
trust 1


 ट्रस्ट स्थापन करण्यासाठी सुरुवातीला खर्च येतो व नंतरही खर्च होत राहतो. सुरुवातीचा खर्च - वकिलाचे शुल्क, सल्ला सेवेसाठी ट्रस्ट कंपनीचे शुल्क, ‘ट्रस्ट डीड’चे ‘ड्राफ्टिंग’ व ‘रजिस्ट्रेशन’ याचा खर्च, नंतर नेहमी येणारे खर्च, वार्षिक व्यवस्थापन शुल्क. जर व्यावसायिक ट्रस्टी न्यासावर नेमले असतील तर त्यांना न्यासाच्या मालमत्तेच्या मूल्याच्या काही टक्के रक्कम व्यावसायिक शुल्क म्हणून द्यावे लागते. ट्रस्टच्या ‘ऑडिटिंग’ तसेच प्राप्तिकर रिटर्न ‘फाईल’ करण्याचा खर्च. छोट्या कुटुंबासाठी मूळ न्यास स्थापन करावयाचा असेल, तर त्याच्या स्थापनेसाठी चार ते आठ लाख रुपये खर्च येतो. ट्रस्टच्या स्थापनेत काही गुंतागुंत असल्यास हा खर्च वाढतो.

ट्रस्ट आणि इच्छापत्र/मृत्युपत्र यातील फरक काय? वारसा हक्क नियोजनासाठी सर्व न्यास कायदेशीररीत्या वैध ठरतीलच, असे नाही. त्यासाठी मृत्युपत्र असणेही गरजेचे असते.मृत्युपत्राला ‘प्रोबेट’ लागते. ‘प्रोबेट’ मिळायला सहा ते नऊ महिने लागतात. जर या ‘प्रोबेट’ला कोणी आव्हान दिले, तर आणखीन कालावधी लागतो. ट्रस्ट असेल, तर ‘प्रोबेट’चा प्रश्न निर्माण होत नाही. संपत्ती खासगी नावावरून ट्रस्टच्या नावे करताना, प्रचलित कायद्यांनुसार ‘स्टॅम्पड्युटी’ भरावी लागते. संपत्तीच्या मूल्याच्या पाच ते आठ टक्के ‘स्टॅम्पड्युटी’ आकारली जाते. वारसदारांना ट्रस्टची संपत्ती विकून जर पैसा देण्यात आला, तर न्यास स्थापन करण्याचे उदिष्ट संपल्यामुळे, तो ट्रस्ट रद्दबातल होऊ शकतो. तसेच ही जी संपत्तीची विक्री झाली असेल, असे गृहित धरू, तर त्या विक्रीवरही ‘स्टॅम्पड्युटी’ भरावी लागते. अशावेळी न्यासापेक्षा मृत्युपत्राद्वारे संपत्तीचे विभाजन कमी खर्चात होऊ शकते.

मृत्युपत्रानुसार वारसांना मिळालेल्या संपत्तीवर ‘स्टॅम्पड्युटी’ भरावी लागत नाही. ‘प्रोबेटड्युटी’ मात्र भरावी लागते. ‘प्रोबेटड्युटी’चा खर्च हा ‘स्टॅम्पड्युटी’च्या खर्चापेक्षा कमी असतो. ‘स्टॅम्पड्युटी’चे दर हे प्रत्येक राज्याराज्याप्रमाणे वेगवेगळे आहेत. ‘शेअर’, ‘म्युच्युअल फंड’ यातील गुंतवणूक जर ट्रस्टला हस्तांतरित केली, तर त्यासाठी ‘स्टॅम्पड्युटी’ भरावी लागत नाही. ट्रस्टच्या संपत्तीला प्राप्तिकर ‘रिटर्न’ भरावा लागतो. जसा व्यक्तींंंना, कंपन्यांना प्राप्तिकर ‘रिटर्न’ भरावा लागतो, तसा ट्रस्टलाही सादर करावा लागतो. ट्रस्टला आपली ‘ऑडिटेड बॅलन्स शीट’ दि. 30 सप्टेंबरपूर्वी प्राप्तिकर खात्याला व दि. 31 ऑक्टोबरपूर्वी धर्मादाय आयुक्त कार्यालयात सादर करावी लागते. न्यास हे धर्मादाय आयुक्तांच्या अधिकारात येतात. ट्रस्टच्या नियमांत काही बदल झाला, तर त्याचा ‘चेंज रिपोर्ट’ धर्मादाय आयुक्त कार्यालयाला ठरावीक दिवसांत पाठवावा लागतो. ट्रस्टच्या विश्वस्तांमध्ये काही बदल झाल्यास त्याचाही ‘चेंज रिपोर्ट’ काही दिवसांत धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयाला पाठवावा लागतो.

