जल‘सावित्री’

    16-Nov-2022   
Total Views |
जल
 

‘जलस्वराज्य ते ग्रामस्वराज्य’ हे ब्रीद अंगीकारून नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी अविरत झटणार्‍या उच्चशिक्षित जल‘सावित्री’ डॉ .स्नेहल दोंदे यांच्याविषयी...


आर्मी ऑफिसरची कन्या असलेल्या रिता घोष अर्थात (विवाहानंतर) डॉ. स्नेहल दोंदे यांचा जन्म मुंबईचा. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, हे सांगणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांचे प्रेरणास्थान असल्याने सुरुवातीपासूनच त्यांचा कल हा प्रशासन, संशोधन आणि शैक्षणिक विषयांकडे होता. वडिलांच्या नोकरीमुळे देशभरात ‘सीबीएसई’ बोर्डातून प्राथमिक, माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयीन शिक्षणानंतर ‘एमएससी’ केल्यावर ‘सायन्स’, ‘मॅनेजमेंट’ आणि आता ‘सोशल सायन्स’ अशा तीन विविध प्रबंधांत स्नेहल ‘पीएच.डी’च्या मानकरी ठरल्या.


 वयाच्या 34व्या वर्षी मुंबई विद्यापीठाच्या सांताक्रुझ व मालाड येथील महाविद्यालयात प्राचार्या बनलेल्या डॉ. स्नेहल त्यावेळी कुलगुरूपदासाठीही पात्र ठरल्या होत्या. समाजाभिमुख वृत्ती असल्याने विद्यार्थ्यांना समजून घेत शिकवण्यावर त्यांचा भर असे. 20 वर्षे प्राध्यापकी केल्यानंतर स्वेच्छानिवृत्ती घेऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व व्यक्तिमत्त्व विकासासाठी त्या झटत आहेत.


ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असताना त्यांचा पहाटे सुरू झालेला दिवस रात्रीपर्यंत संपतच नसे. त्यातच पहिला प्रबंध त्यांनी, ‘तेलगळतीमुळे समुद्रातील जलचरांची होणारी हानी रोखण्यासाठी शिंपल्यावर क्रूड ऑईल तवंगाचा होणारा परिणाम’ हा संशोधनपर विषय घेऊन लिहिला. ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशोनोलॉजी’सारखी केंद्र सरकारची संस्था असताना या विषयावर कुणीही संशोधन केले नव्हते. स्नेहल यांनी डॉ. रेड्डी व डॉ. जीयालाल यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन केले. यासाठी त्यांनी महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत एक प्रारूपदेखील उभे केले होते.


अनेकदा टबमधील तेलाच्या तवंगाने पेट घेतल्याने प्रयोगशाळेत आगीही लागल्या. समुद्रात तेलगळतीमुळे होणार्‍या प्रदूषणाचा माणसांप्रमाणेच समुद्रातील जीवसाखळी (अन्नसाखळी) वरही गंभीर परिणाम होतो. स्नेहल यांनी यावर काम करून प्रत्यक्ष कृतिशील कार्यक्रम राबवला. हा प्रबंध लिहून झाल्यावर त्यांनी त्यातील अभ्यास, निरीक्षण व निष्कर्ष यावर आधारित पुस्तकदेखील लिहिले.Accumulation of Crudeoil in Bivalve या विषयावर बोलण्यासाठी त्यांना भारतभरातून विविध परिषदांमध्ये बोलावणे आले. तसेच श्रीलंका, फिनलंड, अमेरिका व युरोपमधूनही निमंत्रणे आल्याचे त्या सांगतात.


दुसरी डॉक्टरेट त्यांनी ’स्टडी ऑफ युजीसी रेग्युलेशन फॉर प्रोफेशनॅलिझम अ‍ॅण्ड ऑर्गनायझेशन अ‍ॅण्ड इफेक्टिव्हनेस इन ऑर्गनायझेशन’ या विषयात मिळवली. त्यांच्या या अभ्यासाचे प्रतिबिंब सातव्या वेतन आयोगाच्या संशोधन व अनुदान याबाबतच्या अनेक निर्णयांमध्ये व धोरणांमध्ये दिसते. आजवर विविध महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक तसेच प्राचार्या म्हणून गेल्या असता त्यांनी मूळ पठडीतल्या गोष्टी केल्या नाहीत. विद्यार्थ्यांना पर्यावरणीय आणि व्यावहारिक पातळीवरचे निरीक्षण करण्यास व अनुभवण्यास त्यांनी भाग पाडले.


