मुंबई : स्वराज्यावर चालून आलेल्या आक्रमणकारी अफझलखानच्या कबरीवरील अतिक्रमणावरून महाराष्ट्रात मोठी चर्चा झाली होती. प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझल खानच्या कबरीच्या आसपास असलेले मोठे अतिक्रमण काढण्याचा निर्णय आणि त्याची अंमलबजावणी फडणवीस शिंदे सरकारच्या माध्यमातून नुकतीच करण्यात आली होती. त्याला जोडूनच आता प्रतापगडावर येत्या काही दिवसांमध्ये अफझलखानाच्या वधाचा पुतळा उभारला जाणार हे स्पष्ट झाले आहे. राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मंगळवार, दि. १५ नोव्हेंबर रोजी यासंदर्भात पर्यटन सचिवांना सूचना दिल्या आहेत.
लोढा यांनी याबाबत पर्यटन सचिवांना लिहिलेल्या पत्रात याचा उल्लेख केला आहे. 'प्रतापगडावर झालेल्या शिवाजी महाराज व अफजलखान भेटीत महाराजांनी वाघनखांद्वारे अफजल खानाचा कोथळा काढून हिंदवी स्वराज्यावर चाल करून आलेल्या शत्रूला धडा शिकवण्याचे काम शिवाजी महाराजांनी केले होते. हा प्रसंग आजही कोट्यवधी शिवभक्तांना प्रेरित करतो. छत्रपतींच्या शिवराज्याभिषेकाचे यंदाचे ३५० वे वर्ष असून त्या अनुषंगाने ऐतिहासिक पर्यटनाला चालना देण्यासाठी किल्ले प्रतापगड येथे छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाचा कोथळा काढतानाचा पुतळा अर्थात शिवप्रताप स्मारक उभारण्यासाठी तसेच लाईट व साउंड शो सुरु करण्याबाबत "हिंदू एकता आंदोलन, सातारा" व इतर संघटनांकडून विनंती करण्यात आली आहे. तेव्हा या संदर्भात तात्काळ प्रस्ताव मागवण्यात यावा,' असे आदेश पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले आहेत.
प्रतापगड आणि अतिक्रमणाचा वाद
प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझल खानच्या कबरीजवळ २५ वर्षांपूर्वी पासून अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण सुरु झाल्याचे बोलले जाते. तसेच काही असामाजिक तत्त्वांकडून 'अफझल खान मेमोरिअल ट्रस्ट' नामक संस्थेची स्थापन करुन या गैरप्रकाराला पाठबळ दिल्याचा आरोप केला जातो. काही कुख्यात अंडरवर्ल्ड गुन्हेगारांचा यात सहभाग असल्याचेही बोलले गेले. कबरीजवळ करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी न्यायालयाकडून देखील आदेश देण्यात आले होते. परंतु, काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारच्या काळात या कामाला विरोध केला गेला. मात्र, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या अतिक्रमणाला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत गोपनीय पद्धतीचा अवलंब करून नेस्तनाबूत करून दाखवले आहे.