ट्रस्टची काही ‘प्रॉपर्टी’ विकावयाची असल्यास त्याचीही माहिती धर्मादाय आयुक्तांना द्यावी लागते. विश्वस्तांची बैठक ठरावीक कालावधीने होणे गरजेचे असते. या बैठकांमध्ये गुंतवणुकीचे निर्णय, ‘ऑडिट रिपोर्ट’वर चर्चा वगैरे व्हावयास हवी. या बैठकांचे इतिवृत्त लिहिले जायला हवे. धर्मादाय आयुक्त कार्यालय छाननी करण्यासाठी ट्रस्टच्या तिवृत्त/इतिवृत्तांची मागणी करू शकते. ‘रिव्होकेबल ट्रस्ट’मध्ये न्यास स्थापन करण्याचे उत्पन्नही समाविष्ट होते. या समाविष्ट उत्पन्नावर कर आकारणी होते. इतिवृत्त केवळ ट्रस्टच्या बाबतीत न्यासाचे उत्पन्न वेगळे गणले जाते व या उत्पन्नावर विश्वस्तांना कर भरावा लागतो. ट्रस्टला मिळणारे व्याज व लाभांश करपात्रअसते. तसेच ट्रस्टच्या ’कॅपिटल गेन’ही भरावा लागतो. जर ट्रस्टचा कारभार नियमाने चालत नसेल, तर धर्मादाय आयुक्त विश्वस्तांच्या कारभारावर नियंत्रणे आणून प्रशासनाची नेमणूक करू शकतात.

 संपत्तीसाठी अजून एक पर्याय उपलब्ध आहे. म्हणजे हिंदू अविभक्त कुटुंब (एचयुएफ-हिंदू अन्डिव्हायडेड फॅमिली) हा पर्याय फक्त हिंदू धर्मीयांसाठी उपलब्ध आहे. ट्रस्ट मात्र कोणत्याही धर्माची माणसे स्थापन करू शकतात. ट्रस्टमध्ये विश्वस्त कारभार चालवतात, तसा ‘एचयुएफ’मध्ये कर्ता कारभार चालवतो. ‘एचयुएफ’ हा एकाच कुटुंबातील संपत्तीसाठी असतो. सार्वजनिक ट्रस्ट हा शब्दश: सार्वजनिक असतो. संपत्तीही सार्वजनिक असते. विश्वस्तांनी तिच्यात वृद्दी व तिचे जतन करावयाचे असते. योग्य व वैध कारणांसाठी ती वापरायची असतात. विश्वस्त नि:स्वार्थी हवेत. ट्रस्टच्या कारभारामार्फत कोणालाही संशय आल्यास ती व्यक्ती सदर ट्रस्टबाबत पुराव्यासह धर्मादाय आयुक्त कार्यालयात तक्रार करू शकतात. धर्मादाय आयुक्त कार्यालयास तक्रारीत तथ्य आढळल्यास कारवाई करू शकतात. न्यासाविरुद्ध तक्रार न्यायालयात ही करता येतात. खासगी न्यासापेक्षा सार्वजनिक न्यास हे जास्त विश्वासार्ह हवेत.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

शशांक गुळगुळे

लेखक बँकेत मॅनेजर म्हणून कार्यरत होते. २०११ साली त्यांनी सेवानिवृत्ती पत्करली. एम.ए इन इकोनॉमिक्स, डिप्लोमा इन कॉम्प्युटराईज्ड बँकिंग ऍप्लीकेशन असे आर्थिक क्षेत्राशी संलग्न शिक्षण. ते अर्थ-उद्योग विषयातील अभ्यासक आहेत.