भिवंडी महाविद्यालयामध्ये माहिती अधिकाराच्या माध्यमातून भिवंडीतील नदीप्रदूषण, कचरा व स्वच्छता व आरोग्यविषयक प्रश्न धसास लावण्याचा प्रयत्न केला. वाडा कॉलेजमधील वनवासी विद्यार्थ्यांसाठी ‘इस्कॉन’कडून विविध प्रकारे सहकार्य मिळवत ’इको व्हिलेज’ उपक्रमाला चालना दिली. 2015 मध्ये बिहारमधील महापुरावरच्या उपाययोजनासाठी नितीशकुमार यांनी डॉ. राजेंद्र सिंह यांच्यासोबत निमंत्रित केल्याचे डॉ. स्नेहल आवर्जून सांगतात.स्नेहल यांनी लोकसहभागातून गंगा शुद्धीकरणाचे शिवधनुष्य हाती घेतले आहे. किंबहुना त्यांचा तिसर्‍या डॉक्टरेटचा विषयच ’कळपर्वीळीा एलेश्रेसू’ हा आहे. त्यासाठी त्यांनी पश्चिम बंगालमधील ’पाणिहाटी’ हे अभ्यास क्षेत्र निवडले आहे.


महाडचे चवदार तळे आंतरराष्ट्रीय स्मारक बनावे, अशी अपेक्षा त्या व्यक्त करतात. भारताचे जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह यांच्यासह जलबिरादरी आणि अशा अनेक स्थानिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पाणीविषयक काम करणार्‍या सेवा संस्थांच्या माध्यमातून डॉ. स्नेहल यांचे काम सुरू आहे. 2017 मध्ये प्रथमच त्या ‘वर्ल्ड वॉटर कौन्सिल’ला उपस्थित राहिल्या. त्या परिषदेत दमदार मांडणीमुळे ‘वर्ल्ड वॉटर कौन्सिलच्या सुषमा स्वराज’ अशी उपाधीही त्यांना मिळाली.

 
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ठाणे जिल्ह्यातील नद्यांचे पुनरुज्जीवन करण्याच्या हेतूने राबविण्यात येत असलेल्या ‘चला जाणूया नदीला’ या अभियानात डॉ. स्नेहल ठाणे जिल्हा समन्वयक म्हणून काम करणार आहेत. 30 नोव्हेंबरपर्यंत या अभियानात जिल्ह्यातील नद्यांना त्या भेट देणार आहेत.लढाऊ बाण्याच्या स्नेहल, बुद्धी व आपल्या ‘प्रोफेशन’मधून वैश्विक कल्याण कसे साधता येईल, याचा वस्तुपाठ देताना वनवासींची जीवनशैली अंगीकारणे गरजेचे असल्याचे सांगतात. संस्कार व संस्कृती जपूनच तंत्रज्ञानाची कास धरा, असा संदेशही त्या युवा पिढीला देतात. अशा या उच्चशिक्षित जल’सावित्री’ला पुढील वाटचालीस दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!


 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

दीपक शेलार

वायसीएमओयू मुक्त विद्यापीठातून वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन पदविका, तसेच पदवी. 'मुंबई तरुण भारत' या प्रथितयश मराठी दैनिकात ठाणे ब्युरो चिफपदी कार्यरत. ३० वर्षांपासून वृत्तपत्रविक्रेता, गेले एक तप विविध राज्यस्तरीय, तसेच स्थानिक वृत्तपत्रे व वाहिन्यांसाठी वृत्तांकन. गड-किल्ले भ्रमंती आणि मराठी नाटक, साहित्यात रुची, नवे शिकण्याचा हव्यास.